सत्याची कास धरणारे धर्मनिष्ठ पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर !

‘पू. सुधाकर चपळगावकर (पू. बाळासाहेब) यांच्याशी माझा परिचय संभाजीनगर येथील एका अधिवक्त्यांच्या कार्यशाळेत झाला. त्यानंतर काही वर्षे हिंदु विधीज्ञ परिषदेच्या संबंधित सेवेनिमित्त त्यांच्याशी माझा अधून-मधून संपर्क होत असे. गोवा येथील अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी आमची जवळीक झाली. मी त्यांना ‘बाळासाहेब’ या नावाने संबोधितो, तर ते मला ‘शिवाजीराव’ असे म्हणतात. आमची अनौपचारिक, वैयक्तिक आणि आध्यात्मिक स्तरावर जवळीक आहे. त्यांच्या अल्पशा सहवासात मला पुष्कळ शिकायला मिळाले आणि त्यांचा आधार मिळाला. मला त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा (२७ मे) या दिवशी पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर
पू. शिवाजी वटकर

१. नम्रता आणि आपलेपणा

पू. बाळासाहेब संत झाल्याचे समजल्यावर मला अत्यानंद झाला. ‘ते व्यस्त असतील’, असे गृहीत धरून ‘त्यांचे १ – २ दिवसांनी अभिनंदन करून त्यांच्याशी सविस्तर बोलूया’, असे मी ठरवले; मात्र दुसर्‍या दिवशी त्यांनीच मला भ्रमणभाष केला. त्या वेळी मी त्यांचे अभिनंदन करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या जवळच्या मित्राला संतपदावर विराजमान करून मला त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी दिली’, असे म्हणून मी कृतज्ञता व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले, ‘‘शिवाजीराव, मी संत झालो, तरी आपले संबंध असेच पुढेही रहातील. तुमच्या मार्गदर्शनाचा मला लाभ झाला. मला मार्गदर्शन करत रहा. मी पुढेही तुमच्या संपर्कात राहीन. मला या मार्गाने आणखी पुढे जायचे आहे.’’

२. साधनेचे प्रयत्न तळमळीने करणे

त्यांनी न्यायाधीश म्हणून उच्च पद आणि ऐश्‍वर्य भोगले आहे. त्यांना शारीरिक मर्यादा आहेत, तरीही ते तळमळीने साधनेचे प्रयत्न करतात. ते स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना अन् सेवा कशी करता येईल ? यासाठी प्रयत्नरत असतात.

३. ऐकण्याची वृत्ती

२५.२.२०१९ या दिवशी आमचे भ्रमणभाषवर बोलणे झाले. ते परात्पर गुरु बाबांना (परात्पर गुरु पांडे महाराज यांना) भेटायला येणार होते; मात्र त्याच दिवशी परात्पर गुरु बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर ३.३.२०१९ या दिवशी त्यांंनी देहत्याग केला. पू. बाळासाहेब परात्पर गुरु बाबांना भेटू शकले नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी भ्रमणभाष करून मला सांगितले, ‘‘मी देवद आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहे. त्यानुसार ‘बस’चे आरक्षण केले आहे.’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘परात्पर गुरु बाबांप्रती तुमची श्रद्धा आणि कृतज्ञताभाव आहे’, हे फार चांगले आहे. तुम्ही मानस श्रद्धांजली अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुमचे वय आणि शारीरिक त्रास पहाता केवळ श्रद्धांजली वहाण्यासाठी तुम्ही संभाजीनगरहून देवद आश्रमात येणे योग्य होणार नाही. पुढे काही समष्टी सेवेचे नियोजन झाले, तर तुम्ही येऊ शकता.’’ वास्तविक पहाता त्यांचे वय, अधिकार आणि आध्यात्मिक पातळी पहाता मी सुचवलेले त्यांनी ऐकण्याची आवश्यकता नव्हती, तसेच ‘ते अनेक वर्षे सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत’, असेही नाही, तरीही त्यांनी मी सुचवलेले ऐकले आणि देवद येथे येण्याचे रहित केले. त्यानंतर गुरुकृपेने काही समष्टी सेवेचे नियोजन झाले आणि ते देवद आश्रमात आले.

