सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील १४ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये असल्याने तेथे कडक दळणवळण बंदी लावावी ! – विजय वडेट्टीवार
मुंबई – लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण न्यून झाले आहेत; पण तरीही मुंबई लोकलवर काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. १५ दिवस तरी लोकलची गर्दी न्यून करावीच लागणार आहे. राज्यातील नगर, धाराशिव, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, अकोला, वाशिम, बीड, गडचिरोली हे १४ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये आहेत. तेथे कडक दळणवळण बंदी लावण्यात यावी’, अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. वडेट्टीवार यांचे विधान पहाता १ जूननंतर राज्यात रेड झोनमधील जिल्हे वगळता दळणवळण बंदी काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.