स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची शिदोरी

२८ मे २०२१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…

स्वातंत्र्यवीर सावरकर

१. ‘स्व’-राज्य

‘स्वराज्य म्हणजे हिंदुस्थान देशाचे एक राष्ट्रीय, स्वायत्त, लोकसत्ताक आणि स्वतंत्र राज्य’, हेच होय. या स्वराज्यात हिंदी नागरिक असलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाचे जातीपंथ निर्विशेष असलेले स्वत्व राखले जाईल, प्रत्येक धर्मास आणि जातीस, आपापल्या संख्येप्रमाणे जे न्याय्य अधिकार उपभोगता येतात, ते समानत्वे बजावता येतील.

जर या स्वराज्यात प्रत्येक धर्मपंथाचे स्वत्व राखले जाणार आहे, तर मग त्यात हिंदु धर्माचेही स्वत्व योग्य प्रमाणात आणि यथान्याय राखले पाहिजे, नाही का ? इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश भाग ज्या हिंदूंचा आहे, त्यांचे स्वत्व ज्या स्वराज्यात इतर अत्यल्प किंवा अल्प अशा अहिंदु समाजाच्या स्वत्वाच्या अतिरेकी मागण्यास बळी दिले जाते, ते स्वराज्य नव्हे.

(साभार : श्रद्धानंद; हिंदुत्वाचे पंचप्राण, १९२७)

होऊनिया मुक्त स्वतः । करील मुक्त ती जगता ॥
ममतेच्या समतेच्या । सृजन रक्षणाला ॥

(साभार : सावरकरांच्या कविता, १९३२)

हे मिळवलेले स्वराज्य उपभोगासाठी मिळाले आहे, असे समजू नका. हे तुमचे महाराज्य जर सुरक्षित नि प्रबळ करावयाचे असेल, तर आणखी १० वर्षे तरी तुम्हास त्या स्वातंत्र्य संपादक पिढीने केला, त्याहून दसपटीने अधिक त्याग अधिक कष्ट नि अधिक पराक्रम केला पाहिजे.

(साभार : साहित्यलक्ष्मी, १९६४)

२. खरी वैज्ञानिक वृत्ती

आपणास ज्याचे कारण सांगता येत नाही, अशी कोणतीही नवी घटना पहाताच तिला एकदम ‘दैवी’ समजून तिला नारळ फोडू लागणे, फुले वहाणे, ती घडू नये किंवा घडावी म्हणून देवास प्रार्थिणे, हे जसे धर्मवेड आणि धर्मभोळेपणा आहे, तसेच ‘आम्हा मानवांना आज कळलेले सृष्टी नियम तेवढेच समग्र ज्ञान. ‘आता कळायचे काही बाकी नाहीच’, अशा दंभाने फुगून त्या आजच्या ज्ञान कार्यकारणभावाच्या कक्षेत जे सामावू शकत नाही, ते ते सारे खोटेच असले पाहिजे, असे ठाम मत प्रतिपादणे आणि तसा ‘चमत्कार’ म्हटला की, तो फेटाळून ऐकूनही न घेणे, हेही एक बुद्धीवेड, एक बुद्धीभोळेपणाच होणार आहे. खरी वैज्ञानिक वृत्ती म्हणजे प्रत्येक चमत्कारास सृष्टीने घातलेला एक नवा प्रश्‍न समजून तो सोडवण्याची धमक बाळगली पाहिजे. विज्ञान तेच की, जे स्वतः समजून असते की, ज्ञान कितीही वाढले, तरी ‘अज्ञानं पुरतस्तस्य भाति कक्षासु कासुचित्।’

(साभार : मनोहर, १९३६)

३. प्रत्यक्ष परोपकार

ज्या व्रताने आजच्या परिस्थितीत अवश्य (आवश्यक) अशी हिंदु राष्ट्राची किंवा मानवाची काहीतरी प्रत्यक्ष सेवा घडेल,.हीनदीन, दलितांची दुःखे काहीतरी प्रमाणात अगदी ‘याचि देही याचि डोळा’ दूरवीत (दूर करता) येतील. काही तरी व्रताच्या प्रीत्यर्थ भोगाव्या लागणार्‍या देहकष्टाच्या वा अर्थव्यवसायाच्या मानाने राष्ट्राची प्रत्यक्ष सेवा नि रोखठोक परोपकार घडेल, ते तेच व्रत हिंदु साधू-संतांनी नि सामान्य स्त्री-पुरुषांनी आचरावे.

(साभार : क्ष-किरणे, १९३६)

४. मानवी राष्ट्र

जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे मानवी राष्ट्र व्हावे, असे आम्हांसही वाटते. आमचा वेद तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो; पण परिस्थितीनुरूप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद ५०० वर्षे तरी जिवंत रहाणार आहे. त्यानंतर काय होईल ? हे सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगल दुसरे राष्ट्र होईल.

(साभार : अखंड हिंदुस्थान लढा पर्व, १९४३)

५. प्रांत आणि स्वयंनिर्णय अधिकारी

एका राष्ट्राला स्वयंनिर्णयाचा अधिकार असू शकतो; परंतु प्रांताने, जिल्ह्याने आणि वेगवेगळ्या गल्ल्यांपर्यंत गावाने स्वयंनिर्णयाच्या अधिकाराने केंद्रीय राज्यातून (राष्ट्रातून) फुटून निघून स्वतंत्र राष्ट्रे उत्पन्न करण्याचा दावा करणे हास्यास्पद आहे. प्रांत हा प्रांत असल्याने ज्याचा तो दुय्यम भाग आहे, त्या राष्ट्राविरुद्ध स्वयंनिर्णयाचा अधिकार त्याला केव्हाही असू शकणार नाही.

