सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे ! – प्रमोद जठार, माजी आमदार, भाजप
कणकवली – सध्या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून दिवसागणिक येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाने लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आतातरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनाद्वारे जठार यांनी केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
१. सिंधुदुर्गमधील परिस्थिती हाताळण्यासाठी येथे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना योग्य ते निर्देश द्यावेत.
२. प्रत्येक तालुका ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र, तसेच नव्याने चालू करण्यात आलेली सर्व कोविड सेंटर येथे त्वरित मोबाईल ऑक्सिजन यंत्रणा बसवावी, जेणेकरून ऑक्सिजनअभावी कोणताही रुग्ण दगावणार नाही.
३. प्रत्येक जिल्ह्यात ‘१००’ अथवा ‘१०८’ क्रमांकाच्या धर्तीवर ‘टोल फ्री’ क्रमांकाची व्यवस्था करावी. त्यामुळे ऑक्सिजन खाटा, व्हेंटिलेटर आदींविषयी कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना तात्काळ आणि २४ घंटे माहिती मिळेल. त्यामुळे रुग्णांचा खोळंबा होणार नाही.
४. सध्या कोरोनाविषयीचा अहवाल ४ दिवसांनंतर मिळतो, तो त्याच दिवशी मिळणे आवश्यक आहे; कारण एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे त्वरित न समजल्याने ती व्यक्ती इतरत्र फिरल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतो. तसेच या ४ दिवसांत अशा रुग्णांवर उपचार चालू न झाल्यामुळे त्यांचा आजार बळावत जाऊन अहवाल मिळेपर्यंत असा रुग्ण गंभीर झालेला असतो आणि ऐनवेळी त्याला व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे.
५. कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिविर सोबत फेबीफ्ल्यू गोळ्यांची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक रुग्णास ७ दिवसांत साधारणतः ३४ गोळ्या घ्याव्या लागतात. ज्याचे मूल्य २ सहस्र ५०० रुपये एवढे आहे. गरीब रुग्णांना हा औषधोपचार परवडणारा नाही. त्यामुळे या औषधांचा पुरवठा सरकारच्या माध्यमातून करण्यात यावा.
६. कोरोनाच्या काळात आरोग्य क्षेत्रामध्ये मनुष्यबळ अल्प पडत आहे. त्यासाठी शासनाकडून शिक्षक, महसूल विभागामधील कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत नसलेले कर्मचारी यांच्यावर अनेक दायित्वे सोपवली जात आहेत. अनेक ठिकाणी होमिओपॅथी डॉक्टरांना सेवेमध्ये सामावून घेतले जात आहे; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टर कोरोना रुग्णांची सेवा करण्यास सिद्ध असूनही स्थानिक प्रशासनाकडून त्यांना सेवेत रुजू करून घेतले जात नाही. त्यामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना तात्काळ सेवेत सामावून घेत आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण अल्प करावा.