महर्लोकात स्थान प्राप्त झालेले डॉ. नंदकिशोर वेद यांच्या मृत्यूचे आणि त्यांच्यावरील अंत्यसंस्कार विधीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !
‘डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. या रोगाच्या पेशी त्यांच्या संपूर्ण देहात पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या देहामध्ये रज-तमाचे प्राबल्य वाढत होते; परंतु ते सतत भगवंताच्या अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्याकडे ईश्वरी चैतन्य येत असल्याने त्यांचा स्थूलदेह ईश्वरी चैतन्याने भारित झाला होता. त्यामुळे त्यांच्या देहातील रज-तमाचे प्रमाण न्यून झाले आणि त्यांच्याकडून होत असलेले सकारात्मक ऊर्जालहरींचे प्रक्षेपण वाढले.
(‘यू.ए.एस्’ या उपकरणाने डॉ. नंदकिशोर वेद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्थूलदेहाची स्पंदने मोजल्यावर त्यांच्या भोवती ५५ मीटर इतकी सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ होती.’ – संकलक)
१. कै. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या मृत्यूपूर्वी जाणवलेले दैवी पालट आणि त्यांमागील कार्यकारणभाव
१ अ. त्वचा पिवळसर दिसणे : कै. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या देहामध्ये सगुण स्तरावरील चैतन्यलहरी कार्यरत असल्यामुळे त्यांची त्वचा पिवळसर रंगाची दिसत होती.
१ आ. पायांवरील त्वचा चमकणे : त्यांच्या त्वचेतील रज-तम लहरींचे प्रमाण न्यून होऊन त्यामध्ये आप आणि तेज या स्तरांवरील चैतन्य कार्यरत झाले होते. आपतत्त्वाच्या चैतन्यलहरींमुळे त्यांच्या त्वचेची शुद्धी झाली आणि तेजतत्त्वाच्या लहरींमुळे त्यांची त्वचा तेजस्वी झाली. त्यामुळे त्यांची त्वचा चमकत होती.
१ इ. हात आणि पाय यांची नखे निळसर रंगाची दिसणे : ते सतत श्रीविष्णूचे आणि प्रभु श्रीरामाचे स्मरण करत असल्यामुळे त्यांचे हात आणि पाय यांमध्ये विष्णुतत्त्व कार्यरत होऊन ते नखांद्वारे वातावरणात प्रक्षेपित होत होते. त्यामुळे त्यांच्या हाता-पायांची नखे निळसर रंगाची दिसत होती. (‘कै. डॉ. नंदकिशोर वेद हे आश्रमात येण्यापूर्वी अयोध्येत रहात होते आणि त्यांची प्रभु श्रीरामावर नितांत श्रद्धा होती.’ – संकलक)
२. कै. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या मृत्यूनंतर जाणवलेले दैवी पालट आणि त्यांमागील कार्यकारणभाव
२ अ. उजव्या पायावर ‘ॐ’ हे शुभचिन्ह दिसण्यामागील कार्यकारणभाव : ‘ॐ’ हा निर्गुणवाचक बीजमंत्र आहे. या बीजमंत्राच्या उच्चारणामुळे व्यक्तीला निर्गुण स्तरावरील ऊर्जा आणि चैतन्य यांची प्राप्ती होते. ‘कै. वेदकाकांच्या साधनेमुळे त्यांचे सगुणस्वरूप असणारे मानवी जीवन संपुष्टात आले असून त्यांचा मृत्यूत्तर प्रवास निर्गुणाकडे चालू झाला’, हे दर्शवण्यासाठी त्यांच्या उजव्या पायावर ‘ॐ’ हे शुभचिन्ह उमटले.
२ आ. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा (तर्जनीचे टोक अंगठ्याच्या टोकाला जोडलेले असणे) असणे आणि मुखावर हास्य असणे यांमागील कार्यकारणभाव : कै. वेदकाकांनी ‘मृत्यू हे अटळ सत्य असून देह नश्वर आहे; परंतु आत्मा अमर आहे’, हे सत्य जाणले होते. या सत्याची अनुभूती घेतच त्यांनी आनंदाने देहत्याग केला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूसमयी त्यांनी त्यांच्या डाव्या हाताची ज्ञानमुद्रा केली होती आणि आनंदाने मृत्यूचा स्वीकार केल्यामुळे त्यांच्या मुखावर हास्य होते.
२ इ. मृत्यूनंतर खोलीत सुगंध दरवळणे आणि खोली प्रकाशमान दिसणे यांमागील कार्यकारणभाव : देहत्यागाच्या वेळी कै. वेदकाकांच्या देहातून संपूर्ण वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण पृथ्वी आणि तेज या तत्त्वांच्या स्तरांवर झाले. त्यांच्यातील भावामुळे पृथ्वीतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झालेल्या चैतन्यामुळे वातावरणात सुगंध दरवळत होता. त्याचप्रमाणे त्यांच्यातील प्रगल्भतेमुळे तेजतत्त्वाच्या स्तरावर प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे त्यांच्या खोलीत प्रकाश पसरला होता.
३. कै. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेत असतांना जाणवलेली सूत्रे
३ अ. त्यांच्या देहावर पिवळसर रंगाची छटा दिसण्यामागील कार्यकारणभाव : कै. वेदकाकांमध्ये कार्यरत असणारे ईश्वरी चैतन्य त्यांच्या मृत्यूनंतर दोन भागांमध्ये विभाजित झाले. सूक्ष्म आणि सगुण स्तरावरील चैतन्य त्यांच्या पार्थिव देहात राहिले. या सूक्ष्म चैतन्यलहरींचे घनीकरण त्यांच्या पार्थिव देहात झाल्यामुळे तो पिवळसर रंगाचा दिसला. त्याचप्रमाणे सूक्ष्मतर आणि निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य त्यांच्या लिंगदेहासह कार्यरत असल्यामुळे त्यांचा मृत्यूत्तर प्रवास लवकर पूर्ण होऊन त्यांना चांगली गती मिळाली. या सूक्ष्मतर स्तरावरील निर्गुण-सगुण स्वरूपाच्या चैतन्यलहरींमुळे त्यांना महर्लोकात स्थान मिळाले.
३ आ.‘ते गाढ निद्रेत आहेत’, असे जाणवण्यामागील कार्यकारणभाव : मृत्यूपूर्वी वेदकाकांचे ईश्वराशी अनुसंधान वाढून त्यांची वृत्ती अंतर्मुख झाली होती. ही अंतर्मुखता मुखावर गाढ ध्यान किंवा निद्रा यांच्या रूपाने व्यक्त होते. त्यामुळे कै. वेदकाकांचा पार्थिव देह पहातांना ‘ते गाढ निद्रेत आहेत’, असे जाणवले.
४. देहातून उत्सर्जित होणारा सूक्ष्म दूषित वायू तिरडीच्या बांबूंच्या पोकळीमध्ये आकृष्ट होणे
त्यांच्या देहातून उत्सर्जित होणारा सूक्ष्म दूषित वायू तिरडीच्या बांबूंच्या पोकळीमध्ये आकृष्ट होत होता. त्या पोकळीत त्रासदायक वायू शोषला जाऊन वायुमंडल शुद्ध रहाते. यावरून प्रेत ठेवण्यासाठी बांबूची तिरडी बनवण्यामागील शास्त्र आपल्या लक्षात येते.
५. कै. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पार्थिवावर प्रकाश करंदीकर यांनी दर्भाने तिलोदक प्रोक्षण करणे
दर्भामध्ये तेजतत्त्वाच्या स्तरावर सात्त्विक लहरी धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असते अन् तिळाकडे पितृलहरी आकृष्ट होतात. श्री. प्रकाश करंदीकर यांनी कै. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पार्थिवावर दर्भाने तिलोदक प्रोक्षण केल्यामुळे त्यांच्या पार्थिवाभोवती तेजतत्त्वामक लहरींचे आच्छादन निर्माण झाले. त्यामुळे वातावरणात भटकणार्या वाईट शक्तींना कै. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पार्थिव देहाचे नियंत्रण मिळवता आले नाही. तिळमिश्रित जलाकडे कै. वेद यांच्या पितरांच्या लहरी आकृष्ट होऊन त्यांच्या लिंगदेहाच्या स्पंदनांशी पितरांच्या लहरी जोडल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाचे पितरलोकात स्थान निर्माण होण्यास साहाय्य झाले.
