नवीन झुआरी पुलाचा एक मार्ग डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नवीन झुआरी पुल

पणजी, २५ मे (वार्ता.) – नवीन झुआरी पुलाचा एक मार्ग (लेन) चालू वर्षी डिसेंबर मासात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. नवीन झुआरी पुलाचे बांधकाम कोरोना महामारीमुळे रखडले आहे. यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणे नवीन झुआरी पुलाचा एक मार्ग चालू मासात वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘तिसर्‍या मांडवी पुलाचे उर्वरित बांधकाम १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी आशा आहे. गोव्यात ३ आयआयटी प्रकल्पांचे बांधकाम, शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि रुग्णालयांचे बांधकाम जलदगतीने घेण्याची सूचना देण्यात आली आहे’’