आईच्या आजारपणात आणि मृत्यूनंतर परात्पर गुरुमाऊलींनी संतांच्या माध्यमातून दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्याची सिद्धता आधीच करून घेतल्याची अनुभूती घेणार्‍या कु. वर्षा जबडे !

सौ. वैजयंती रमणलाल जबडे (वय ६४ वर्षे) यांचे ९.५.२०२१ या दिवशी अकलूज (जि. सोलापूर) येथे अल्पशा आजाराने निधन झाले. २१.५.२०२१ या दिवशी त्यांचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्त रामनाथी आश्रमात रहाणारी त्यांची मुलगी कु. वर्षा जबडे हिला आईच्या मृत्यूविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि संतांनी दिलेल्या सर्व प्रकारच्या आधारामुळे मनाला जाणवलेली स्थिरता यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. (सौ.) वैजयंती जबडे

१. आईच्या मृत्यूविषयी मिळालेली पूर्वसूचना – जानेवारी मासात घरून आश्रमात येतांना ‘आईची ही शेवटची भेट आहे’, असा विचार मनात येणे

कु. वर्षा जबडे

९.५.२०२१ या दिवशी माझ्या आईचे निधन झाले. जानेवारी २०२१ मध्ये मी घरून (अकलूज, सोलापूर येथून) रामनाथी आश्रमात आले. घरी असतांना माझ्या मनात १ – २ वेळा विचार येऊन गेला, ‘आता माझी आणि आईची ही शेवटची भेट आहे.’ त्या वेळी मी ‘हा विचार नकारात्मक आहे’, असे म्हणून दुर्लक्ष केले. आई गेल्यावर मला त्या विचाराची जाणीव झाली.

२. आईच्या निधनानंतर विविध संतांनी घेतलेली काळजी आणि केलेले मार्गदर्शन यांमुळे अनुभवलेली मनाची स्थिरता !

२ अ. आईची स्थिती गंभीर झाल्यावर रडायला येणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला जप करताच भावनाशीलता न्यून होणे: १५.४.२०२१ या दिवसापासून माझी आई रुग्णालयात होती. तेव्हा तिची प्रकृती ठीक होती. नंतरच्या आठवड्यात तिची स्थिती गंभीर झाली. त्या वेळी मला तिच्याविषयी वाईट वाटून रडायला येत होते. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी आईसाठी ‘हरि ॐ तत् सत् चित् ।’ हा नामजप मला करण्यास सांगितला. त्या वेळी मला ‘माझ्यासाठीच नामजपादी उपाय मिळाले’, असे वाटून आईविषयीची भावनाशीलता न्यून झाल्याचे जाणवले. त्यानंतर आईची स्थिती काही प्रमाणात सुधारली; पण तिसर्‍या आठवड्यात तिची स्थिती पुष्कळ गंभीर झाली आणि ती जगू शकली नाही. या कालावधीत गुरुमाऊलींनी ‘संतांच्या माध्यमातून या प्रसंगाला सामोरे जाण्याची माझ्या मनाची सिद्धता आधीच करून घेतली’, असे मला वाटले. सद्गुरु गाडगीळकाका जेव्हा नामजपादी उपाय सांगायचे, त्या वेळी ते मला आधारही द्यायचे. ते कधी बोलून आधार द्यायचे, तर कधी न बोलताही मला त्यांचा आधार वाटायचा.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू आईजवळ बसले असून तिची काळजी घेत असल्याचे दिसणे अन् ‘ईश्‍वरच आईची काळजी घेत असल्याने ईश्‍वरेच्छेने तिचे चांगलेच होईल’, असे वाटणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू मध्ये मध्ये आईची विचारपूस करत. यामध्ये ‘आईच्या प्रारब्धाचा भाग कसा आहे आणि साधनेच्या दृष्टीने कसे पहायचे ?’, हे त्या मला समजावत होत्या. पू. जाधवकाकू आईची नियमित दृष्ट काढत, तसेच तिच्यासाठी प्रार्थना करायच्या. मी पू. काकूंना म्हणाले, ‘‘तुम्ही आईसाठी एवढा वेळ का देता ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘त्यांनी लहानपणी वैष्णवीला (पू. (सौ.) जाधव काकूंच्या मुलीला) सांभाळल्याने मी साधना करू शकले. मी आता त्यांच्यासाठी हे करूच शकते.’’ त्या वेळी मला असे वाटले, ‘पू. काकूंमुळे आईची नकळत ती साधनाच झाली होती; पण त्या संत असल्याने आईप्रती कृतज्ञताभावात राहून हे करत आहेत.’ त्यांनी सांगितले, ‘‘मी जेव्हा आईला सूक्ष्मातून पहाते, तेव्हा आईसोबत परात्पर गुरु डॉक्टरही दिसतात. ते तिची काळजी घेत आहेत.’’

