गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार्या उपक्रमांत सहभागी होऊन गुरुप्राप्तीचे ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न वाढवूया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सोलापूर – कोरोना संसर्गाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती वाढत चालल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. साधना वाढवण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ ही अमूल्य संधी साधकांना प्राप्त झाली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधकांनी विहंगम अध्यात्मप्रसार करून गुरूंची कृपा संपादन करूया. गुरूंनी सूक्ष्मातून सर्व कार्य केलेलेच आहे, आपण केवळ निमित्तमात्र आहोत. गुरुपौर्णिमेला केवळ ६० दिवस शेष आहेत. ‘ध्येयाचा ध्यास असेल, तर कष्टाचा त्रास होत नाही’, याची जाणीव ठेवून या जन्मातच मला गुरुप्राप्ती करायची आहे, हे ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न वाढवूया, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील साधक, ‘सनातन प्रभात’चे वाचक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी नुकतेच ‘ऑनलाईन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या शिबिरामध्ये २ सहस्रांहून अधिक जण सहभागी झाले होते. या शिबिराचे सूत्रसंचालन पुणे येथील कु. वैभवी भोवर यांनी केले.
या शिबिरामध्ये ‘गुरुपौर्णिमेनिमित्त ‘ऑनलाईन’ विहंगम अध्यात्मप्रसार कसा करावा ?’, या विषयावर सौ. मनीषा पाठक (पुणे) आणि कु. दीपाली मतकर (सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले, तर ‘गुरुपौर्णिमेच्या सेवेत विविध गुण आत्मसात करण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ?’, याविषयी डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे (कोल्हापूर) आणि सौ. उल्का जठार (सोलापूर) यांनी मार्गदर्शन केले. ‘स्वतःवर असलेले विविध ऋण (कर्ज) फेडण्यासाठी धनाचा त्याग कसा उपयुक्त ठरतो ?’, या विषयावर सौ. संगीता कडूकर (कोल्हापूर) आणि सौ. ज्योती दाते (पुणे) यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या समारोप प्रसंगी जिज्ञासू धर्मप्रेमींनी ते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार्या विविध उपक्रमांत कसे सहभागी होणार ? याविषयी मनोगत व्यक्त केले.
गुरुपौर्णिमेचा प्रसार व्यापक स्तरावर करून गुरुकृपा संपादन करूया ! – सौ. मनीषा पाठक, सनातन संस्था
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करणे, विविध ठिकाणी ‘ऑनलाईन’ नामसत्संगांचे आयोजन करणे आणि सामाजिक माध्यमांद्वारे अध्यात्मप्रसार अशा विविध माध्यमांद्वारे प्रसाराचे नियोजन करूया. यासाठी साधकांनी प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करूया. ‘सनातन प्रभात’चे वाचक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनीही या सेवेत सहभागी होऊन साधनेचे प्रयत्न वाढवूया.
हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी नेतृत्व गुण आवश्यक ! – डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, सनातन संस्था
सेवेच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी दैवी गुण आपल्यात येणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी नेतृत्व गुणाचा लाभ होणार आहे. हा गुण आत्मसात करण्यासाठी आपल्यातील भावनाशीलता, प्रतिमा जपणे हे दोष घालवण्यासाठी स्वयंसूचना देऊया. ‘आज्ञापालन’ या गुणाच्या माध्यमातून देवाला अपेक्षित अशी गुरुसेवा होण्यासाठी आपल्यातील शरणागती वाढून साधनेतील आनंद घेता येणार आहे.
|