विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली !
|
संभाजीनगर – मराठा आरक्षण प्रश्नी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘शासनाने मराठा समाजाला ‘ई.डब्ल्यू.एस्.’ आरक्षण लागू करावे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केले याला हे शासनच उत्तरदायी आहे’, असे मेटे यांनी म्हटले आहे.
विनायक मेटे पुढे म्हणाले की,
१. ज्यांना कोणतेही आरक्षण मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी अन् कोणत्याही समाजाच्या लोकांसाठी १० टक्के आरक्षण दिले आहे. यामध्ये मराठा समाजाला घेण्याची मागणी केली होती; मात्र आता १५-२० दिवस झाले, तरी यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.
२. ५ जून या दिवशी असंतोष व्यक्त करण्यासाठी बीड येथून आंदोलनाचा प्रारंभ करण्यात येईल. ‘मराठा काँग्रेस संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा’ या नावाने हे आंदोलन करण्यात येईल. ‘या मोर्च्याला शासनाने अनुमती द्यावी’, अशी आमची विनंती आहे. सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील.