कोरोनासह महाराष्ट्रावर आता ‘म्युकरमायकोसिस’चे संकट !
रुग्णसंख्या पोचली २ सहस्र २४५ वर !
मुंबई – कोरोनाच्या महामारीतून राज्य सावरत असतांना आता ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य रोगाचे प्राबल्य राज्यात वाढत आहे. राज्यातील या रुग्णांची संख्या २ सहस्र २४५ वर पोचली असून या रोगामुळे आतापर्यंत राज्यातील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २५ मे या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहून राज्यातील कोरोना आणि ‘म्युकरमायकोसिस’च्या संसर्गाचा आढावा घेतला.
जूनच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरून ‘म्युकरमायकोसिस’च्या ६० सहस्र लसी उपलब्ध होतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
राज्यात ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची संख्या वाढत असून या रोगावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ‘अॅम्फोटेरेसीन बी इंजेक्शन’ उपलब्ध होण्यासाठी राज्यशासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्या माध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या ६० सहस्र लसी आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात येतील.
टोपे पुढे म्हणाले,
१. या ‘इंजेक्शन’चे मूल्य अधिक आहे. केंद्रशासनाकडून या ‘इंजेक्शन’च्या वाटपाचे नियंत्रण आणि रुग्णसंख्या यांनुसार जिल्ह्यांना पुरवठा होत आहे.
२. ‘म्युकरमायकोसिस’ या रोगाला महाराष्ट्र शासनाने ‘नोटिफाईबल डिसीस्’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे.
३. ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’तून ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असून त्यासाठी राज्यातील १३१ रुग्णालये निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे.
४. सध्या राज्यात या रोगाच्या १ सहस्र ७ रुग्णांवर उपचार चालू आहेत. या रुग्णांची अद्ययावत माहिती ‘आय.डी.एस्.पी.’ या संकेतस्थळावर दिली जाणार आहे.