४. साधकांना आधार वाटणे

४ अ. मार्गदर्शनातून साधकांना प्रोत्साहन मिळाल्याने धर्मसेवा होणे : पू. बाळासाहेब काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) देवद आश्रमात आले होते. तेव्हा ते सांगत होते, ‘वय झाल्याने आता माझ्याकडून फार धावपळ होत नाही आणि कार्यही होत नाही’, याचे मला वाईट वाटते. माझा वाहनचालक फार हुशार आणि सर्वांना साहाय्य करणारा आहे. त्याला काही सांगावे लागत नाही आणि मीही त्याला काही विचारत नाही, उदा. प्रवास करतांना ‘मार्गात एखादी गाडी पंक्चर झाली किंवा बिघाड झाला आहे’, हे पाहिल्यावर तो गाडी थांबवून त्यांना साहाय्य करतो, कुणी वयस्कर किंवा रुग्ण असेल, तर त्याला साहाय्य करतो. याचे मला आश्‍चर्य वाटते. मी हे सर्व मागच्या आसंदीवर बसून पहात असतो.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही गाडीच्या मागील आसंदीवर बसलेले असतांना तुमचा चालक तुमच्या अस्तित्वाने काम करतो. तुमच्या केवळ अस्तित्वाने किंवा मार्गदर्शनाने आमच्यासारख्या साधकांना प्रोत्साहन मिळाल्यामुळे तुमची धर्मसेवा होते. विष्णूच्या शेषशायी स्थितीमुळे जसे विश्‍वाचे कार्य चालते, तसेच हे आहे. आम्हाला तुमचा आधार वाटतो. ‘तुमच्यातील चैतन्य आणि तुमची आध्यात्मिक पातळी यांमुळे कार्य होत आहे’, असे मला वाटते.’’

४ आ. वैध मार्गाने साहाय्य करून धर्मकार्यातील अडथळे दूर करणे : ‘साधकाची साधना आणि सेवा व्हावी, त्यांच्याकडून चुका होऊ नयेत’, अशी पू. बाळासाहेबांची तळमळ असते. साधकांना धर्मकार्य करतांना अनेक अडचणी येतात. पोलीस आणि प्रशासन साधकांना नाहक त्रासही देतात. ते सभा आणि आंदोलने करण्यासाठी वेळेवर अनुमती देत नाहीत. अशा वेळी पू. बाळासाहेब वैध मार्गाने साहाय्य करून धर्मकार्यातील अडथळे दूर करतात.

४ इ. कौटुंबिक खटल्याच्या वेळी धीर देऊन साधनेसाठी साहाय्य करणे : मी कौटुंबिक खटल्याच्या वेळी त्यांचे मार्गदर्शन घेत असे. त्या वेळी ते कायदेशीर मार्गदर्शन करायचे, तसेच या संदर्भातील वैयक्तिक अनुभवही सांगायचे. ‘काही वेळा प्रारब्धानुसार खटल्यांच्या वेळी आपल्याला सकारात्मक राहून तोंड द्यावे लागते. त्याच वेळी ‘आपली साधनाही कशी चालू ठेवायची ?’, याविषयी ते स्वतःचे अनुभव सांगून मला धीर द्यायचे. ते मला माझ्याकडून झालेल्या चुकांविषयी सांगायचे.

५. आदरणीय व्यक्तीमत्त्व

एकदा मला त्यांच्या समवेत एका पोलीस (खांदेश्‍वर, पनवेल येथील) ठाण्यात संपर्कासाठी जाण्याची संधी मिळाली. आम्ही तेथे पोचल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यस्त असल्याने आम्ही दुसर्‍या खोलीत एका पोलिसासमोर बसलो होतो. तेथे मी पू. बाळासाहेबांची ओळख करून दिल्यावर ते कर्मचारी (कॉन्स्टेबल) म्हणाले, ‘‘तुमचे नाव एका साहाय्यक पोलीस आयुक्तांकडून ऐकले आहे. ते नेहमी तुमची स्तुती करतात.’’ त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही तेच सांगितले. त्या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पू. बाळासाहेब यांच्याशी केवळ निवृत्त न्यायाधीश या दृष्टीने बोलले नाहीत, तर एक आदरणीय आणि पूजनीय व्यक्ती म्हणून त्यांनी संवाद साधला. यावरून ‘पू. बाळासाहेबांनी त्यांच्या न्यायालयीन कारकीर्दीत किती मोलाचे आणि मानवतावादी कार्य केले आहे’, हे लक्षात येते.

६. देहबुद्धी अल्प असणे

त्यांच्यावर झालेल्या कर्करोगाच्या शस्त्रकर्माच्या वेळी ते स्थिर होते. त्यांना डोळ्यांचाही तीव्र त्रास आहे. ते त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांची देहबुद्धी अल्प झाली आहे.

