विविध भक्तीगीते आणि पसायदान म्हणत असतांना जाणवलेली सूत्रे आणि झालेली भावजागृती !
संगीत आणि गायन यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
१. ‘रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील ?’
‘९.५.२०१७ या दिवशी ‘रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील ?’, हे भावगीत म्हणत असतांना ‘रामा’ या शब्दातून गोडवा आणि देवाला आर्ततेने मारलेली हाक जाणवली, तर ‘कधी रे येशील ?’, असा मी देवापुढे हट्ट केल्याचे जाणवले. ‘रामा’ हा शब्द उच्चारताच वनवासाला गेलेला ‘श्रीराम’ आणि पर्णकुटीतून बाहेर येतांना पाठीवर बाणांचा भाता, हातात धनुष्यबाण घेतलेला ‘श्रीराम’ दिसला. केवळ या दृश्याने मी पुष्कळ आनंदीत झाले आणि माझा भाव जागृत झाला.
२. श्रीरामाचे चरण धरावे, दर्शन मात्रे पावन व्हावे !
‘श्रीरामाचे चरण धरावे, दर्शन मात्रे पावन व्हावे !’, हे भक्तीगीत म्हणतांना ‘आपल्या आजूबाजूला कुणीही नाही’, या जाणिवेतून आणि अंतर्मनातून दाटून आलेल्या भावामुळे तेच-तेच शब्द पुन:पुन्हा म्हणावेसे वाटले.
३. मुकुंदा रुसू नको इतुका, विनविते तुझी तुला राधिका
१४.५.२०१७ या दिवशी ‘मुकुंदा रुसू नको इतुका, विनविते तुझी तुला राधिका’ या ओळी मंद गतीने म्हटल्यानंतर ‘श्रीकृष्ण हे गीत भावपूर्ण ऐकतो आहे’, याची अंतर्मनाला जाणीव झाली. तीच ओळ जलद गतीने म्हटल्यावर श्रीकृष्ण ऐकतो; पण शब्द विस्कळीत झाल्याप्रमाणे जाणवले.
रुसलेल्या श्रीकृष्णाला निरपेक्षपणे आळवणारी भक्तीरूपी राधिका । ‘राधिका’ शब्दाचा अर्थ इतका खोलवर गेला की, कृष्णाप्रतीचा बाल्यावस्थेतील भाव अनुभवून भावजागृती झाली आणि म्हटले, ‘श्रीकृष्णा, इतका नको रे रुसू !’ या शब्दांतील आर्तभाव पुष्कळ अनुभवला आणि मी हुंदके देऊन रडू लागले.
४. ‘विठ्ठला समचरण तुझे धरिते, रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते’
२०.५.२०१७ या दिवशी सकाळी ‘विठ्ठला समचरण तुझे धरिते, रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते’, हे भावगीत म्हणत असतांना माझ्या समोर सनातननिर्मित ची श्रीगणेशाची मूर्ती होती. हे शब्द म्हणू लागल्यानंतर श्रीगणेशाचा आशीर्वादरूपी उजवा हात आणि बोटे मागे-पुढे हालतांना दिसली. त्या वेळी भाव जागृत होऊन पुनःपुन्हा पहावेसे वाटले.
५. ‘ॐ कार प्रधान रूप गणेशाचे’
२६.५.२०१७ या दिवशी ‘ॐकार प्रधान रूप गणेशाचे’ हे भावगीत म्हणत असतांना सनातननिर्मित श्रीगणेशाच्या मूर्तीसमोर बसले होते. डोळ्यांसमोर श्रीगणेशाच्या पाठीमागून सूर्यप्रकाशासारखी किरणे आणि त्यातून ‘ॐ’ दिसू लागला. पुन्हा वरील शब्द म्हणू लागले, तेव्हा ‘अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु ।’, असे देवाने म्हणवून घेतले. त्या वेळी पुष्कळ प्रमाणात भावजागृती झाली.
६. पसायदान
२७.५.२०१७ या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे ‘पसायदान’ देवाने म्हणायला सुचवले. प्रत्यक्षात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (त्या वयातही तेजस्वी आणि त्यांची केसांची रचना) आपण छायाचित्रात पहातो, तसे दिसू लागले. ते एक-एक ओवीचे पान हातात घेऊन दाखवत होते. ज्ञानेश्वर माऊलींचे ते रूप, गुरूंच्या कृपेने पहाता आणि अनुभवता येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञता वाटली.
गुरुमाऊली, अनुभवलेली स्थिती शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला. गुरुमाऊली, या शब्दांच्या माध्यमातून, आकलनातून जो भाव अंतर्मनात संक्रमित करण्यासाठी तुम्ही प्रत्येक शब्द, त्याचे रूप आणि गंध या अज्ञानी जिवाला अनुभवायला दिलेत, त्यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञ आणि कृतज्ञ !’
– श्रीमती अंजली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |