अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
धनबाद (झारखंड) – समाजात साधना करणारे आणि ती न करणारे या सर्वांनाच आनंदप्राप्तीची अपेक्षा असते. आज लोकांकडे पुष्कळ पैसा, महागडी गाडी असू शकते; परंतु घरात सुख, शांती आणि चांगली निद्रा हवी असेल, घरात एकमेकांशी चांगले संबंध हवे असतील, तर ते पैशाने मिळू शकत नाहीत. त्यासाठी साधनाच करावी लागते, म्हणजे केवळ अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्व आणि पूर्वाेत्तर भारतातील युवकांसाठी मागील वर्षी दळणवळण बंदीच्या कालावधीत ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि अध्यात्म’ या विषयावर ‘ऑनलाईन’ युवा धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यात आले. या वर्गाला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये पू. सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मधुलिका शर्मा यांनी केले. या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. श्रिया साह यांच्यासह काही युवकांनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक युवकांनी घेतला.