पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) वृंदा कुलकर्णी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या आजारपणात अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे !
श्रीमती वृंदा कुलकर्णी (वय ६७ वर्षे) यांचे १०.५.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्याविषयी त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्या रुग्णाईत असतांना त्यांच्या सुनेला अन् त्यांच्या निधनानंतर साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्री. हृषिकेश कुलकर्णी (मोठा मुलगा), पुणे
१ अ. वडिलांचे निधन झाल्यावर आईने घरगुती व्यवसाय करून घराचा व्यय चालवणे आणि मुलांचे शिक्षण पूर्ण करणे : ‘आम्ही १७ – १८ वर्षांचे असतांना आमच्या वडिलांचे निधन झाले. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आईने घरगुती व्यवसाय करून घराचा व्यय चालवला. तिने वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या पैशाचा योग्य प्रकारे विनियोग करून त्यातून आम्हा दोघा भावांचे शिक्षण पूर्ण केले. या सर्वांतूनही तिने ‘घरी येणार्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, आमचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन देणे’, हे मनापासून केले.
१ आ. आधी अन्य संप्रदायांनुसार साधना करणे; परंतु सनातन संस्थेत आल्यानंतर अचूक मार्ग सापडल्याचे जाणवणे, त्यानंतर झोकून देऊन सेवा करणे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे : वडील गेल्यावर मुळात देवावर श्रद्धा असल्याने आईने काही संप्रदायांनुसार साधना केली; परंतु सनातन संस्थेत आल्यानंतर तिला अचूक मार्ग सापडल्याचे जाणवले. त्यानंतर मात्र आईने झोकून देऊन सेवा करायला आरंभ केला. त्यात ती कधीही सवलत घेत नसे आणि प्रामाणिकपणे साधनेचे प्रयत्न करत असे. हे तिचे वागणे शेवटपर्यंत होते. प्रसारात ‘प्रवचने करणे, सत्संग घेणे, वैयक्तिक संपर्क करणे, बालसंस्कारवर्ग घेणे’, अशा सेवा आईने मनापासून केल्या. येणार्या जिज्ञासूंनाही ती घेत असलेला विषय आवडत असे. या सेवांमधूनच तिचा अनेक व्यक्तींशी चांगला परिचय झाला होता. तेही आमच्याकडे आईची आवर्जून चौकशी करतात. ७.९.२०१३ या दिवशी आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली.
१ इ. शिकण्याची वृत्ती : सध्याच्या दिवसांमध्ये सत्संग ‘ऑनलाईन’ चालू झाले असल्याने आई त्या वेळेत आठवणीने सत्संगाला उपस्थित रहायची. तिने ‘ऑनलाईन’ सत्संगासाठी जोडणी कशी करायची ?’, हे शिकून घेतले होते.
१ ई. आई घरात एकटी रहात असल्याने तिने स्वतःचे सर्व स्वतः करणे : आई घरी एकटी रहायची. ती सर्व स्वतःचे स्वतः करत असे. तिला घरगुती औषधांची चांगली माहिती होती. ती स्वतःची चांगली काळजी घ्यायची. या वर्षभरात तिचे थकव्याचे प्रमाण थोडे वाढले होते.’ (१७.५.२०२१)
२. सौ. इंद्राणी कुलकर्णी, हडपसर, पुणे. (सून (मोठ्या मुलाची पत्नी))
२ अ. शरिराचे तापमान वाढलेले दिसल्यावर आयुर्वेदीय तज्ञांकडे दाखवणे आणि जंतूसंसर्गामुळे तसे झाल्याचे निष्पन्न होणे : ‘सासूबाईंची नेहमीप्रमाणे घरातून ‘ऑनलाईन’ प्रवचने करणे आणि प्रतिदिनची व्यष्टी साधना चालू होती. एके दिवशी शरिराचे तापमान वाढलेले दिसल्यावर त्या दिरांकडे रहायला गेल्या. नेहमीच्या त्यांना आयुर्वेदीय तज्ञांकडे दाखवल्यावर जंतूसंसर्गामुळे तसे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांनी दिलेली औषधे सासूबाई घेत होत्या.
