साथीचा रोग विशेषज्ञानुसार गोव्यात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येऊ शकते ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोमेकॉ

स्तनपान करणार्‍या मातांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याची तज्ञ समितीची शिफारस

पणजी, २३ मे (वार्ता.) – साथीचा रोग विशेषज्ञानुसार गोव्यात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येऊ शकते, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेविषयी शासनाला शिफारस करण्याच्या हेतूने स्थापित करण्यात आलेल्या तज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीनंतर अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर पत्रकारांशी बोलत होते.

१८ वर्षांहून अल्प वयाच्या गटात कोरोनाची बाधा होण्याच्या प्रमाणात मंदगतीने वाढ

कोरोनाच्या पहिल्या लाटेत १८ वर्षांहून अल्प वयाच्या गटात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण ७ ते ८ टक्के होते. आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मागील ३ मासांत हे प्रमाण १० ते १२ टक्के झाले आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. देशभरात हीच स्थिती आहे, अशी माहिती तज्ञ समितीचे सदस्य डॉ. जगदीश काकोडकर यांनी दिली.

शहरानजीकच्या परिसरात कोरोनाच्या संसर्गात वाढ : राज्यात २०६ ‘हॉटस्पॉट’ कार्यान्वित

गोवा राज्यात आता कोरोनाविषयी २०६ ‘हॉटस्पॉट’ कार्यान्वित आहेत. कोरोनाचा संसर्ग शहराच्या नजीकच्या परिसरात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट येईल असा अंदाज जरी वर्तवला जात असला, तरी कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण, शाळा पुन्हा चालू करणे, गर्दीची ठिकाणे आदी गोष्टी हा अंदाज सत्यात उतवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत, असे तज्ञ समितीचे सदस्य डॉ. जगदीश काकोडकर पुढे म्हणाले.

कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पाहून शाळा पुन्हा चालू करण्याविषयी तज्ञ समिती शिफारस करणार

संबंधित वेळेत कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पाहून शाळा पुन्हा चालू करण्याविषयी तज्ञ समिती शिफारस करणार आहे. कदाचित् आवश्यकता भासल्यास समिती शाळा चालू न करण्याचीही शिफारस करू शकते, अशी माहिती गोमेकॉचे अधिष्ठाता

डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. गोमेकॉत ‘ब्लॅक फंगस’च्या ७ रुग्णांवर उपचार

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘ब्लॅक फंगस’च्या ७ रुग्णांवर उपचार चालू आहेत. केंद्राने ‘लिपोसोमल अँफोटॅरीसीन – बी’ची ५० अतिरिक्त ‘व्हायल’ राज्यशासनाला दिली आहेत, तर केंद्राने यासंबंधी १०० इंजेक्शने यापूर्वीच दिलेली आहेत. राज्यशासनाने आता २ सहस्र अतिरिक्त ‘व्हायल’ची मागणी केली आहे. गोव्यात ‘ब्लॅक फंगस’चा संसर्ग झालेला एक रुग्ण यापूर्वीच दगावला आहे.

तज्ञ समितीने केलेल्या शिफारसी

१. १८ वर्षांहून अल्प वयाच्या गटासाठी नवीन जन्माला आलेले, सर्वसामान्य मुले, कुमारावस्थेतील मुले, असे ३ उपगट सिद्ध करावे. या तिन्ही उपगटांसाठी साधनसुविधा उपलब्ध कराव्या. राज्यात १८ वर्षांहून अल्प वयाच्या गटात ४.५ ते ५ लक्ष मुले आहेत.

२. कोरोनाची बाधा अल्प, मध्यम आणि अधिक प्रमाणात झालेल्यांसाठी उपचार नियमावली सिद्ध करणार. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये ही नियमावली लागू

केली जाईल.

३. तिसर्‍या लाटेच्या वेळी पालकांपासून मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याच्या शक्यतेवरून स्तनपान करणार्‍या मातांना (मूल २ हून अल्प वर्षाचे असेल आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील विविध व्याधींनी ग्रस्त असलेली माता यांना) लसीकरणासाठी प्राधान्य गट मानण्याची शिफारस

४. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक बालरोग खासगी रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रूपांतर करणे तज्ञ समितीच्या या शिफारसी शासनाच्या कृती दलाला सुपुर्द करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ३३ नवजात बालकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे.