‘यास’ चक्रीवादळ ओडिशा आणि बंगाल यांना झोडपून झारखंडच्या दिशेने मार्गस्थ !

भुवनेश्‍वर (ओडिशा) – भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेले ‘यास’ नावाचे चक्रीवादळ आता झारखंडच्या दिशेने जात आहे. यापुढच्या प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर ओडिशामध्ये असणार्‍या धामरा बंदर आणि बालासोर यांच्यामधील भागाला या चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये १२० ते १४० किलोमीटर प्रतिघंटा वेगाने वारे वहात होते. त्यामुळे किनारी भागात असणार्‍या घरांची आणि नागरी सुविधांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. एन्.डी.आर्.एफ्., तटरक्षकदल, भारतीय नौदल अशा सर्व यंत्रणा बचावकार्य करत आहेत. ओडिशासमवेतच बंगालच्या किनारी भागातल्या पूर्व मिदनापूर आणि दक्षिण २४ परगणा या भागांनाही वादळाचा तडाखा बसला; मात्र तोपर्यंत चक्रीवादळाचा वेग ताशी ९० किलोमीटर इतका कमी झाला होता. ओडिशा, बंगाल आणि झारखंड या तिन्ही राज्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर २५ मेच्या दिवशी अनुमाने १२ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हालवले.