२ आ. रक्तदाब अत्यल्प झाल्याने खाली पडणे, पावलाला इजा होणे, ताप न्यून न होणे आणि त्यानंतर ‘कोविड पॉझिटिव्ह’ असल्याचे लक्षात येणे : त्यातच एक दिवस रक्तदाबाचे प्रमाण अकस्मात् अत्यल्प झाल्याने त्या जागेवरच खाली पडल्या. तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या पावलाला इजा झाली. पावलाला सूज येऊन त्यांना चालणे कठीण झाले. त्यामुळे त्यांना चालण्यासाठी आधार घ्यावा लागत होता. या परिस्थितीत तापाचे प्रमाण न्यून न झाल्याने आणि ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनची पातळी अल्प दिसल्याने त्यांना पुन्हा वैद्यांकडे नेले. तेव्हा केलेल्या चाचणीमध्ये त्या ‘कोविड पॉझिटिव्ह’ असल्याचे लक्षात आले.
२ इ. रुग्णालयात भरती केल्यावर ९ दिवसांनी प्रकृती स्थिर असल्याने घरी आणून अलगीकरणात ठेवणे : त्यांना लगेच रुग्णालयात भरती केले. तेथे ९ दिवस उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर रहात असल्याने त्यांना घरी अलगीकरणात (‘होम क्वारंटाईन’) रहाण्यास आधुनिक वैद्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांना १.५.२०२१ या दिवशी घरी आणले.
२ ई. सासूबाईंसाठी जप करण्याची सेवा मिळणे, त्यांचे घरी अलगीकरण होणार असल्याचे समजल्यावर पुण्याला घरी येणे, त्याच दिवशी त्यांना अर्धांगवायूचा झटका येणे आणि त्यांना हृदयाचा झटका आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ त्यांच्या छातीजवळ धरल्यावर त्या शांत झाल्याचे अनुभवणे : या ९ दिवसांमध्ये त्यांना जप करावयास सांगितला होता; पण त्या आजारी असल्याने त्यांना जप पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे तो जप करण्याची सेवा मला करायला मिळाली. मी बाहेरगावी होते; परंतु देवाने माझ्याकडून त्यांच्यासाठी जप करवून घेतला. त्यांचे घरी अलगीकरण (‘होम क्वारंटाईन’) होणार असल्याचे समजल्यावर मी पुण्याला घरी गेले. २.५.२०२१ या दिवशी पहाटे मी घरी पोचले. याच दिवशी सकाळी ७ च्या सुमारास सासूबाईंना अर्धांगवायूचे झटके यायला आरंभ झाला. पुण्यात बर्याच रुग्णालयांमध्ये संपर्क केले; परंतु पलंग (बेड) उपलब्ध होत नव्हता. त्या वेळी ‘साधकांना संपर्क करून सासूबाईंसाठी नामजपादी उपाय विचारणे, तसेच रुग्णालय, रुग्णवाहिका यांसंदर्भात विचारणे’ इत्यादी चालू होते. सासूबाईंना आरंभी हृदयाचा झटका आल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ त्यांच्या छातीजवळ धरल्यावर त्या शांत झाल्या’, असे आम्ही अनुभवले.
२ उ. रुग्णालयामध्ये भरती केल्यानंतर आवश्यक त्या चाचण्या केल्यावर मेंदूभोवती संसर्ग होऊन सूज आल्याचे समजणे, पुढे दुसर्या रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवावे लागणे आणि त्यानंतर ८ दिवसांनी देहावसान होणे : नंतर त्या बेशुद्धावस्थेतच होत्या. त्यांना रुग्णालयामध्ये भरती केले. तेथून पुढे आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्यावर त्यांच्या मेंदूभोवती संसर्ग होऊन सूज आल्याचे कळले, तसेच छातीतील कफाचे प्रमाणही पुष्कळ होते. कोविडचे प्रमाण अत्यल्प (mild) होते. पुढे त्यांना अतीदक्षता विभागात ठेवावे लागणार असल्याने दुसर्या मोठ्या रुग्णालयात भरती केले. आधुनिक वैद्या ज्योती काळे यांच्या साहाय्याने त्यांना एका रुग्णालयात पलंग उपलब्ध झाला. पुढील सर्व उपचार तेथे करण्यात आले. तेथे ८ दिवस त्या होत्या. नंतर १०.५.२०२१ या दिवशी त्यांचे देहावसान झाले.
