जालना येथील भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पोलीस अधिकार्‍यांकडून काठी तुटेपर्यंत मारहाण ! 

सामाजिक माध्यमातून मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित !

  • मारहाण करणारे पोलीस जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षकच आहेत ! अशा प्रकारे जनतेवर दादागिरी करणार्‍या पोलिसांना सरकारने तात्काळ बडतर्फ केले पाहिजे, असेच जनतेला वाटते !

  • राजकीय पदाधिकार्‍यांशी असे वागणारे पोलीस सर्वसामान्य जनतेशी कसे वागत असतील ?, याचा विचारच न केलेला बरा !

जालना – येथील भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना २ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी यांच्याकडून काठी तुटेपर्यंत अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना ९ एप्रिल २०२१ या दिवशी घडली असून याचा व्हिडिओ आता सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

( सौजन्य: TV9 मराठी )

१. ९ एप्रिल या दिवशी शिवराज नारियलवाले यांना एका खासगी रुग्णालयामध्ये एका युवकावर उपचार चालू असतांना त्याचे निधन झाल्याची माहिती मिळाली होती. त्या युवकाला अपघातानंतर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मृताचे नातेवाइक, शिवराज नारियलवाले आणि काही कार्यकर्ते रुग्णालयात पोचले होते.

२. मृत युवकाचे नातेवाइक संतप्त होते. त्यांनी युवकाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनावर केला. मृताचे नातेवाइक आणि शिवराज नारियलवाले यांनी रुग्णालय प्रशासनाला युवकाच्या मृत्यूविषयी खडसावले. या वेळी नातेवाइक, नारियलवाले आणि आधुनिक वैद्य यांच्यात वाद झाला.

३. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना बोलावले. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर आणि कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस कर्मचार्‍यांसह रुग्णालयात पोचले.

४. प्रारंभी पोलिसांनी नातेवाइकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु वाद वाढला आणि शिवीगाळ चालू झाली. या वेळी ‘पोलिसांनी आक्षेपार्ह भाषा वापरली’, असा नातेवाइकांचा आरोप होता.

५. याच वादात पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी त्या गर्दीतून नारियलवाले यांना ओढून एका खोलीत नेऊन काठी तुटेपर्यंत अमानुष मारहाण केली. यातील पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर हे लाचखोरीच्या गंभीर प्रकरणात आधीच अडकले आहेत. (अशा भ्रष्टाचारी पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून आतापर्यंत त्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर न्यायालयीन खटला प्रविष्ट करायला हवा ! – संपादक)

पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध कलम ३०७ नुसार गुन्हा नोंद करणार ! – शिवराज नारियलवाले, सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा

याविषयी शिवराज नारियलवाले म्हणाले, ‘‘सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओतील व्यक्ती मीच असून घडलेली ही घटना सत्य आहे. ९ एप्रिल २०२१ या दिवशी मला अमानुष मारहाण करण्यात आली. त्या वेळी मारहाण करणारे सामान्य पोलीस कर्मचारी नसून पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक होते. एवढे मोठे अधिकारी आपल्याला मारहाण करत असल्याचे पाहून मला काहीच करता आले नाही. लोक मला विचारतात की, तुम्ही तेव्हाच कारवाईची मागणी किंवा तक्रार का केली नाही ? प्रत्यक्षात मी घाबरलो होतो. मला शारीरिक दुखापत तर झालीच, त्यापेक्षा मला मोठा मानसिक धक्का बसला होता; पण आता त्या मानसिक तणावातून बाहेर पडलो आहे. व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर मला अनेकांचे दूरभाष येत आहेत. काहींनी सहानुभूती दाखवली, तर काहींनी मला प्रकरण चर्चेतून मिटवून टाकण्याचा उपदेश केला; परंतु मी आता शांत बसणार नाही. मला अमानुष मारहाण करणार्‍यांच्या विरोधात मी भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ चा गुन्हा नोंद करणार आहे.’’