सिंधुदुर्ग जिल्हा ‘रेड झोन’ होण्यास सत्ताधार्यांची निष्क्रीयता आणि नियोजनशून्य कारभार उत्तरदायी ! – परशुराम उपरकर, माजी आमदार, मनसे
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ‘रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हा ‘रेड झोन’मध्ये जाण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार आणि आमदार उत्तरदायी आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची अशी अवस्था झाली आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सत्ताधार्यांची निष्क्रीयता सिंधुदुर्ग जिल्हा ‘रेड झोन’ होण्यास उत्तरदायी असल्याचा आरोप मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी केला.
याविषयी उपरकर म्हणाले,
१. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांचा पुढाकार आवश्यक आहे. इतर वेळी हेच खासगी डॉक्टर सेवा देतात, मग आता मागे का रहातात ?
२. जिल्हा रुग्णालयातील सेवा कोलमडली आहे. ‘पीएम् केअर’ मधून मिळालेले ‘व्हेंटिलेटर’ अद्याप जोडले नाहीत. ‘व्हेंटिलेटर’वर गेल्यावर लोकांचा मृत्यू होत आहे. पालकमंत्री घोषणा करतात; मात्र घोषणांनुसार प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही.
३. जिल्हा रुग्णालयाला अद्याप शववाहिनी दिली नाही. रुग्णवाहिका दिल्या; पण अद्याप चालक दिले नाहीत. ‘रॅपिड टेस्ट’ वाढवल्याने रुग्ण मिळत आहेत; पण त्यांच्यावर उपचार होत नाहीत. (अशा स्थितीत रुग्णांना देवाचाच आधार ! – संपादक)
४. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी जनतेसाठी सेवा देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी सांगतात की, ‘डॉक्टर सेवा द्यायला सिद्ध नाहीत.’ मुंबईप्रमाणे खासगी डॉक्टरनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाच्या काळात परिचारिकांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पदच !
परिचारिकांना त्रास देणारे डॉक्टर पालकमंत्र्यांनी बोलावूनही बैठकीला येत नाहीत. जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी अचानक कामबंद आंदोलन केल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वास्तव जनतेसमोर आले. आताच्या काळात मागण्यांसाठी परिचारिकांना आंदोलन करावे लागणे, हे लज्जास्पद आहे.