खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पंतप्रधानांनी ४ वेळा भेट नाकारली; मात्र यापूर्वी ४० वेळा त्यांना भेट दिली आहे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
कोल्हापूर, २७ मे – खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी मी कधीही अपशब्द वापरला नाही. त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणे हा माझा स्वभाव नाही. छत्रपती घराण्याविषयी आम्हाला प्रचंड आदर असून भारतीय जनता पक्षाने खासदार संभाजीराजे यांचा मोठा सन्मान केला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी पंतप्रधानांनी त्यांची भेट नाकारली असली, तरी यापूर्वी त्यांना ४० वेळा भेट दिली आहे. या घराण्यातील वारसदारांना भाजप कार्यालयात यायला लागू नये म्हणून पंतप्रधान मोदी यांनी संभाजीराजे यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार बनवले, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते २७ मे या दिवशी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रकांत पाटील या वेळी म्हणाले की,
१. मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे ही भेट झाली नाही; मात्र त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच संभाजीराजे यांचा सन्मान केला आहे.
२. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सगळयांनी उभे राहून खासदार संभाजीराजे यांना सन्मान दिला होता. रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना, प्राधिकरणाचे अध्यक्ष, गडकिल्ले संवर्धनासाठी निधी, अशा विविध माध्यमातून त्यांच्या कामाचा नेहमीच मान-सन्मान ठेवला आहे.
३. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. यासाठी जो संघर्ष होईल, त्यामध्ये भाजपचा सहभाग असेल. संभाजीराजे यांनी नेतृत्व केले, तरी भाजप त्यांच्यासमवेत असेल.
४. कोरोनाचे संकट आहे म्हणून राज्य सरकारला कोणतेही दायित्व ढकलता येणार नाही.