मोरजी येथे १६ वर्षीय युवतीचा बुडून मृत्यू
पेडणे – मोरजी, पेडणे येथे २२ मे या दिवशी १६ वर्षीय युवतीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. पोलीस सूत्रानुसार २२ मे या दिवशी सायंकाळी ६.३० वाजल्यानंतर युवती तिच्या ३ नातेवाईकांसमवेत मोरजी येथील समुद्रकिनार्यावर गेली होती. सध्या संचारबंदी लागू असल्याने पोलीस आणि जीवरक्षक यांना चुकवण्यासाठी ते सायंकाळी समुद्रावर गेले असण्याची शक्यता आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे अजूनही समुद्र खवळलेला आहे. युवती आणि तिचे तीनही नातेवाईक समुद्रात वाहून गेले; मात्र युवती व्यतिरिक्त तिच्या तीनही नातेवाइकांना वाचवण्यात आले. युवतीला पाण्यातून काढले असता ती बेशुद्धावस्थेत होती. तिला उपचारार्थ गोमेकॉत भरती केले असता तिथे तिचा मृत्यू झाला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक दळवी यांनी नागरिकांना खवळलेल्या समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे, तसेच या कोरोना महामारीत स्वत:हून संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.