२ ऊ. या संपूर्ण कालावधीत सौ. मनीषा पाठक आणि आधुनिक वैद्या ज्योती काळे यांचे पुष्कळ साहाय्य होणे : या संपूर्ण कालावधीत सौ. मनीषा पाठक आणि आधुनिक वैद्या ज्योती काळे यांचे आम्हाला पुष्कळ साहाय्य झाले. कोणत्याही वेळी दूरभाष केल्यास त्या आवश्यक ते साहाय्य करत होत्या, तसेच विचारपूसही करत होत्या.
२ ए. सासूबाईंना दुसर्या रुग्णालयात भरती केल्यावर जाणवलेली सूत्रे
२ ए १. रुग्णालयात रात्री थांबल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होणे, मन वर्तमानकाळात असणे आणि सर्वकाही सहजतेने करता येणे : दुसर्या रुग्णालयात भरती झाल्यावर सासूबाई एक दिवस जनरल अतीदक्षता विभागात (Non Covid ICU Ward मध्ये) होत्या; कारण त्यांची Rapid antigen test ही covid negative आली होती. मी रात्री रुग्णालयात थांबले होते. माझ्याकडून सर्व सहज होत होते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती, ‘त्यांनी आपली पुष्कळ सिद्धता करवून घेतली आहे. तेच सर्व करवून घेत आहेत.’ माझे मन वर्तमानकाळात होते आणि माझ्याकडून समाेर येईल, ती कृती करणे होत होते.
२ ए २. ‘देहाला त्रास होत असला, तरी सासूबाईंचे मन देवाशी जोडले असल्याने त्यांना शक्ती मिळत असावी’, असे वाटणे : दुसर्या दिवशी दुपारी सासूबाईंना थोडीशी शुद्ध असल्याने त्यांना वेदना जाणवत होत्या. त्यामुळे त्या कण्हत होत्या. ते पाहून ‘संपूर्ण उपचाराच्या काळात त्या बेशुद्ध असणे’, ही देवाने त्यांच्यावर केलेली कृपा आहे’, असे मला जाणवले. शुद्धीत असणार्या अन्य रुग्णांना उपचाराच्या काळात पुष्कळ त्रास होत असे. आजूबाजूच्या अन्य रुग्णांना अत्यवस्थ पाहून त्यांना ताण येत असे. ‘सासूबाईंची मूळ प्रकृती भित्री आणि ताण घेणारी असल्याने या सर्वांचा त्यांना पुष्कळ ताण आला असता; म्हणून देवाने त्यांना थोडी थोडी शुद्ध दिली’, असे मला जाणवले. ‘देव कशी काळजी घेतो ?’, हे पाहून मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली. या वेळी मला जाणवले, ‘देहाला त्रास होत असला, तरी सासूबाईंचे मन देवाशी जोडले असल्याने त्यांना शक्ती मिळत असावी. देह नश्वर आहे. मन श्रीकृष्णाच्या चिंतनात असणे आवश्यक आहे. मग कशाचेच काही वाटत नाही.’
२ ए ३. अतीदक्षता विभागातील वातावरण पुष्कळ भयावह असणे आणि तेथे अधिक वेळ न थांबवणे : अतीदक्षता विभागातील अन्य रुग्णांकडे लक्ष गेल्यावर तेथील वातावरण पुष्कळ भयावह होते. रुग्णांना जोडलेल्या यंत्राचा सारखा आवाज येत होता. सर्वांचे तोंडवळे त्रासिक वाटत होते. तेथे अधिक वेळ थांबवत नव्हते.
