खेड (पुणे) तालुक्यातील शाळेच्या आवारात मद्याची पार्टी करणार्यांना अटक
दळणवळण बंदीच्या काळात सर्व दुकाने बंद असतांना पार्टी करण्यासाठी दारू कुठून मिळाली, याचा शोध घेऊन संबंधितांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे.
पुणे – टाकळकरवाडी (तालुका खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात मद्याची पार्टी करणारे अनुप टाकळकर, निखील येवले, राजेश पवार आणि मयूर टाकळकर या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
टाकळकरवाडी येथील नामवंत शाळा म्हणून येथील जिल्हा परिषद शाळेकडे पाहिले जाते; मात्र सध्या दळणवळण बंदीच्या काळात शाळेकडे कुणाचेच लक्ष नसल्यामुळे शाळेच्या परिसरात मद्यपी गोळा होत आहेत. अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू आहे. ग्रामपंचायत, शालेय समिती आणि मुख्याध्यापक यांच्याकडून अनेकदा या तरुणांना समज देण्यात आली होती; मात्र याकडे दुर्लक्ष करून अंधाराचा अपलाभ घेऊन रात्री उशिरापर्यंत तरुणांच्या मद्याच्या पार्ट्या चालूच होत्या. यामुळे ग्रामस्थांनी अखेर पोलिसांना माहिती दिली. (अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू असतांना पोलिसांच्या लक्षात कसे येत नाही ? ग्रामस्थांनी माहिती दिल्यावर जागे होणारे पोलीस कायद्याचे रक्षण कसे करणार ? – संपादक)