कोरोनासह ‘म्युकरमायकोसिस’च्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
मुंबई – हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात ‘म्युकरमायकोसिस’च्या औषधांची निर्मिती होणार आहे, तसेच जागतिक निविदेच्या माध्यमातून ही औषधे उपलब्ध होतील. या रोगावरील उपचारासाठीचा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ‘म्युकरमायकोसिस’ आणि कोरोना यांच्या राज्यातील संसर्गाविषयी २५ मे या दिवशी मंत्रालयामध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढाव्याची बैठक झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या वेळी अजित पवार म्हणाले की, ‘म्युकरमायकोसिस’चे निदान झाल्यावर पहिल्या टप्प्यात तातडीने औषधोपचार चालू केल्यास हा रोग बरा होतो. त्यामुळे रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार चालू झाल्यास कुणालाही जीव गमवावा लागणार नाही. ‘म्युकरमायकोसिस’च्या औषधांचे नियंत्रण केंद्रशासनाच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्याने संकेतस्थळावर रुग्णांची अद्ययावत नोंदणी करावी. त्यानुसार औषधे उपलब्ध करून देता येतील.