२ ए ४. पुन्हा कोविड अतीदक्षता विभागात हालवणे : दुसर्या दिवशी आधुनिक वैद्यांनी सासूबाईंना पुन्हा कोविड अतीदक्षता विभागात हालवण्याविषयी सांगितले; कारण त्या कोविड पॉझिटिव्ह होऊन १४ दिवस अजून व्हायचे होते आणि १४ दिवस पूर्ण झाल्याविना केलेल्या चाचणीत त्यांचा अहवाल कोविड negative आला, तरी ते तेवढे ग्राह्य धरले जात नाही.
२ ए ५. अतीदक्षता विभागात सासूबाईंचा उपचारांना प्रतिसाद अत्यल्प असणे आणि नामजप अन् उपाय करत असल्याने मनाला शक्ती मिळणे : आम्हाला त्या विभागात जायची अनुमती नव्हती. तेथे सासूबाईंची स्थिती सामान्य रहात होती. नंतर ‘मेंदूभोवती झालेला संसर्ग हा कोविडमुळे झाला नसून तो जंतूसंसर्ग आहे’, हे कळले; मात्र कोविडमुळे त्यांच्या छातीत झालेल्या कफाचे प्रमाण तेवढेच असल्याने त्यांना नैसर्गिकरित्या श्वास घेता येत नव्हता. ‘श्वास घेता येईल, तेव्हा त्यांना सामान्य विभागात हालवले जाईल’, असे वैद्यांनी सांगितले होते. ४ – ५ दिवसांत त्यांच्या स्थितीत म्हणावी तशी सुधारणा किंवा त्यांचा उपचारांना प्रतिसाद हा अत्यल्प होता. आम्हालाही सर्व लक्षात येत होते. आम्ही नामजप आणि उपाय करत होतो. त्यामुळे मनाला शक्ती मिळत होती.
२ ए ६. प.पू. दास महाराज यांनी दूरभाषवर यजमानांना धीर दिल्याने केवळ त्यांच्या चैतन्याने यजमानांना पुढचे सर्व करता येणे : श्री. हृषिकेश (यजमान) यांचे वडील लवकर गेल्याने आईशी त्यांची पुष्कळ जवळीक होती. तिला या पूर्वी त्यांनी असे कधीच पाहिलेले नव्हते. त्यामुळे आरंभी त्यांना पुष्कळ त्रास होत होता. प.पू. दास महाराज यांनी दूरभाषवर यजमानांना धीर दिल्याने केवळ त्यांच्या चैतन्याने यजमान पुढे सर्व करू शकले. हे सर्व परात्पर गुरु डॉक्टरांचे नियोजन असल्याचे पदोपदी जाणवत होते.
२ ए ७. सासूबाईंना डबा घेऊन जात असतांना डब्याचे झाकण सैल होऊन सर्व अन्न पिशवीत सांडणे, पुन्हा डबा आणायला घरी जातांना वाटेत गाडीच्या शेजारी कावळ्याची सावली दिसणे आणि येतांना एक कावळा जवळून उडत जाणे : ९.५.२०२१ या दिवशी नेहमीप्रमाणे मी आणि श्री. हृषिकेश सासूबाईंना डबा देण्यासाठी जात असतांना नेहमीच्याच डब्याचे झाकण सैल होऊन सर्व अन्न पिशवीत सांडले असल्याचे दवाखान्यात पोचल्यावर लक्षात आले. ‘ते कसे काय झाले ?’, याविषयी मला आश्चर्य वाटत होते. मग पुन्हा डबा आणायला मी गाडीवरून घरी जात असतांना वाटेत मला गाडीच्या शेजारी कावळ्याची सावली दिसली. मला वाटले, ‘डोक्यावर कावळा आहे का ?’ त्या वेळी तो दिसला नाही, तसेच डबा घेऊन येतांना एक कावळा पुष्कळ जवळून उडत गेला.
२ ए ८. दुपारी भाववृद्धी सत्संग पहात असतांना रुग्णालयातून तातडीने बोलावणे, तिथे गेल्यावर सासूबाई अत्यवस्थ असल्याचे समजणे, सत्संगात सांगितलेली सूत्रे रुग्णालयात आठवून कृतज्ञता व्यक्त होणे आणि ती सूत्रे आता आवश्यक असल्याची देवाने जाणीव करून देणे : नंतर दुपारी आम्ही घरी भाववृद्धी सत्संग पहात होतो. आरंभीचा १५ मिनिटे भाववृद्धी सत्संग झाल्यावर रुग्णालयातून दूरभाष आला, ‘लगेच या.’ मग आम्ही गेलो. जातांना पुन्हा एक कावळा यजमानांच्या डोक्याच्या अतिशय जवळून उडत गेला. इतका की, तो धडकू नये; म्हणून त्यांनी डोके खाली केले. दवाखान्यात गेल्यावर कळले, ‘सासूबाई अत्यवस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.’
हा प्रसंग होणार होता; म्हणून की काय, सत्संगात सांगितलेली सूत्रे आमच्यासाठीच असल्याची देवाने जाणीव करून दिली, उदा. वर्तमानकाळात रहायला हवे; स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा; समोरचा जरी संत नसेल, कुणीही असेल, तरी त्याच्यातील ईश्वराला पाहून त्याची सेवा करता यायला हवी. जीवनात येणारे दुःख हे प्रारब्ध किंवा अनिष्ट शक्तींचा त्रास यांमुळे येते.
रुग्णालयात हे सर्व आठवल्यावर मला केवळ कृतज्ञता वाटत होती.
२ ऐ. सासूबाईंचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीची सिद्धता करण्यासाठी सनातनचे साधक आणि मावस भाऊ यांच्या माध्यमातून देवानेच साहाय्य करणे : दुसर्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता सासूबाईंची प्राणज्योत मालवली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने त्यांना कोविड नसल्याने त्यांचा पार्थिव देह आमच्याकडे सुपुर्द करण्यात आला. पुढे अंत्यविधीची सिद्धता करण्यासाठी संस्थेचे साधक श्री. स्वप्नील जोशी, श्री. धीरज बेंगरुट आणि माझा मावस भाऊ श्री. मनोज कात्रे यांनी पुष्कळ साहाय्य केले. ‘त्यांच्या माध्यमातून देवानेच नियोजन करून अंत्यविधीची सर्व सिद्धता करवून घेतली’, असे जाणवले.
२ ओ. अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
१. वैकुंठभूमीकडे नेण्यापूर्वी ‘सासूबाईंचे अंतिम दर्शन घेतांना त्या जिवंत आहेत’, असे जाणवले.
२. आजारपणातून बाहेर आल्यानंतरचे त्रासिक भाव त्यांच्या तोंडवळ्यावर नव्हते. ‘त्या शांत झोपल्या आहेत’, असे सर्वांनाच वाटत होते.’ (१७.५.२०२१)
३. अंत्यविधी चालू असतांना साधकांना जाणवलेली सूत्रे
३ अ. श्री. स्वप्नील जोशी, नर्हे, पुणे.
३ अ १. अंत्यविधी चालू असतांना वातावरणात दाब न जाणवणे : ‘अंत्यविधी चालू असतांना वातावरणात दाब जाणवला नाही. वृंदाकाकूंचा तोंडवळा शांत झोप लागल्याप्रमाणे दिसत होता. सर्व विधी झाल्यावर हात-पाय धुवायला थोडे बाजूला गेल्यावर तेथे अन्य एक चिता जळत होती. तेथे मला दाब जाणवला.
३ अ २. काकूंचा देह चितेवर ठेवल्यावर त्यांच्या छातीपाशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे आध्यात्मिक लाभासाठी दिलेले पान ठेवल्यावर त्या एखाद्या लहान मुलीप्रमाणे आनंदी झाल्याचे जाणवणे : काकूंचा देह चितेवर ठेवल्यावर शेवटी पूर्ण झाकण्यापूर्वी मी त्यांच्या छातीपाशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे आध्यात्मिक लाभासाठी दिलेले पान ठेवले. तेव्हा ‘त्या एखाद्या लहान मुलीप्रमाणे आनंदी झाल्या’, असे मला जाणवले. ‘त्यांनी ते पान छातीशी कवटाळून धरले आणि ‘आता परम पूज्य माझ्या समवेत आहेत, तर मला आणखी कुणी नको’, असे वाटून त्या निर्धास्त झाल्या’, असे मला जाणवले.’
३ आ. श्री. मनोज कात्रे, बिबवेवाडी, पुणे.
१. ‘काकूंचा देह चितेवर ठेवल्यावर त्यांचा तोंडवळा झाकण्यापूर्वी त्या हसत आहेत’, असे जाणवले. वातावरणात दाब जाणवला नाही.’
४. अन्य सूत्रे
अ. ‘सध्या ‘काेरोना’मुळे वैकुंठ स्मशानभूमीत पारंपरिक पद्धतीने दहन करावयाचे असल्यास केला जाणारा विधी गेला एक मास बंद होता. सासूबाईंच्या अंत्यविधीच्या एक दिवस आधी तो पुन्हा चालू केल्याचे कळले; अन्यथा विधी करता आले नसते.
आ. सासूबाईंनी त्याचे दायित्व मृत्यूपूर्वी पूर्ण केल्याचे लक्षात आले. जुन्या घराची विक्री त्यांनी पुढाकार घेऊन केली होती.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
५ अ. ‘सासूबाई पुढील साधना करण्यासाठी दूर गेल्या असून परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या समवेत आहेत’, असे तीव्रतेने वाटणे : स्वतःचा अभ्यास करतांना मला वाटले, ‘मला इतरांइतके वाईट का वाटत नाही ?’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘सासूबाई गेल्या’, असे मला वाटले नाही. ‘त्या केवळ पुढील साधना करण्यासाठी दूर गेल्या असून परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या समवेत आहेत. त्यांना महर्लाेकातील साधकही भेटले असतील’, असे मला तीव्रतेने वाटत होते. त्या कारणाने मला वाईट वाटण्यापेक्षा परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता वाटत होती.
५ आ. ‘गुरूंनी आपले दायित्व घेतल्यावर ते मृत्यूनंतर सप्तलोकातही आपल्या समवेत असतात’, हे जाणवणे : आम्ही मुले म्हणून त्यांची किती काळजी घेऊ शकलो असतो ? फार फार तर मृत्यूपर्यंत ! त्यातही आमच्यातील स्वभावदोषांमुळे काही ना काही उणीव राहिली असती; पण ‘जेव्हा गुरु आयुष्यात येतात आणि ते आपले दायित्व घेतात, तेव्हा ते मृत्यूनंतर सप्तलोकातही आपल्या समवेत असतात’, हे मला जाणवले.
५ इ. साधनेचे महत्त्व लक्षात येणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या महान गुरुमाऊलींनी सासूबाईंकडून आवश्यक ती साधना पृथ्वीवर करवून घेतली आणि त्यांचे प्रारब्ध सुसह्य करून त्यांच्या पुढच्या प्रवासातही ते असणारच आहेत. असे गुरु लाभणे विरळाच ! या वेळी मनाला जाणीव झाली की, खरे नाते हे गुरु शिष्याचेच ! ‘आपण कुणाकरता किती आणि काय करू शकतो ? प्रत्येकासाठीच केवळ देव आहे आणि हे सत्य केवळ अंत्यसमयी लक्षात येते. यावरून ‘साधना करणे किती महत्त्वाचे आहे’, असे वाटले.
आता गुरुचरणी हीच प्रार्थना आहे की, येणार्या आपत्काळात त्यांनी आमच्याकडूनही त्यांना अपेक्षित अशी साधना करवून घ्यावी. आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
(समाप्त)
– सौ. इंद्राणी कुलकर्णी, हडपसर, पुणे. (१७.४.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |