सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांची त्यांच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली वैशिष्ट्ये !
सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा वैशाख शुक्ल पक्ष दशमी (२२ मे) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. भार्गवराम प्रभु यांची वयाच्या अडीच ते साडेतीन वर्षे या कालावधीतील त्यांची आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सतत कार्यरत असणे
‘पू. भार्गवराम यांना सतत काहीतरी कृती करायची असते. त्यांना बागकाम करणे आणि कचरा जाळणे, अशी कामे करायला पुष्कळ आवडते.
२. विविध भाषा शिकणे
पू. भार्गवराम यांना कोकणी ही आमची मातृभाषा येते. त्यांचा साधकांशी कन्नड, हिंदी, मराठी आणि भ्रमणभाष पाहून इंग्रजी या भाषांत बोलण्याचा प्रयत्न असतो.
३. मंत्र तोंडपाठ असणे
सध्या कोरोनानिमित्त विविध मंत्र सतत लावलेले असतात. ‘पू. भार्गवराम खेळण्यात मग्न आहेत किंवा काहीतरी करत आहेत’, असे वाटत असले, तरी त्यांना ते मंत्र मुखोद्गत आहेत. आपण एक ओळ म्हटली की, ते पुढची ओळ म्हणतात.
४. कुणीही न शिकवता डब्यावर तबल्याप्रमाणे लयबद्ध वाजवणे
‘तबला वाजवणे’, हा पू. भार्गवराम यांचा अत्यंत आवडीचा छंद आहे. ते स्वयंपाक घरातील एक उंच आणि एक गोलाकार डबा घेऊन त्यावर लयबद्ध रितीने ७ – ८ मिनिटे सतत वाजवतात. कुणीही काही न शिकवता इतक्या लहान बालकाचे हे वाजवणे पाहून आश्चर्य वाटते.
५. कथा ऐकायला आणि ध्वनीचित्र-चकती पहायला आवडणे
५ अ. ‘देवीशी संबंधित ध्वनीचित्र-चकती पहायला आवडणे : या किनारपट्टीच्या प्रदेशात नवरात्रीच्या वेळी काही जमातीचे लोक देवीला सांगतात, ‘आमची सकाम इच्छा अथवा दुःख किंवा त्रास दूर झाल्यास तुझ्या वाहनाप्रमाणे (वाघाप्रमाणे) वेश करून तुझी सेवा करू.’ येथे तो ‘वाघाचा नाच’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे चित्रीकरण केलेली ध्वनीचित्र-चकती पहायला पू. भार्गवराम यांना पुष्कळ आवडते. त्यांच्याकडे २ – ३ वाघाची खेळणी आहेत. ते त्या खेळण्यांशी तन्मय होऊन खेळतात.
५ आ. देवतांनी केलेल्या असुरांच्या संहाराच्या कथा ऐकायला पुष्कळ आवडणे : पू. भार्गवराम यांना हनुमान, भीम आणि देवी यांनी केलेल्या असुरांच्या संहारकथा ऐकायला पुष्कळ आवडते. ते मला ‘बकासुर आणि नरसिंह यांची कथा सांग’, असे सारखे म्हणत असतात. ते ध्रुवबाळाची कथा तितक्या आवडीने ऐकत नाही. त्यांना ‘देवतांनी केलेल्या असुरांच्या संहाराच्या कथा विशेष आवडतात’, याचे मला आश्चर्य वाटते. ते प्रतिदिन गदा आणि धनुष्यबाण यांनी खेळतात.
५ इ. ऐकलेल्या कथा अभिनयासह करून दाखवणे : पू. भार्गवराम यांना नीतीकथा प्रायोगिक रितीने सांगाव्या लागतात.
१. एक दिवस मी त्यांना मदन नावाच्या लाकूडतोड्याची कुर्हाड पाण्यात पडल्याची कथा सांगितली. ते म्हणाले, ‘‘आता तू मदन हो. मी विष्णु होऊन येतो आणि तुझी कुर्हाड देतो.’’ त्या वेळी त्यांनी इतक्या सुंदर रीतीने मला अभयहस्त दाखवला की, माझी भावजागृती झाली.
२. त्यांना वानरांविषयी सांगतांना ‘ते वानरांसारखा सेतू बांधायला आणि स्वतःला हनुमंतासारखे उचलून घ्यायला सांगतात. तसे उचलून घेतल्यावर ते संजीवनीसाठी पर्वत उचलून आणत असल्याचा अभिनय करतात.
