पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त पुण्यातील ‘दगडूशेठ गणपति’ समोर ५०० शहाळ्यांची आरास

दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेतकर्‍यांच्या समस्या यांसमवेत ‘वैश्‍विक महाविघ्न कोरोना’ गणरायाच्या कृपेने लवकर दूर व्हावे, या भावनेने महोत्सवाचे आयोजन

दगडूशेठ गणपति’ समोर केलेली ५०० शहाळ्यांची आरास

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने २६ मे या दिवशी दगडूशेठ गणपति मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. या वेळी ५०० शहाळे आणि फुलांची आरास करण्यात आली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकरगुरुजी यांच्या हस्ते गणेश जन्माची पूजा आणि अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयागही झाला. ‘वैशाख वणव्यापासून सर्व भारतियांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेतकर्‍यांच्या समस्या यांसमवेत वैश्‍विक महाविघ्न कोरोना गणरायाच्या कृपेने लवकर दूर व्हावे’, ही भावना महोत्सवामागे होती.

उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. दुसर्‍या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.