​त्या वेळी मलाही असेच दिसायचे की, परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आईजवळ बसले असून तिची काळजी घेत आहेत. ‘ईश्‍वरच संतांच्या माध्यमातून आईची काळजी घेत आहे, तर आईचे जे होईल, ते ईश्‍वरेच्छेने चांगलेच होईल !’, असे मला वाटत होते.

२ इ. आईचा मृत्यू झाल्यावर पू. जाधवकाकूंनी लढाऊवृत्तीने प्रसंगाला सामोरे जाण्यास सांगणे आणि पू. काकूंच्या संकल्पाने घरच्यांचे सांत्वन करता येणे : आई गेल्याचे कळले. त्या वेळी पू. जाधवकाकूंनी सांगितले, ‘‘तू भावनाशील होऊन रडलीस, तर आईला त्रास होणार. त्यामुळे न रडता तू घरच्यांना धीर दे. त्यांना नामजप करण्यास सांग. ‘लढाऊवृतीने या प्रसंगाला सामोरे जाणे’, ही साधना आहे. तू स्थिर राहिलेली पाहून तुझ्या घरच्यांना साधनेचे महत्त्व कळेल.’’ पू. काकूंच्या संकल्पानेच मी घरातल्यांना धीर देऊन नामजपाचे महत्त्व सांगू शकले. घरच्यांचे सांत्वन करतांना माझ्याकडून पुष्कळ चांगले दृष्टीकोन सांगितले जात होते. त्या वेळी असे जाणवत होते की, देव माझेच आध्यात्मिक स्तरावर सांत्वन करत आहे. ज्या बहिणींना साधना ठाऊक होती, त्यांनाही हा भाग लगेच लक्षात येऊन त्याही स्थिर झाल्याचे जाणवले.

२ ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आईच्या निधनाच्या वार्तेने वाईट स्पंदने न येता चांगले वाटल्याने तिला सद्गती मिळाल्याचे सांगून आईला पुढची गती मिळण्यासाठी अधिक नामजप करण्यास सांगणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्याशी बोलल्या. मी त्यांना म्हटले, ‘‘आईला सद्गती मिळेल ना ?’, याचीच मला काळजी वाटते.’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आईची निधनवार्ता ऐकली. त्या वेळी वाईट स्पंदने न येता चांगले आणि शांत वाटले. हे सद्गती मिळण्याचेच लक्षण आहे. आईच्या अंत्यविधींमध्ये, तसेच आईला पुढची गती मिळण्यात वाईट शक्तींचे अडथळे येऊ नयेत, यासाठी तू अधिकाधिक नामजप कर आणि ‘आई गुरुचरणी आहे’, असा भाव ठेव.’’ त्यांच्या संकल्पाने माझ्याकडून सेवा आणि नामजप होऊ लागला अन् मनाला पुष्कळ स्थिरता आली.

३. आई गेल्यावर ‘व्हिडिओ कॉल’वर अग्नीसंस्कार विधी पहातांना कोणत्याच भावना जागृत न होता आतून स्थिरता जाणवणे

​आई गेल्यावर भावाने ‘व्हिडिओ कॉल’द्वारे मला आईला दाखवले. त्या वेळी तिचा तोंडवळा शांत वाटला. नंतर मी तिचा अग्नीसंस्कार विधी पाहिला. त्या वेळी माझ्या मनात आईविषयी कसल्याच भावना जागृत झाल्या नाहीत. त्या वेळी मला स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव होत नव्हती आणि आतून पुकळ स्थिरता जाणवत होती. मला असे वाटले की, देवाने मला चैतन्याच्या आणि शक्तीच्या एका कवचात ठेवले आहे.
​‘परात्पर गुरुमाऊली आणि सर्व संत यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास मला शब्दच अल्प पडतात. खरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुमाऊली, मी खरंच अपात्र आहे. तुम्हीच मला यासाठी पात्र बनवा’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आणि कृतज्ञता !’

