कोरोनातून बरे झालेल्या १३ मुलांना ‘मीस’ आजाराने ग्रासले !

  • लहान मुलांवर उपचारासाठी सिद्धता    

  • रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर !

संभाजीनगर – कोरोना होऊन गेलेल्या लहान मुलांना ‘मल्टिसिस्टिम इफ्लेमॅटरी सिंड्रोम’ (मीस) आजाराची लागण होत आहे. सध्या या आजाराचे १३ रुग्ण येथील घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. २ मासांत या आजाराने ग्रासलेल्या १०० मुलांवर शहराच्या विविध रुग्णालयांत उपचार झाले. सुदैवाने एकही रुग्ण दगावला नाही. शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९३.६२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे दुसरी लाट नियंत्रणामध्ये येण्याची चिन्हे आहेत; मात्र तिसर्‍या लाटेत मुलांना धोका असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सिद्धता चालू केली आहे. लहान मुलांच्या उपचारात महत्त्वाच्या असलेल्या ‘इम्युनोग्लोबिलिन’ औषधाची जमवाजमव केली जात आहे.

बालरोगतज्ञ आधुनिक वैद्य राजेंद्र खडके म्हणाले, ‘‘सर्वच रुग्णालयांत ‘मीस’ आजाराचे २-३ रुग्ण भरती होत आहेत. २ मासांत अनुमाने १०० जणांवर उपचार झाले. यात ‘आयव्ही इम्युनोग्लोबिलिन’ औषध उपयुक्त ठरते. १ किलो वजनाच्या मुलासाठी २ ‘ग्रॅम इंजेक्शन’ लागते. १ ‘ग्रॅम इंजेक्शन’ची किंमत १ सहस्र ५०० रुपये आहे. ते एकदाच द्यावे लागते. सध्या ते उपलब्ध आहे; मात्र तिसर्‍या लाटेत याचा तुटवडा पडू नये, याची आताच काळजी घ्यावी लागेल.’’ एम्.जी.एम्.चे बालरोगतज्ञ आधुनिक वैद्य विनोद इंगळे म्हणाले, ‘‘आमच्या रुग्णालयात सध्या ५ मुलांवर उपचार चालू असून आतापर्यंत २५ जणांवर उपचार झाले आहेत.’

ही आहेत ‘मीस’ आजाराची लक्षणे…

घाटी बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले की, कोरोना होऊन गेल्यानंतर काही लहान मुलांमध्ये इतर आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. त्यात डोळे लाल होणे, अंगावर सूज, पूरळ येणे, ३ दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असल्यास ‘मीस’ आजार असण्याची शक्यता असते. त्या वेळी हे आजार अंगावर न काढता पालकांनी आपल्या मुलांना तात्काळ आधुनिक वैद्यांना दाखवावे. त्यांना ‘मास्क’ घालून अंतर राखण्यास सांगावे.