६. पशू-पक्ष्यांची आवड
अ. पू. भार्गवराम यांना हत्ती, गरुड, खार, कासव, मासा, हरीण, माकड, मोर, वाघ इत्यादी पुष्कळ आवडतात. त्यांना अन्य मुलांप्रमाणे मांजर आणि कुत्रा फारसे आवडत नाहीत.
आ. सेतू बांधतांना खारीने रामाला पुष्कळ साहाय्य केले; म्हणून ते खारीला ‘अळिलुराम’ असे संबोधतात. (‘कन्नडमध्ये खारीला ‘अळिलु’ असे म्हणतात. खारीने रामाला पुष्कळ साहाय्य केले. त्यामुळे पू. भार्गवराम यांनी खारीला ‘अळिलुराम’ असे नवे नाव दिले आहे. – संकलक )
इ. आमच्या घराजवळ मधूनमधून मोर येतो. पू. भार्गवराम मोराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.
७. प्रेमभाव
अ. पू. भार्गवराम त्यांचे आई-वडील झोपले असतांना अथवा ते जोरात खोकल्यास काय झाले ? ‘तुम्हाला पाणी हवे का ?’, असे लगेच विचारतात.
आ. ते स्वतः खोड्या करून पाणी सांडतात; परंतु पू. राधाआजींना ‘तुम्ही घसराल, सावकाश जा’, असे सांगून सावध करतात.
इ. त्यांची आई कधी कधी काही नवीन पदार्थ बनवते. त्या वेळी ते आईला पीठ भिजवण्यास किंवा भाजी धुण्यासाठी साहाय्य करतात. आईने त्यांना पदार्थ दिल्यावर ते मी सेवा करत असलेल्या खोलीमध्ये पळत येऊन मला तो पदार्थ देतात.
ई. पू. भार्गवराम यांना सेवाकेंद्रातील साधक हर्षवर्धनअण्णा आणि बालसाधक गुरुदास यांची थोडी भीती वाटते. एक दिवस मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला येथील कोणते साधक अधिक आवडतात ?’’ मला वाटले, ‘ते माझे किंवा चरणदासचे (त्यांच्या मित्राचे) नाव सांगतील’; परंतु पू. भार्गवराम यांनी आधी हर्षवर्धनअण्णा आणि त्यानंतर गुरुदास यांचे नाव सांगितले.
उ. पू. भार्गवराम त्यांच्यासाठी आणलेली नवीन खेळणी आणि वस्तू ते आधी त्यांचा मित्र चरणदास याला दाखवण्यासाठी घेऊन जातात. वस्तू नवीन असली, तरी पू. भार्गवराम चरणदासला ती वस्तू देतात.
ऊ. काही वेळा चरणदास किंवा गुरुदास यांना दटावल्यास पू. भार्गवराम यांना अतिशय दुःख होते. पू. भार्गवराम आपल्या आईला ‘त्या दोघांना रागावू नको’, असे सांगतात.
८. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
८ अ. रात्री झोपतांना भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लागत नसल्याने ‘स्वतःला आध्यात्मिक त्रास होईल’, असे वाटत असतांना पू. भार्गवराम यांनी स्वतःहून जवळ येऊन झोपणे : मी रात्री भ्रमणभाषवर प.पू. बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) भजने लावून झोपते. एका रात्री काही कारणाने माझ्या भ्रमणभाषमध्ये भजने लागत नव्हती. ‘भजने चालू नसतील, तर मला त्रास होईल’, असा विचार येऊन मला झोपण्याचे धैर्य होत नव्हते. मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करून झोपले. नंतर ५ मिनिटांनी पू. भार्गवराम ‘आज मी तुझ्याजवळ झोपतो’, असे म्हणून माझ्याजवळ येऊन झोपले. ‘मला त्रास होऊ नये’; म्हणून रात्री त्यांची आई त्यांना घेऊन जाण्यासाठी येत आहे, हे कळल्यावर ते मला आणखी घट्ट धरून झोपले.
९. ध्यानाच्या वेळी नामजप करतांना पू. भार्गवराम मांडीवर बसणे, त्यांची दृष्टी स्थिर होऊन तोंडवळा गंभीर होणे आणि अशा स्थितीत त्यांचे वजन न जाणवता ‘ही त्यांची ध्यानावस्था असेल’, असे वाटणे
मी ध्यानाच्या वेळेत नामजप करतांना ते माझ्या मांडीवर बसून काही वेळा त्यांचे पाय दाबायला आणि पाठीवर हात फिरवायला सांगतात. मी तसे केल्यावर त्यांची दृष्टी एकीकडे स्थिर होऊन त्यांचा तोंडवळा पुष्कळ गंभीर होतो. तेव्हा ‘त्यांना झोप येत आहे का ?’, असे मला वाटते; परंतु मी तसे करणे थांबवल्यावर ते पुन्हा खोड्या करायला लागतात. ते अशा स्थितीत असतांना त्यांचे वजन जाणवत नाही. ही पू. भार्गवराम यांची ‘ध्यानावस्था असावी’, असे मला वाटते.
