दळणवळण बंदी असतांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची वाहतूक कशी होते ? – सीताराम गावडे, संपादक, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल
सावंतवाडी – कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढायला लागल्यावर महाराष्ट्र शासनाने दळणवळण बंदी घोषित केली. सर्वत्र दळणवळण बंदी असतांनाही अवैध मद्य व्यावसायिकांचा व्यवसाय मात्र मोठ्या प्रमाणात चालू आहे. दिवसाढवळ्या चालू असलेल्या या अवैध कृत्याविषयी कुणी आवाज उठवत नाही, तोपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खाते शांत असते किंवा त्यांच्या सहकार्यानेच हे सर्व चालत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही, असे परखड मत ‘कोकण ब्रेकिंग लाईव्ह न्यूज चॅनल’चे संपादक सीताराम गावडे यांनी त्यांच्या संपादकीयमध्ये मांडले आहे.
या संपादकीयमध्ये सीताराम गावडे पुढे म्हणतात की, दळणवळण बंदीच्या काळात वेगवेगळ्या कल्पना लढवून दिवसाकाठी कोट्यवधी रुपयांचे मद्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तसेच महाराष्ट्र राज्यात पोचवले जात आहे. यापूर्वी ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल’मधून या विषयावर आवाज उठवल्यावर राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी विशेष पथकांची नियुक्ती केली आणि अवैध मद्य व्यवसायाला मोठ्या प्रमाणात आळा बसला. त्यामुळे ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल’ने अवैध मद्याच्या विरोधातील मोहीम थांबवली; मात्र आता पुन्हा एकदा अवैध मद्य व्यावसायिक दिवसाढवळ्या व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे गेल्या २ मासांपासून गोव्यातील अवैध मद्य सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात येत आहे. याविषयी ग्रामीण भागातूनही तक्रारी येऊ लागल्याने या अवैध व्यवसायाची नोंद घेणे आम्हाला भाग पडले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्य आणण्यासाठी हे व्यावसायिक कोणता मार्ग वापरत आहेत, हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना चांगलेच ठाऊक आहे. तरीही मिळणार्या हप्त्यामुळे हे सर्वजण मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप गावडे यांनी केला आहे.
सावंतवाडी येथे अवैध मद्य जप्त
सावंतवाडी – गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ स्विफ्ट गाड्यांतून होणार्या अवैध मद्याच्या वाहतुकीवर पोलिसांनी येथील गाळेल तिठा येथे कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अवैध मद्यासह एकूण १४ लाख ८१ सहस्र ७६० रुपये मूल्याचा मुद्देमाल कह्यात घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाची गेल्या २ दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई आहे.