सांगली जिल्ह्यातील घरकाम करणार्या कामगार महिलांना शासनाचा आर्थिक साहाय्य निधी त्वरित वितरित करावा ! अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे
सांगली – कोरोनाच्या पहिल्या लाटेत घरकाम कामगार महिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे अनेक महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. मुख्यमंत्र्यांनी या महिला कामगारांना प्रत्येकी १ सहस्र ५०० रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील घरकाम महिला कामगारांना हा निधी त्वरित वितरित करावा, अशा मागणीचे निवेदन भाजपच्या नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. दळणवळण बंदी होऊन एक मास उलटला, तरी हा निधी कामगारांच्या अधिकोषामधील खात्यात वर्ग झालेला नाही; कारण कामगार कार्यालयातून होणारी नोंदणी आणि नूतनीकरण गेल्या ६ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक महिला या लाभापासून वंचित रहाणार आहेत.
२. वर्ष २०११ ते २०२१ पर्यंत नोंद केलेल्या सर्व घरकाम कामगारांना हा निधी वितरित व्हावा. नोंदणी वर्षांचे टप्पे न करता सर्वांना एकत्रित हा निधी वितरित व्हावा.
३. नोंदणी केली आहे; परंतु नूतनीकरण झाले नाही अशा सर्व कामगारांना याचा लाभ मिळावा. बंद असलेली नोंदणी कामगार कार्यालयाकडून त्वरित चालू करावी.
४. घरकाम कामगारांकरिता कामगार कार्यालयांमध्ये स्वतंत्र कर्मचारी आणि अधिकारी नेमावेत.