नागपूर येथे पोलीस अधिकार्याने वृद्ध महिलेचा भाजीपाला रस्त्यावर फेकला !
|
नागपूर – शहरातील जरीपटका भागात पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी रस्त्याशेजारी भाजीची विक्री करणार्या एका वृद्ध गरीब महिलेचा भाजीपाला भर रस्त्यात फेकून दिला. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्याकडून खांडेकर यांची चौकशी चालू असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेची नोंद पालकमंत्री नितीन राऊत यांनाही घ्यावी लागली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी खांडेकर यांचे २ वर्षांचे ‘इन्क्रिमेंट’ न देण्याचा आदेश काढला आहे. (अशा उद्दाम पोलीस अधिकार्यांच्या वर्तनामुळे संपूर्ण पोलीस दलाची अपर्कीती होते. अशांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)
याविषयी पोलिसांच्या ट्विटरवर ‘पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर नोंद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्या अमानवीय व्यवहारावर खेद व्यक्त करण्यात आला आहे, तसेच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावतांना मानवीय दृष्टीकोन बाळगूनच कार्य करावे’, असा उपदेश पोलिसांना देण्यात आला आहे.
सौजन्य : यूट्यूब