कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लसीकरण प्रक्रियेविषयीच्या भोंगळ कारभारामुळे झालेला मनःस्ताप !

हे प्रशासनाला लज्जास्पद !

केंद्र सरकारने १ मे या दिवशीपासून १८ वर्षांवरील सर्वांचे कोरोनासाठीचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. त्यादृष्टीने पनवेल येथे लसीकरण केंद्रावर जाण्यापूर्वी आणि तेथे गेल्यावर आलेले कटू अनुभव येथे देत आहे.

१. भ्रमणभाषवरील ओटीपी विलंबाने मिळणे

२८ एप्रिल या दिवशीपासून लसीकरणासाठी नोंदणी करण्यात येत होती. त्यामुळे ‘कोविन’च्या लिंकवरून मी माझी आणि पत्नीची नोंदणी केली; पण त्यातही भ्रमणभाषवरील ओटीपी विलंबाने मिळत होता. नोंदणीनंतर आम्हाला एक लघुसंदेश आला.

२. ऑनलाईन अपॉइंटमेंटविषयीची माहिती मिळवतांना असंख्य अडचणी येणे आणि शेवटपर्यंत माहिती न मिळणे

याआधी केवळ नोंदणी करून नव्हे, तर ‘कोविन’ अ‍ॅप किंवा ‘आरोग्यसेतू’ अ‍ॅप यांद्वारे आपल्याला ‘ऑनलाईन’ अपॉइंटमेंट मिळणेही आवश्यक असल्याने १ मे पासून आम्ही त्यासाठी प्रयत्न करत होतो; पण त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया कोणत्या वेळेपासून चालू होते ? याविषयीची ठोस माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पहिले काही दिवस असेच वाया गेले.

त्यानंतर ‘दुपारी ४ वाजता ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठीचे वेळेचे पर्याय चालू होतात’, असे समजले. त्या वेळेत प्रयत्न करून पाहिला; पण काहीही माहिती मिळत नव्हती. कधी कधी ओटीपीच मिळायचा नाही, तर कधी ओटीपी मिळायचा; पण १८ वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण केंद्र कुठे आहेत ? तेच दिसायचे नाही. कधी केंद्र दिसलेच, तर तोपर्यंत संदेश यायचा की, या केंद्रावरील सर्व नोंदणी भरलेल्या आहेत. थोडक्यात सायंकाळी ६ वाजता चालू झालेली नोंदणी प्रक्रिया ६ वाजून १ किंवा अगदी २ मिनिटांनीही पूर्ण होत असे; पण असे असतांनाही आम्हाला अपॉइंटमेंट मिळालीच नाही.

३. स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सकाळी लवकर लसीकरण केंद्रावर जाणे

एका स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे  दुसर्‍या दिवशी आम्ही दोघे, तसेच अन्य ४-५ जण पहाटे ५.३० वाजता लसीकरण केंद्रावर गेलो. ‘तेथे टोकन देऊन लसीकरण केले जाईल’, असेही सांगण्यात आले होते.

४. लसीकरण केंद्रावर सर्वजण संभ्रमावस्थेत असणे

तेथे उपस्थित असणार्‍यांनाही अनेक प्रश्‍न होते. ते आम्हाला विचारत होते, ‘‘येथे कोणत्या वयोगटासाठी लस मिळणार आहे ? दुसरा डोसही उपलब्ध आहे का ?’’ यावरून सर्वच जण संभ्रमावस्थेत असल्याचे दिसत होते. साधारणतः ८ वाजता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला बसण्यासाठी आसंद्या दिल्या. इतका वेळ आम्ही उभेच होतो.

५. टोकन न मिळाल्यावर स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांशी जाऊन भांडण्यास सांगणे आणि वरिष्ठांनी संबंधित कार्यकर्त्यांनाही न जुमानणे

तितक्यात केंद्रावर पोलीस आणि महिला सुरक्षा अधिकारी आले. त्यांनी कोणतेही टोकन देणार नसल्याचे सांगितले. त्या वेळी आम्ही पुन्हा स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. प्रथम त्यांनी तो घेतला नाही. काही वेळाने उचलल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही त्यांच्या वरिष्ठांशी जाऊन भांडा.’’ आम्ही त्यांनाच वरिष्ठांशी बोलून घेण्यास सांगितले. काही वेळाने त्यांनी संपर्क करून सांगितले की, वरिष्ठ ऐकत नाहीत. तुम्ही आम्हाला माहिती द्या. आम्ही बघतो.

६. पावणे ४ घंटे थांबूनही लसीकरण न होणे आणि त्याविषयीची माहितीही न मिळणे

सकाळी ५.३० ते ९.१५ असे एकूण पावणे ४ घंटे आमचे ८ जणांचे वाया गेले. लसीकरण तर झालेच नाही. संघटनेच्या कार्यकर्त्यांना आम्ही आमची माहिती देऊनही त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला संपर्क केलेला नाही. लसीकरणाविषयी सर्वसामान्यांना संभ्रम असल्याने सर्वांचेच हाल होत आहेत. संकटकाळातील ही सर्व स्थिती पहाता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही, हेच प्रकर्षाने लक्षात आले.

– श्री. आल्हाद माळगावकर, पनवेल

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org