७. स्वतःला असलेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा धर्मकार्यासाठी उपयोग करणे

त्यांनी हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांचा अभ्यास केला असून त्यातील सूत्रे ते आचरणात आणतात. त्यांनी अन्य संप्रदाय आणि पंथ यांचाही अभ्यास केला आहे. त्यांची या वयातही स्मरणशक्ती चांगली आहे. त्यांनी मला एके दिवशी महाभारताविषयी सविस्तर माहिती सांगितली. ‘महाभारत हा सूडाचा इतिहास आहे. सर्व काही प्रारब्धानुसार आणि माणसाच्या वृत्तीमुळे घडते. ‘तुमच्यावर अन्याय झाला’, असे तुम्हाला वाटत असले, तरी तुम्हाला सूड घेण्याचा अधिकार कुणी दिला नाही. ‘द्वेष करणे आणि सूड घेणे’ या स्वभावदोषांच्या पैलूंवर पू. बाळासाहेबांनी महाभारताच्या आधारे साधना म्हणून कसे वागायला पाहिजे’, याचे सुंदर विवेचन केले. अशा सर्व सूत्रांचा ते व्यावहारिक जीवनात आणि साधनेसाठी उपयोग करतात. साधकांना हे शिकवल्यामुळे त्यांची समष्टी सेवा होते. पू. बाळासाहेब ‘चपळगावकर’ या त्यांच्या नावाप्रमाणे अत्यंत चपळाईने स्वतःच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा धर्मकार्यासाठी उपयोग करतात.

८. धर्मद्रोह्यांप्रती चीड असणे

पू. बाळासाहेबांच्या मनात हिंदु धर्माला तुच्छ लेखणार्‍या धर्मद्रोह्यांप्रती चीड आहे. ते सत्याची कास धरणारेे धर्मनिष्ठ निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे संभाजीनगर खंडपिठातील श्री गणेशमूर्तीच्या विरोधातील अंनिसची याचिका फेटाळून लावण्यास यश मिळाले. धर्मविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला त्यांनी वैध मार्गाने सातत्याने विरोध केला. त्यांच्यातील प्रेमभावामुळे अनेक वारकर्‍यांनी संघटितपणे या कायद्यास विरोध केला.

त्यांच्यातील निरपेक्ष प्रेमभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात. त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्यांच्या संपर्कातील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी संस्थेच्या कार्याशी जोडले गेले आहेत.

 ९. प्रामाणिकपणे आणि निःस्पृहतेने कार्य करणारे न्यायाधीश

९ अ. कायद्याच्या चौकटीत राहून आरोपी किंवा त्यांचे नातेवाईक यांना माणुसकीने वागणूक देणे : ते निवृत्त झाल्यावरही त्यांनी निवाडा केलेल्या खटल्यातील काही आरोपी त्यांची आदराने आठवण काढतात. ते कायद्याच्या चौकटीत राहून आरोपी किंवा त्यांचे नातेवाईक यांना माणुसकीने वागणूक देत. त्यांनी प्रामाणिकपणे अन् निःस्पृहपणे कार्य केल्याने त्यांच्याप्रती सर्वांना आदर वाटतो.

९ आ. गोरगरिबांना मानवतावादी दृष्टीकोनातून साहाय्य करणे : पू. बाळासाहेब नेहमी म्हणतात, ‘‘मी कुणावर अन्याय केला नाही आणि कुणावर अन्याय होऊ दिला नाही.’’ ‘त्यांनी असाहाय्य आणि गोरगरीब यांना मानवतावादी दृष्टीकोनातून कसे साहाय्य केले’, याविषयी ते सांगतात. सध्याच्या भ्रष्ट आणि अन्यायकारी न्याययंत्रणेत अन् रज-तमात्मक वातावरणात पू. बाळासाहेब न्यायदानाचे कार्य करणारे एक आदर्श न्यायाधीश आहेत. त्यामुळेच भगवंताने त्यांची राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी निवड केली आहे. ‘त्यांचे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात मोलाचे योगदान आहे’, असे मला वाटते.

१०. साधनेने स्वतःतील चैतन्य वाढवून धर्माची बाजू घेणारे निवृत्त न्यायाधीश पू. बाळासाहेब यांच्या सत्संगाची साधकाला ओढ लागणे

समाजात अनेक निवृत्त न्यायाधीश आणि अधिवक्ते आहेत. त्यापैकी काही जण सामाजिक सेवा करतात; मात्र राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी झोकून देणारे पू. बाळासाहेब यांच्यासारखे न्यायमूर्ती मी आतापर्यंत पाहिले नाहीत. पुरोगाम्यांचे नेतृत्व करणारे एक निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांना कर्तृत्व आणि पद यांचा अहं आहे. ते चर्चासत्रांत खालच्या स्तरावर जाऊन बोलतात. त्यांच्याकडे पहावेसेही वाटत नाही; मात्र साधनेने स्वतःतील चैतन्य वाढवून धर्माची बाजू घेणारे निवृत्त न्यायाधीश पू. बाळासाहेब यांच्या सत्संगाची माझ्यासारख्या साधकाला ओढ लागतेे.