– कु. वर्षा जबडे, सनातन आश्रम, गोवा. (१२.५.२०२१)


आईचे निधन झाल्याचे समजल्यावर प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे शांत आणि स्थिर असणार्‍या रामनाथी आश्रमातील कु. वर्षा जबडे अन् अशा साधकांना घडवणार्‍या प.पू. गुरुदेवांचे पू. (सौ.) शैलजा परांजपेआजींनी उलगडलेले असामान्यत्व !

पू. (सौ.) शैलजा परांजपे

१. आईचे निधन झाल्याचे समजल्यावर कु. वर्षा शांत आणि स्थिर असणे अन् ‘केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी स्थिर आहे’, असे तिने सांगणे ​

‘९.५.२०२१ या दिवशी आश्रमातील साधिका कु. वर्षा जबडे हिच्या आईचे सोलापूर येथे निधन झाले. या प्रसंगातही ताई पुष्कळ शांत आणि स्थिर दिसत होती. तिने भावनेत न अडकता परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेच्या बळावर कठीण प्रसंगावर धैर्याने मात केली. तिला दळणवळण बंदीमुळे घरी जाता येत नव्हते. तिच्यातील ही स्थिरता पाहून सर्व साधकांना शिकायला मिळाले. तिने सर्व साधकांसमोर आदर्श ठेवला.

​मी ताईशी बोलत असतांनाही ती अत्यंत स्थिर होती. ‘एवढे होऊनही केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी स्थिर आहे’, असे एकच वाक्य तिच्या मुखातून येत होते.

२. पू. (सौ.) शैलजा परांजपे यांची भावस्पर्शी भेट !

२ अ. पू. (सौ.) शैलजा परांजपे यांनी वर्षा स्थिर असल्याचे पाहून ‘केवळ सनातनचे साधकच अशा परिस्थितीवर श्रद्धेने मात करत आहेत आणि ही केवळ प.पू. गुरुदेवांची कृपा आहे’, असे सांगणे : १५.५.२०२१ या दिवशी आम्ही (मी आणि वर्षाताई) सनातनच्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मातोश्री) यांच्याशी बोलत होतो. त्या वेळी पू. आजी वर्षाताईला म्हणाल्या, ‘‘मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तुझ्या आईचे निधन झाल्याचे सांगितले. मी त्यांना सांगितले, ‘‘वर्षा स्थिर आहे आणि तिच्याकडे पाहिल्यावर असे काही झाल्याचे जाणवतही नाही.’’ तेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आई, प.पू. गुरुदेवांनी आपल्या साधकांना कसे घडवले आहे !’’ पुढे पू. परांजपेआजी आम्हाला म्हणाल्या, ‘‘केवळ प.पू. गुरुदेवांचे प्रिय साधकच असे आहेत. समाजातील अन्य व्यक्तींची मानसिक स्थिती कशी झाली असती ? केवळ सनातनचे साधकच अशा परिस्थितीवर श्रद्धेने मात करत आहेत. ही केवळ प.पू. गुरुदेवांची कृपा आहे.’’

२ आ. पू. (सौ.) शैलजा परांजपे यांनी ‘प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा असलेल्या जिवाचा उद्धार ते करणारच आहेत’, असे सांगणे : पू. परांजपेआजी म्हणाल्या, ‘‘अगं, तुम्ही मुलींनी लहान वयातच प.पू. गुरुदेवांचे मन जिंकले. तुम्ही साधना समजून घेतली. तुम्ही सर्व गोष्टींचा त्याग करून प.पू. गुरुदेवांच्या चरणी आलात. आम्ही सनातनला समजून घ्यायला किती उशीर केला. केवळ प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा असली, तरी पुरे आहे. अशा साधकांचे रक्षण परात्पर गुरु डॉक्टर करणारच आहेत. साधक कुठेही असू दे, त्या जिवाचा उद्धार ते करणार आहेत.’’

पू. परांजपेआजींचे भावस्पर्शी बोलणे ऐकून आमचा भाव जागृत होत होता. माझ्या शरिरावर रोमांच आले. त्यांचे बोलणे ऐकून मला ‘मायेतील आई-वडिलांपेक्षा आध्यात्मिक आई-वडील (परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ) हेच आपले सर्वस्व आहेत’, असे वाटले.

२ उ. वर्षाताईने पू. आजींना आलिंगन दिले. तेव्हा ‘ताई तिच्या आईलाच आलिंगन देत आहे’, असे मला जाणवत होते.’

– सौ. आराधना चेतन गाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक