‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून श्रीराम आणि सीता यांना आधुनिक दाखवण्याचा अश्लाघ्य प्रकार !
चित्रपटसृष्टीतील मान्यवरांसह सामाजिक माध्यमांवरून निषेधवेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे सातत्याने विडंबन झाल्यामुळे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी आवाज उठवला. त्यामुळे सरकारने ‘वेब सिरीज’ बनवणार्यांसाठी नियमावली बनवली; मात्र त्यात कठोर शिक्षेची तरतूद नसल्यामुळे हिंदूंच्या देवतांचे विडंबन चालू आहे. हे रोखण्यासाठी आता हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक ! |
मुंबई, २४ मे (वार्ता.) – हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांसह माता सीता आणि रामायणातील अन्य श्रद्धास्थानांना निर्माता-दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी त्यांच्या ‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून आधुनिक पद्धतीने साकारण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आहे. यामुळे या ‘वेब सिरीज’वर सर्व स्तरांवरून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’च्या ‘एम्एक्स प्लेअर’वर ६ मेपासून ही ‘वेब सिरीज’ प्रसारित करण्यात आली आहे.
१. दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी ‘सद्यःस्थितीत नागरिक कोरोनाच्या महामारीमुळे निराश आहेत. देश कठीण स्थितीतून जात आहे. या ‘वेब सिरीज’द्वारे देशवासियांना शक्ती मिळेल, अशी मी आशा करतो’, असे म्हटले आहे.
२. असे असले तरी या ‘वेब सिरीज’मध्ये आध्यात्मिकतेच्या ऐवजी आधुनिकतेचा भाग दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ही ‘वेब सिरीज’ भाविक आणि प्रेक्षक यांच्या पसंतीला उतरलेली नाही.
३. या ‘वेब सिरीज’मध्ये प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना दाढी दाखवण्यात आली आहे, तसेच सीतामाता यांना आधुनिक पोशाखात दाखवण्यात आले आहे.
४. या संपूर्ण ‘वेब सिरीज’मधील संवाद आधुनिक पद्धतीचे आहेत, तसेच कलाकारांचा अभिनयही आधुनिकतेकडे झुकणारा आहे. यामध्ये वानरराज वाली यांच्या शरिरावर ‘टॅटू’ दाखवण्यात आला आहे. याचसमवेत त्यांची वेशभूषाही राक्षसाप्रमाणे दाखवण्यात आली आहे. या सर्व कारणांमुळे प्रेक्षकांनी या ‘वेब सिरीज’ला नाकारल्याचे दिसून येते.
आमच्या लाडक्या देवतांचे तुम्ही हे काय केले ? – गुफी पेंटल, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते
मी लहानपणी गावातील जत्रेत अनेकदा रामलीला पाहिली आहे; पण तीच कथा पुनःपुन्हा पाहून मी कधी कंटाळलो नाही; कारण त्यामध्ये भक्तीभाव होता. ‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मध्ये मात्र तसे नाही. यामध्ये केवळ ‘ग्लॅमर’चा भाग दिसतो. या ‘वेब सिरीज’च्या निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये व्यय करून महागडे ‘सेट’, ‘स्पेशल इफेक्ट’, ‘कॉशच्युम’ (वेशभूषा) वगैरे सिद्ध केले; पण रामायणावर संशोधन करायला मात्र ते विसरले. प्रभु श्रीरामाला पाहून आनंद वाटायला हवा; पण या ‘वेब सिरीज’मधील राम ही व्यक्तीरेखा पाहून दु:ख होते. आमच्या लाडक्या देवांचे तुम्ही हे काय केले ? अशी भावना प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते गुंफी पेंटल यांनी व्यक्त केली. गुंफी पेंटल यांनी यश चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेमध्ये साकारलेली ‘शकुनीमामा’ ही भूमिका विशेष गाजली होती.
संस्कृतीमध्ये आधुनिकता आणून भंजन करू नका ! – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते
रामायण-महाभारत ही आमची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने मांडायला हवेत. रामायण ही केवळ कथा नाही, तर आमचा इतिहास आहे. याला तुम्ही केवळ बाहुबली म्हणून चित्रित करत असाल, ‘सिक्स पॅक’ दाखवत असाल, तर हे चुकीचे आहे. आमच्या श्रद्धास्थानांचे भंजन करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. तुम्ही ‘शक्तीमान’मध्ये पालट करू शकता; मात्र राम-सीता यांमध्ये पालट करू शकत नाही. ही केवळ राजा-राणी यांची कथा नसून आमचा आदर्श आहे. तुम्हाला रामायण दाखवायचे असेल, तर त्यातील श्रद्धेला अधिक दृढतेने दाखवा. आम्ही रामाला कधीही दाढीमध्ये पाहिलेले नाही. संस्कृतीमध्ये कधीही आधुनिकता आणता येत नाही. रामराज्याची सध्याचे शासनकर्ते आणि जनता यांना आवश्यकता आहे. त्यामुळे समाजावर संस्कार होतील, असे रामायण दाखवा.