विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधीस्थळे, तसेच अन्य मंदिरांचा जीर्णोद्धार करावा ! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोल्हापूर, २६ मे (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेला विशाळगड किल्ला हा पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांच्याकडून दुर्लक्षित होऊन त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. येथील ऐतिहासिक समाधीस्थळे आणि मंदिरे यांचीही मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. तरी विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून ऐतिहासिक वारसा जपणारी आणि स्फूर्ती देणारी नरवीर बाजीप्रभू देशपांडे अन् फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधीस्थळे, तसेच तेथील अन्य मंदिरांचा जीर्णोद्धार करावा, या मागणीचे पत्र कोल्हापूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अमर शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
श्री. अमर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की
१. आपण गडकोट संवर्धनाचे कामकाज चालू केल्याविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपला अभिमान वाटतो.
२. विशाळगडाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीची स्थापना केली आहे. ही कृती समिती विशाळगड अतिक्रमणातून मुक्त करणे, तेथील ऐतिहासिक वारशांचे जतन, रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे.
३. तरी या किल्ल्याचे रक्षण, जतन, संवर्धन यांसाठी आपण व्यक्तीश: लक्ष घालावे. महाराष्ट्रातील जे ५ किल्ले संवर्धनासाठी घेण्यात येणार आहेत, त्यात विशाळगडाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करावा. या निमित्ताने शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक वारशास पुन्हा एकदा सुवर्णकाळ प्राप्त करून देण्यासाठी साहाय्यभूत व्हावे.
४. या पत्रासमवेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांचा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला विशाळगडाच्या दुरवस्थेच्या संदर्भातील लेख जोडत आहे.