(प्रश्न : हा विचार योग्य आहे का ?
उत्तर : हो. ध्यानावस्थेत देहाची जाणीव रहात नसल्याने हलकेपणा जाणवतो. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ)
१०. भाव
१० अ. भगवान नरसिहांची (नृसिंहदेवाची)गोष्ट ऐकल्यावर पू. भार्गवराम यांनी ‘घरातील खांबात भगवान नरसिंह आहे का ? तो खांबातून बाहेर येईल का ?’, असे विचारणे आणि यातून प्रत्येक खांबात नरसिंह असल्याचा त्यांचा दृढ विश्वास जाणवणे : मी पू. भार्गवराम यांना भक्त प्रल्हादाची कथा मधूनमधून सांगत असे आणि त्यांना खांबातून प्रकट झालेल्या नरसिंहाचे चित्रही दाखवत असे. मी प्रतिदिन एका खांबाजवळ बसून नामजप करत असे. त्या वेळी पू. भार्गवराम मला ‘या खांबात काय आहे ?’, असे विचारत. आरंभी ते ‘काय विचारत आहेत ?’, ते मला समजले नाही. नंतर त्यांनीच मला विचारले, ‘‘या खांबात नरसिंह आहे का ? तो बाहेर येईल का ?’’ त्यांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ‘प्रत्येक खांबात नरसिंह आहे’, असे त्यांचा दृढ विश्वास होता. मी त्यांना सांगितले, ‘‘भगवान नरसिंह आता येणार नाही. कुणी दुष्ट कृत्य केले किंवा साधकांना त्रास झाल्यास नरसिंह येतील.’’ आता पू. भार्गवराम प्रतिदिन माझ्याजवळ येऊन बसल्यावर हा प्रश्न विचारतात आणि स्वतःच त्याचे उत्तरही सांगतात.
‘खांबाविषयी भाव कसा वाढवायचा ?’, हे बालसंतांच्या माध्यमातून शिकवणार्या गुरुंप्रती मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
१० आ. भ्रमण संगणकाच्या पडद्यावरील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवून ‘ते माझ्याकडेच पहात आहेत’, असे पू. भार्गवराम यांनी सांगणे : एक दिवस मी भ्रमण संगणकावर सेवा करत होते. माझ्या भ्रमण संगणकावर परात्पर गुरु डॉक्टरांचे मुख असलेले चित्र आहे. एक दिवस पू. भार्गवराम यांनी भोजनघरातून आसंदी ओढत आणली आणि ते आसंदीवर बसले. त्या वेळी आमच्या दोघांत झालेले संभाषण,
पू. भार्गवराम : तिकडे बघ. ते माझे मन आहे.
मी : कुठे आहे ? (पू. भार्गवराम यांनी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवले.) ते परात्पर गुरु डॉक्टर आहेत ना !
पू. भार्गवराम : तेच माझे मन आहे. ते मन इथे येऊन मला निरंतर कुजबुजून सर्व सांगत असते.
(आम्ही अन्य वेळी बोलत असतांना ‘ते आमचे ऐकून असे बोलत असतील’, असे मला वाटले.)
मी : ते परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आहे. ते माझ्याकडे पहात आहेत.
पू. भार्गवराम : नाही. ते माझ्याकडेच पहात आहेत; म्हणूनच मी इथे येऊन बसलो आहे.
११. पू. भार्गवराम यांचे अनाकलनीय वर्तन
अ. कपडे घालतांना काही वेळा हट्ट करणे. ते काही वेळा एवढा हट्टीपणा एवढा करतात की, काही सांगितले, तरी ऐकत नाहीत. अन्य वेळी जेवण नसले किंवा त्यांची कुणीही काळजी घेतली नाही, तरी ते कोणतीही अपेक्षा किंवा हट्ट करत नाहीत.
आ. काही वेळा पूर्ण रात्र न झोपणे आणि त्या वेळी काहीतरी बोलणे अन् मुद्रा करणे.’
– श्रीमती अश्विनी प्रभु (पू. भार्गवराम यांची आजी), मंगळुरू, कर्नाटक. (४.११.२०२०)
|