(साभार : ऐतिहासिक निवेदने, १९४५)

६. राजकारण व्यवहाराचे उच्चतम ध्येय

राजकारणाच्या व्यवहाराचे आणि शासनशास्त्राचे उच्चतम ध्येय सर्व मनुष्यजातीस समसमान अधिकार असणार्‍या एका प्रातिनिधिक शासनाचे नागरिक बनवणे, हे होय. एक देव, एक भाषा, एक जाती, एक जीवन अशा एका न्यायप्रवण आणि प्रातिनिधिक शांतीसाम्राज्याची स्थापना अध्रुव ध्रुव करून अन् त्या मानव साम्राज्यात हे कुलवंश-जाती-देश-भाषा भिन्नत्वाचे क्षुद्र अभिमान आणि अहंकार विलीन करून उभ्या मनुष्यजातीचे राजकीय सात्त्विक एकीकरण, हेच ज्याचे अंतिम ध्येय आहे. त्या आम्हास या ध्येयाच्या सिद्धीसाठी तद्अनुकूल असलेल्या सर्व संस्था त्या ध्येयाकडे जाणार्‍या मार्गावरील टप्पे म्हणून ग्राह्यच वाटतात.

(साभार : माझी जन्मठेप, १९२७)

७. हिंदु संघटनेचे ध्येय

आपण सर्वांना प्राणाहून प्रिय असलेल्या स्वदेशास, स्वराष्ट्रास आजच्या पतीतावस्थेतून उद्धरून त्याने जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत लेशभरही हीन ठरू नये, असे संघटित, सशक्त नि प्रगत करावे आणि मानव्याच्या हितार्थ झुंजण्याची योग्यता नि बळ त्यामध्ये यावे, हेच आमच्या हिंदूसंघटन पक्षाचे सांप्रतचे ध्येय आहे. (साभार : विज्ञाननिष्ठ निबंध, १९३४)

८. राष्ट्रीय सैन्याचे मुख्य ध्येय

राष्ट्रीय सैन्याचे मुख्य ध्येय विजय हे आहे. आपल्या न्याय्य पक्षाची (राष्ट्राची) एकंदरीत न्यूनतम हानी होऊन अन्याय्य विपक्षाची (शत्रू राष्ट्राची) एकंदरीत जास्तीत जास्त हानी करण्यास जी युद्धकला झटते, ती खरी युद्धकला होय ! त्या युद्धकलेला हुतात्मता हा ही केव्हा केव्हा एक अत्यंत अवश्य (आवश्यक) आणि अत्यंत वंद्य असा घटक होऊ शकतो; पण तो अपवाद म्हणून ! केवळ हौतात्म्य ही काही विजयाची निश्‍चित हमी नव्हे.(साभार : तेजस्वी तारे, १९२९)

९. सैनिकीदृष्ट्या सामर्थ्यवान राष्ट्र

राष्ट्राची तलवार मोडली की, त्यांची लेखणी, त्यांचा कुंचला, त्यांची वीणाही  मोडून भंगून पडतात.

(साभार : श्रद्धानंद, १९२७)

इतिहासाच्या प्रत्येक पानापानांतून अगदी अखेरच्या पानापर्यंत एकच गोष्ट सिद्ध झालेली दृष्टीस पडते. ती ही की, इतर गोष्टी सारख्या असल्या, तरी जी राष्ट्रे सैनिकीदृष्ट्या सामर्थ्यवान ठरतील, ती काय ती जगतील नि जी सैनिकीदृष्ट्या कमकुवत ठरतील, ती गुलामगिरीत खितपत पडतील किंवा नामशेष होऊन जातील.

(साभार : हिंदुत्वाचे पंचप्राण, १९४०)

आज विष्णूच्या अनेक रूपांपैकी रणछोडदास या रूपाची आवश्यकता नसून नृसिंह रूपाची आवश्यकता आहे.

(साभार : साप्ताहिक हिंदु १९५८)

युगधर्म ओळखून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सरस्वतीदेवीच्या रक्षणार्थच तिच्याकडे काही काळ पाठ फिरवून शुंभ-निशुंभ मर्दिनीची उपासना केली. लेखणी टाकून भवानी उचलली; म्हणून आज महाराष्ट्र सारस्वत असा काही पदार्थ जिवंत राहिला आहे !

(साभार : अखंड हिंदुस्थान लढा पर्व, १९३८)

संकलक : श्री. श्रीकांत ताम्हणकर, पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बाणेदारपणा !

‘लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अडवले आणि म्हटले, ‘‘महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्‍चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे.’’ सावरकर थांबले आणि गुप्तचरांनी त्यांची झडती घेतली. काहीच सापडले नाही. तेव्हा गुप्तचरांचा प्रमुख अधिकारी सावरकर यांना म्हणाला, ‘‘क्षमा करा, चुकीच्या वार्तेमुळे तुम्हाला त्रास झाला.’’ त्यावर सावरकर म्हणाले, ‘‘तुम्हाला मिळालेली वार्ता चुकीची नाही. माझ्यापाशी भयंकर घातक हत्यार आहे.’’ खिशातील झरणी (पेन) दाखवून सावरकर म्हणाले, ‘‘हे पहा, ते हत्यार ! यातून निघणारा एकेक शब्द तरुणांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. या शब्दांनी देशभक्तांचे रक्त सळसळते आणि ते राष्ट्रासाठी तळहातावर शिर घेऊन लढण्यास सिद्ध होतात !’’

(साभार : साप्ताहिक ‘विटा दर्शन’, सोमवार १ ते ७ मार्च २०२१)