‘म्युकरमायकोसिस’वर उपचार करण्यासाठी स्वतंत्र केअर सेंटर उभारा !
अजित पवार यांच्या बारामती (पुणे) येथील बैठकीत प्रशासनाला सूचना
बारामती (जिल्हा पुणे) – सध्या ‘म्युकरमायकोसिस’बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र केअर सेंटर उभारावे. त्यांना लागणार्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये अपप्रकार होता कामा नये. औषधांचे योग्य नियोजन करावे. ‘म्युकरमायकोसिस’ची अथवा अन्य काही लक्षणे आढळल्यास आरोग्य कर्मचार्यांनी माहिती घ्यावी. नागरिकांना आरोग्य सेवा देतांना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांनी स्वतःचीही योग्य काळजी घ्यावी. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. आरोग्याच्या कामात निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पवार यांनी पुढे म्हटले आहे की, बारामती तालुक्यामध्ये आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यात याव्यात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. लहान मुलांसाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवाव्यात. सर्व रुग्णालयांचे अग्नीशमन यंत्रणा आणि ऑक्सिजन यांचे ‘ऑडिट’ वेळेवर करावे. कोणत्याही रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी आणि कोविड सेंटरच्या तपासणीसाठी अधिकार्यांची तात्काळ नियुक्ती करावी.