परिचारिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी बैठक घेण्याचे पालकमंत्र्यांचे आश्‍वासन  

जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचे अचानक कामबंद आंदोलन

उदय सामंत

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी २२ मे या दिवशी अचानक कामबंद आंदोलन केले होते. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत परिचारिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्या वेळी परिचारिकांनी समस्यांचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचला, तसेच एका वैद्यकीय अधिकार्‍याकडून त्रास होत असल्याचा आरोपही परिचारिकांनी केला. पालकमंत्री आणि परिचारिका यांच्यात चर्चा झाल्यानंतर परिचारिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक घेऊन प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन पालकमंत्री सामंत यांनी दिले.

रुग्णालयात अपुरे साहित्य असते, तसेच अनावश्यक काम सांगणे, एका वैद्यकीय अधिकार्‍याकडून होणारा त्रास, रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी आणि अन्य कर्मचारी यांना वेतन न मिळणे, महिलांच्या स्वच्छतागृहाला दरवाजे नसणे, अल्प कर्मचार्‍यांमुळे येणारा ताण आदी समस्या परिचारिकांनी पालकमंत्री सामंत यांच्यासमोर बैठकीत मांडल्या. या वेळी पालकमंत्री सामंत यांनी, ‘परिचारिकांना योग्य त्या सोयीसुविधा तात्काळ रुग्णालय प्रशासनाने द्याव्यात. शासनस्तरावरील मागण्याविषयी बैठक घेण्यात येईल. त्यासाठी पाठपुरावा करू. कामाचा ताण अल्प करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची भरती करू’, असे आश्‍वासन दिले.