११. श्रद्धा

११ अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याप्रती

११ अ १. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी भाव : ते मुंबईला किंवा देवद आश्रमात आल्यावर परात्पर गुरु पांडे महाराज (परात्पर गुरु बाबा यांना) यांना आवर्जून भेटायचे. ते अधून-मधून माझ्याशी भ्रमणभाषवरून बोलल्यावर परात्पर गुरु बाबांना नमस्कार सांगत.

११ अ २. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रजपामुळे दोन्ही डोळ्यांना चांगले दिसू लागणे : जानेवारी २०१९ मध्ये मला त्यांचा भ्रमणभाष आला. त्यांनी सांगितले, ‘‘त्यांना उजव्या डोळ्याने काहीच दिसत नाही आणि डाव्या डोळ्याने केवळ ३० टक्के एवढ्याच प्रमाणात दिसते.’’ मी त्यांना डोळ्यांच्या विकारासाठी परात्पर गुरु बाबांकडून मंत्रजप घेण्यास सुचवले. त्यांनी परात्पर गुरु बाबांकडून मंत्रोपचार घेऊन ते श्रद्धापूर्वक केले. आश्‍चर्य म्हणजे त्यांच्या दोन्ही डोळ्यांना चांगले दिसू लागले.

११ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : पू. बाळासाहेब ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी जे सांगितले, ते अंतिम सत्य’, असे समजून त्यानुसार आज्ञापालन करतात. ते ‘परात्पर गुरु डॉक्टरांना काय अपेक्षित आहे आणि काय केले पाहिजे’, याविषयी अचूक सांगतात. त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती भाव असल्यानेे त्यांना अपेक्षित अशी साधना ते करतात.

‘पू. सुधाकर चपळगावकर यांच्यातील नम्रता, धर्मकार्याची तळमळ, मानवतावादी दृष्टीकोन आणि अल्प अहं यांमुळे त्यांनी सनातन संस्थेच्या इतिहासात एक आदर्श आमच्यापुढे ठेवला आहे’, असे मला वाटते. त्याविषयी मी परात्पर गुुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.६.२०१९)

सनातनचे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा उत्कट भाव दर्शवणारा प्रसंग !

‘वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा म्हणजेच ८ मे २०२० या दिवशी सनातनचे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा मला व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश मिळाला. त्यात त्यांनी ‘कृतज्ञ आहे’, असे लिहिले होते. मला त्या संदेशाचा अर्थ न समजल्याने मी त्यांना ‘समजले नाही पूजनीय काका’, असा संदेश पाठवला. तेव्हा संदेशांद्वारे झालेले आमचे संभाषण पुढे देत आहे.

पू. काका : आपल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. (मला मात्र तेव्हाही काही समजले नाही.)

मी : प.पू. डॉक्टर आणि आपली कृपा असू द्यावी काका.

पू. काका : कृपा परम पूज्य आणि देवाची आहेच. त्या कृपापर्वताला मी माझी काठी टेकवतो.

पूज्य काकांच्या या वाक्यातून त्यांचा प.पू. डॉक्टरांवरील उत्कट भाव लक्षात येतो. त्यांचा हा संदेश वाचल्यावर माझी भावजागृती झाली.

संदेशांद्वारे हे संभाषण झाल्यावर काही वेळाने मला समजले की, आज पूज्य काकांचा वाढदिवस असून दैनिकात त्यांचा लेख आल्याने त्यांनी वरील ‘कृतज्ञ आहे’, असा संदेश मला पाठवला होता. (मी दैनिक कार्यालयात सेवा करतो.) या प्रसंगातून असेही शिकायला मिळाले की, छोट्या-छोट्या कृतीतूनही पूज्य काकांमधील समष्टीप्रती असलेला कृतज्ञताभाव, सतर्कता, प्रीती इत्यादी दैवी गुणांचे दर्शन सहजरित्या होते.

पू. चपळगावकरकाकांच्या रूपात आम्हाला ‘अत्यंत प्रेमळ संतमूर्ती’ दिल्याविषयी आम्ही सर्व साधक प.पू. गुरुदेवांच्या सुकोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक