पुन्हा इंद्रप्रस्थ !
भारतात मोगलांचे आणि नंतर इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी संस्कृती, भाषा, आचारविचार, परंपरा, रूढी आदी सनातन धर्मानुसार सहस्रो वर्षांपासून चालू होत्या. सनातन धर्मीय त्याचे काटेकोर पालन करत होते. भारत हा विश्वगुरु होता. भारताला ‘सोने की चिडीया’ असे म्हटले जात होते; कारण हिंदु समाज हा धर्मपरायण होता. त्यामुळे भारतात आर्थिक, सांस्कृतिक सुबत्ता होती. भारताची भरभराट होती. ‘भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २८ टक्क्यांपेक्षा अधिक होते’, असे म्हटले जाते. त्या वेळी भारतात विविध राज्ये होती आणि त्यांचे राजे होते. अनेक राजांना पराभूत करून त्यांच्यावर अंमल करणारे चक्रवर्ती राजे, सम्राट होते. तरीही धर्माचरणाद्वारे ते सर्व आतून एकच होते. संस्कृत ही राष्ट्रभाषा होती; मात्र या सर्व गोष्टींना दृष्ट लागली. गेल्या १ सहस्र २०० वर्षांत हे सर्व नष्ट झाले. थोडेसे जे काही टिकून आहे, ते साधू, संत आणि साधक यांच्या साधनेमुळे, तसेच जागृत देवस्थानांमुळे आहे. प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय हा ठरलेला आहे. लयानंतर पुन्हा उत्पत्ती आणि पुन्हा पुढची स्थिती येत असते. हा सृष्टीचा नियम आहे. त्यानुसार घडत असते आणि ते स्वीकारावे लागते. त्यामुळेच भरभराटीला आलेल्या भारताची स्थिती आज दयनीय झाली आहे. त्याला पुन्हा उर्जितावस्था देण्याची वेळ आली आहे. नव्हे ते विधीलिखितच आहे. म्हणजे पुन्हा उत्पत्ती आहेच. साधू, संत, द्रष्टे यांनी सांगितलेलेच आहे की, लवकरच पृथ्वीवर पुन्हा सत्ययुग येणार आहे. म्हणजेच जी काही अधोगती झाली आहे, ती पालटून संपूर्ण सनातन धर्माचे राज्य येणार आहे. त्या दिशेने देशाची वाटचाल चालू आहे. मधल्या काळात विनाश होणार असला, तरी त्यातून चांगलेच निष्पन्न होणार आहे. गेल्या काही वर्षांत देशात हिंदूंमध्ये स्वतःच्या धर्माविषयीचा अभिमान पुन्हा जागृत होत आहे. हिंदूंना त्यांच्या संस्कृतीची महानता लक्षात येऊ लागली आहे. साधू, संत यांचा सन्मान होऊ लागला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एक महंत आहेत आणि ते राज्यकारभार करत आहेत. त्यांनी राज्यातील अनेक शहरांची मोगल आणि इंग्रजांच्या काळात पालटलेली गेलेली सनातन धर्मानुसारची नावे पुन्हा देण्यास प्रारंभ केलाच आहे. यातून हिंदूंना मोगल आणि इंग्रज यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडत असल्याची जाणीव होत आहे. याचा अर्थ हे सर्व करण्यासाठी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीचीच आवश्यकता आहे, असेही लक्षात येते. असे कार्य करण्याचे धारिष्ट्य अन्य कुणाला होत नाही, हेही येथे लक्षात घ्यायला हवे.
आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ ठेवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका संशोधनाचाही हवाला दिला आहे. ‘देहली’ शब्दामुळे देशात अशांतता आहे. तिचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ केल्यास भारतात शांतता नांदू शकेल’, असा दावा त्यांनी केला आहे. इंद्रप्रस्थ हे पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेतून वसवलले राज्य होते. साक्षात् विश्वकर्मा देवाने ते उभारले होते. कौरवांनी राज्यातील पांडवांचा वाटा म्हणून खांडव वन हे जंगल दिले होते. त्या जंगलाचा कायापालट भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे पांडव करू शकले. त्या काळापासून गेल्या काही शतकांपूर्वीपर्यंत या ठिकाणाला इंद्रप्रस्थच म्हणत होते. याच ठिकाणी आज देहली राज्य आहे.
आध्यात्मिक महत्त्व !
भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशातील मोगल आणि इंग्रज यांची गुलामगिरी दर्शवणारी शहरांची, राज्यांची, मार्ग, इमारती आदींची नावे पालटून त्यांना पूर्वीची नावे देण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र काँग्रेसच्या, विशेषतः गांधी-नेहरू परिवाराच्या मुसलमानप्रेमामुळे ते होऊ शकले नाही. त्यामुळे हिंदूंचे तीर्थक्षेत्र ‘प्रयागराज’चे नाव ‘अलाहाबाद’ हेच कायम होते. ते आता योगी आदित्यनाथ यांनी पालटले. अशीच काही नावे त्यांनी पालटली; मात्र अद्याप देशात असंख्य नावे आहेत, ज्यात पालट होण्याची आवश्यकता आहे. क्रूर मोगल बादशहा अकबर, हुमायू, शहाजहान, औरंगजेब आदींच्या नावावर अनेक शहरे, स्थाने, मार्ग आहेत. त्यात पालट होऊ शकलेला नाही. ‘ही मानसिक गुलामगिरी आहे.’, हेही राजकारण्यांच्या लक्षात येत नाही, हे यातून लक्षात येते. प्रत्येक गोष्टीमागे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची एकत्रित शक्ती कार्यरत असते.
अध्यात्मानुसार प्रयोग करायचा झाला, तर ‘अलाहाबाद’ या नावाचा जप २ मिनिटे आणि ‘प्रयागराज’ या नावाचा जप २ मिनिटे केल्यावर लक्षात येऊ शकेल. अशा नावांमुळे देशात शेकडो वर्षे नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत आहे. त्यामुळेच डॉ. स्वामी यांचा दावा आहे की, देहलीचे नाव पालटून इंद्रप्रस्थ ठेवल्यास देशात शांतता निर्माण होऊ शकते. त्यांच्या या दाव्याकडे आता अधिक गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. डॉ. स्वामी यांच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने कृती करावी, असेच हिंदूंना वाटते. हा आपला गौरवशाली इतिहास आहे. तो पुन्हा हिंदूंसमोर ठेवण्याची आवश्यकता आहे. यातून पुढच्या पिढीमध्ये अभिमान निर्माण होऊ शकतो. आज नाही, तर उद्या हे हिंदूंना करावेच लागणार आहे. शेक्सपिअरने म्हटले आहे की ‘नावामध्ये काय ठेवले आहे?’ मात्र हिंदु संस्कृतीनुसार नावात बरेच काही दडलेले आहे. हिंदूंच्या ऋषिमुनींनी संशोधन करून नावे निर्माण केली आहेत. हिंदूंचे वेद, पुराणे आदींमध्ये अनेक नावे दिलेली आहेत आणि त्यांना विशेष अर्थ आहे. त्याला आध्यात्मिक महत्त्व आहे. अनेक देवतांची एक सहस्र इतकी वेगवेगळी नावे आहेत. त्यांचे पठण केल्याने आध्यात्मिक लाभ होतो, असे ऋषिमुनींनी सांगून ठेवलेले आहे आणि त्याची प्रचीती सहस्रो वर्षे हिंदू घेत आले आहेत आणि घेत आहेत. भारत हा श्रीराम, श्रीकृष्ण आदी अवतारांचा देश आहे. अवतारांच्या देशात दुर्जनांची, असुरांची, तसेच अर्थहीन नावे असणे कदापि योग्य ठरणार नाही. त्यात पालट झालाच पाहिजे. भारताचे नाव हे भरत राजामुळे पडले आहे. तसेच ‘भारत’ या शब्दाला वेगळा आध्यात्मिक अर्थ आहे. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे तेजाच्या उपासनेत मग्न असणारे. असे जे लोक रहातात तो ‘भारत’ होय. त्यामुळे पुढे ‘भारता’चे ‘इंडिया’ हे नावही पालटून केवळ ‘भारत’ ठेवणेच भारताच्या शांततेसाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे. तशी मागणी होत आलीच आहे. ती पूर्ण करण्यासाठी सध्याच्या केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाहीतरी, पुढील २ वर्षांनी देशात येणार्या हिंदु राष्ट्रात हे होणारच आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे वेगळे सांगायला नको !