‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत सातारा पोलिसांकडून ३ कोटी रुपये दंड वसुली !
सातारा, २६ मे (वार्ता.) – मार्च २०२१ पासून चालू झालेली कोरोनाची दुसरी लाट थांबवण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहिम चालू केली; मात्र लोकांनी दळणवळण बंदीच्या काळात नियम पाळण्याऐवजी पोलिसात दंड भरला. मार्च ते मे या कालावधीत नियम मोडणार्यांवर सातारा पोलिसांनी कारवाई करत ३ कोटी १० लाख १ सहस्र ९०० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.
धीरज पाटील पुढे म्हणाले, ‘‘३ मार्चपासून दळणवळण बंदीविषयी कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये विनामास्क फिरणार्यांकडून ८१ लाख ४७ सहस्र ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे १ कोटी ९२ लाख ३ सहस्र ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. १४ मार्चपासून विनाकारण फिरणार्यांवर कारवाई करत १९ लाख २० सहस्र ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कालावधीत नियमबाह्य विवाह समारंभ आयोजित करणार्या लग्न आयोजक आणि मंगल कार्यालय मालक यांच्याकडून १ लाख ९४ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्या दुकानदारांकडून ८ लाख ६ सहस्र १०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. खासगी आणि लक्झरी प्रवासी वाहतूक करणार्यांकडून नियमांचे उल्लंघन केल्याने ७ लाख ३० सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला, तसेच नियमांचे उल्लंघन करणार्या जिल्ह्यातील ४ सहस्र ६४८ दुचाकी, तर २३९ चारचाकी वाहने पोलिसांनी कह्यात घेतली असून दळणवळण बंदीनंतरच ही वाहने संबंधितांना परत करण्यात येणार आहेत.’’