६. उत्तरक्रियेच्या अंतर्गत प्रकाश करंदीकर यांनी कै. वेदकाकांच्या पार्थिव देहाला भस्मलेपन करणे
कै. वेदकाकांच्या उत्तरक्रियेच्या वेळी श्री. प्रकाश करंदीकर यांनी त्यांचे कपाळ, हात इत्यादी भागांवर भस्माचे पट्टे लावून भस्मलेपन केले होते. भस्मामध्ये शिवाची तारक-मारक शक्ती, वैराग्यदायी शक्ती आणि निर्गुण चैतन्य कार्यरत असल्यामुळे भस्मलेपन केल्याने कै. वेदकाकांचा पार्थिव देह आणि लिंगदेह यांच्याभोवती शिवतत्त्वात्मक चैतन्यलहरींचे संरक्षककवच निर्माण झाले. त्यामुळे यमदूतांनी कै. वेदकाकांचा लिंगदेह शिवगणांकडे सोपवला आणि शिवगणांनी त्यांचा लिंगदेह महर्लोकापर्यंत पोचवण्याचे दायित्व स्वीकारले.
७. प्रकाश करंदीकर यांनी कै. वेदकाकांच्या पार्थिव देहाला पांघरलेल्या पांढर्या वस्त्राचा उर्वरित भाग कापून ‘उपरणे’ म्हणून अंगावर घेणे
कै. वेदकाकांच्या पार्थिव देहाची स्पंदने त्यांना पांघरलेल्या पांढर्या वस्त्रामध्ये आली. या वस्त्राचा उर्वरित भाग श्री. प्रकाश करंदीकर यांनी कापून तो उपरण्याप्रमाणे घेतल्यामुळे त्यांच्या भोवती कै. वेदकाकांची स्पंदने कार्यरत झाली. त्यामुळे श्री. प्रकाश करंदीकर यांनी केलेल्या अंत्यविधीच्या कृतींचा परिणाम त्या वस्त्रामध्ये आकृष्ट झालेल्या कै. वेदकाकांच्या स्पंदनांच्या माध्यमातून त्यांच्या लिंगदेहापर्यंत पोचला. अशा प्रकारे अंत्यसंस्कार विधीच्या अंतर्गत केलेल्या धार्मिक कृतींचा परिणाम थेट कै. वेदकाकांच्या लिंगदेहावर होऊन धार्मिक विधींतून कार्यरत झालेली सात्त्विक ऊर्जा त्यांना सद्गतीसाठी मिळणार आहे.
८. प्रकाश करंदीकर यांनी कै. वेदकाकांच्या पार्थिव देहाला तुळशीहार घालून नमस्कार करणे
तुळशीच्या हारामध्ये कार्यरत असणार्या विष्णुतत्त्वाच्या लहरी तुळशीच्या पानांच्या सुगंधामध्ये कार्यरत होत्या. हा हार श्री. प्रकाश करंदीकर यांनी कै. वेदकाकांच्या पार्थिवाला घातला. तेव्हा त्यांच्या पार्थिव देहाभोवती गंधमय विष्णुतत्त्वाच्या लहरींचे संरक्षककवच निर्माण झाले. तसेच तुळशीच्या पानांतून प्रक्षेपित होणार्या प्राणवायूमुळे कै. वेदकाकांचा देह शुद्ध झाला आणि त्यांच्या देहातील धनंजय वायूला देहातून बाहेर पडण्यासाठी ऊर्जा मिळाली.
९. कै. वेदकाकांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांना चैतन्य आणि आनंद जाणवणे
कै. वेदकाकांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये चैतन्य कार्यरत होते. त्याचप्रमाणे त्यांनी मृत्यूला शांतपणे स्वीकारले होते. त्यामुळे मृत्यूनंतरही त्यांचा लिंगदेह आनंदी होता. त्यामुळे कै. वेदकाकांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांना चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती आली.
१०. कै. वेदकाकांचा पार्थिव देह स्मशानात नेणे
एका वाहनातून कै. वेदकाकांचा पार्थिव देह आश्रमाच्या जवळील स्मशानात नेला. त्यांच्या अंत्यसंस्कार विधीच्या वेळी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमातून प्रक्षेपित होणार्या चैतन्यलहरी स्मशानाच्या दिशेने प्रक्षेपित होऊन कै. वेदकाकांच्या पार्थिव देहाने ग्रहण केल्या. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाला मृत्यूत्तर प्रवास करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाली.
११. कै. वेदकाकांच्या लिंगदेहाने त्यांच्या पार्थिव देहावर केलेला अंत्यसंस्कार विधी साक्षीभावाने पहाणे
स्मशानामध्ये कै. वेदकाकांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार विधी चालू होते. तेव्हा त्यांचा लिंगदेह स्मशानाच्या वरील वायूमंडलातून स्वतःच्या देहावरील अंत्यसंस्कारविधी साक्षीभावाने पहात होता. यावरून ‘वेदकाकांची आंतरिक साधना किती चांगली आहे ?’, याची प्रचीती आली.
१२. अंत्यसंस्कार विधीमुळे कै. वेदकाकांची आसक्ती नष्ट होऊन त्यांच्या मनात वैराग्य जागृत होणे
अग्नीच्या क्रव्याद रूपाने कै. वेदकाकांच्या पार्थिव देहाला जाळून भस्म केले. त्याच वेळी अग्नीतत्त्वाच्या सूक्ष्म लहरींनी कै. वेदकाकांच्या पार्थिव देहाशी संबंध असलेल्या त्यांच्या लिंगदेहाचीही शुद्धी केली. त्यामुळे कै. वेदकाकांच्या लिंगदेहाचा त्यांच्या पार्थिव देहाशी असणार्या भावभावना संपुष्टात येऊन स्थूलदेहाशी असणारा संबंध संपला. त्यामुळे कै. वेदकाकांच्या मनातील त्यांच्या स्थूलदेहाशी संबंधित असणारी उरलेली आसक्तीही नष्ट होऊन त्यांच्यामध्ये वैराग्य जागृत झाले. या वैराग्यामुळे त्यांचे लक्ष त्यांच्या मृत्यूत्तर प्रवासाकडे केंद्रित झाले.
१३. श्रीगुरूंच्या पावन हस्तस्पर्शामुळे कै. वेदकाकांच्या लिंगदेहाच्या मानवसदृश्य आकृतीचे रूपांतर पिवळसर रंगाच्या ज्योतीमध्ये होणे
कै. वेदकाकांनी आयुष्यभर मनापासून साधना केली होती. त्याचप्रमाणे त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाच्या ठिकाणी मला सूक्ष्मातून गुरु-शिष्य यांचे बोधचिन्ह दिसले. त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा असल्यामुळे त्यांच्या लिंगदेहाभोवती श्रीगुरुकृपेचे संरक्षककवच निर्माण झाले. श्रीगुरूंनी त्यांचा लिंगदेह त्यांच्या ओंजळीत घेतला. तेव्हा श्रीगुरूंच्या पावन हस्तस्पर्शामुळे कै. वेदकाकांच्या लिंगदेहाच्या मानवसदृश्य आकृतीचे रूपांतर पिवळसर रंगाच्या ज्योतीमध्ये झाले.
१४. श्रीगुरूंच्या ओंजळीतील कै. वेदकाकांच्या ज्योतीस्वरूप लिंगदेहाने पितरलोकामध्ये पितरांचे भावपूर्ण दर्शन घेणे
श्रीगुरूंनी ज्योतीस्वरूप असणारा श्री. वेदकाकांचा लिंगदेह त्यांच्याओंजळीत धारण करून तो वरच्या दिशेने नेला. तेव्हा लिंगदेहाने पृथ्वीची, म्हणजे भूलोकाची कक्षा पार करून भुवलोकात प्रवेश केला. तेथे पितरलोक होता. कै. वेदकाकांच्या ज्योतीस्वरूप लिंगदेहाला पितरलोकात त्यांच्या पितरांचे दर्शन झाले. त्यांनी पितरांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. पितरांनी त्यांना सद्गती मिळण्याचा आशीर्वाद दिला. त्यानंतर श्रीगुरूंच्याओंजळीतील ज्योतीमध्ये वेदकाकांची पृथ्वीवरील मनुष्याची आकृती प्रगट झाली. तिने सर्व पितरांप्रती कृतज्ञतापूर्वक नमस्कार व्यक्त केला. त्यानंतर ती आकृती ज्योतीमध्येच लुप्त झाली.
१५. श्रीगुरूंच्या ओंजळीतील कै. वेदकाकांचा ज्योतीस्वरूप लिंगदेह स्वर्गलोकापर्यंत पोचणे
त्यानंतर श्रीगुरूंच्या ओंजळीतील कै. वेदकाकांचा ज्योतीस्वरूप लिंगदेह स्वर्गलोकापर्यंत पोचला. तेव्हा त्यांनी स्वर्गलोकातील देवतांचे दर्शन घेतले. स्वर्गलोकातील देवतांनी त्यांना पुढील प्रवास आणि साधना चांगली होण्याचा आशीर्वाद दिला. तेव्हा कै. वेदकाकांच्या ज्योतीस्वरूप लिंगदेहाला श्रीरामाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. तेव्हा ज्योतीस्वरूप कै. वेदकाकांच्या लिंगदेहाने मनोमन प्रभु श्रीरामाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भावपूर्ण वंदन केले.
१६. कै. वेदकाकांचा ज्योतीस्वरूप लिंगदेह महर्लोकात स्थिर होणे आणि तेथील सनातनच्या दिवंगत साधकांच्या लिंगदेहांना गुरुवाणी आकाशवाणीच्या स्वरूपात ऐकू येणे
त्यानंतरओंजळीतील कै. वेदकाकांचा ज्योतीस्वरूप लिंगदेह पुढे गेला आणि त्याने महर्लोकात प्रवेश केला. तेथे सनातनच्या दिवंगत साधकांच्या प्रकाशमय गोळ्यांच्या रूपात असणार्या लिंगदेहांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यामध्ये हल्लीच दिवंगत झालेले कै. मोहन चतुर्भुज, कै. सौ. विनया पाटील इत्यादी सनातनच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांचा समावेश होता. श्रीगुरूंच्या ओंजळीतील ज्योतीस्वरूप असणार्या कै. वेदकाकांचा लिंगदेह पाहून त्यांना आनंद झाला. त्यानंतर श्रीगुरूंची ओंजळ अदृश्य झाली आणि कै. वेदकाकांचा ज्योतीस्वरूप लिंगदेह महर्लोकात स्थिर झाला. तेव्हा महर्लोकातील सनातनच्या दिवंगत साधकांच्या लिंगदेहांना गुरुवाणी आकाशवाणीच्या स्वरूपात ऐकू आली. ‘‘तुम्हा सर्वांना हिंदु राष्ट्रात पुनर्जन्म मिळणार असून तुमची पुढील साधना चांगली होणार आहे. जोपर्यंत पृथ्वीवर हिंदु राष्ट्र येत नाही, तोपर्यंत तुम्ही महर्लोकात राहून व्यष्टी आणि समष्टी साधना करा. येथील इतर जिवांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, तसेच भावजागृती अन् गुणसंवर्धन हे साधनेतील टप्पे शिकवा. त्याचप्रमाणे येथे हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार करून सर्वांना ‘हिंदु राष्ट्राचे महत्त्व सांगून या ईश्वरी कार्यामध्ये कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ?’, हे सांगा. तुमचे कल्याण होवो.’’ ही आकाशवाणीस्वरूप गुरुवाणी ऐकून महर्लोकातील सनातनच्या सर्व दिवंगत साधकांनी श्रीगुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करून गुरुचरणी भावपूर्ण पुष्पांजली मानसरित्या अर्पण केली.
परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेमुळे ‘मृत्यूनंतरही परात्पर गुरुमाऊली प्रत्येक साधकाची जिवापाड काळजी घेते’, हे सूत्र शिकायला मिळाले. यासाठी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२१)
या अंकात प्रसिद्ध होणारे लिखाण डॉ. नंदकिशोर वेद संत होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख लिखाणात आहे तसा ठेवण्यात आला आहे – संपादक
|