पीडित महिला आणि तिचे कुटुंबीय यांची ओळख पटेल, अशी सूत्रे निवाड्यातून वगळण्याचा गोवा खंडपिठाचा सत्र न्यायालयाला आदेश
‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्या पुराव्याअभावी निर्दोष मुक्ततेला गोवा खंडपिठात आव्हान दिल्याचे प्रकरण
पणजी, २७ मे (वार्ता.) – ‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित महिला आणि तिचे कुटुंबीय यांचा उल्लेख असलेली सूत्रे निवाड्यातून वगळावी आणि नंतरच हा निवाडा न्ययालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने अतिरिक्त सत्र न्यायालयाला दिला. ‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांची म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने वर्ष २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. गोवा शासनाने कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला गोवा खंडपिठात आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकेवर सुनावणीच्या वेळी गोवा खंडपिठाने हा आदेश दिला. राज्यशासनाच्या वतीने अॅड्व्होकेट जनरल देविदास पांगम यांच्यासमवेत सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी गोवा खंडपिठात बाजू मांडली.
अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या निवाड्यातील एका ई-मेलचा संदर्भ घेऊन सॉलीसीटर जनरल तुषार मेहता सुनावणीच्या वेळी म्हणाले, ‘‘तक्रारदार, तिचा नवरा आणि तिची आई यांच्या नावांचा उल्लेख निवाड्यात करण्यात आला आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या निवाड्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित महिलेच्या मनावर कोणताही आघात झाल्याचे तिच्या त्या वेळच्या वर्तनावरून दिसत नसल्याचा शेरा मारला आहे. कनिष्ठ न्यायालयाचे हे विधान आश्चर्यकारक आहे. कनिष्ठ न्यायालयाने लैंगिक अत्याचारासारख्या प्रकरणी संवेदनशीलता बाळगली पाहिजे.’’ या प्रकरणी गोवा खंडपिठात पुढील सुनावणी २ जून या दिवशी होणार आहे.