कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संसर्ग मुलांना होण्याच्या शक्यतेविषयी सावध रहावे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

बालरोगतज्ञांच्या ‘टास्क फोर्स’ला मुख्यमंत्र्यांचे आवाहन

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याविषयी, तसेच त्यामध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याविषयी अनुमान व्यक्त होत आहेत. याविषयी आपण सावध राहिले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बालरोगतज्ञांच्या ‘टास्क फोर्स’ला केले. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा लहान मुलांना संसर्ग होण्याचे अनुमान तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर २३ मे या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बालरोगतज्ञांच्या ‘टास्क फोर्स’शी संवाद साधला.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झाला, दुसर्‍या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या संसर्गाचे वय खाली येत आहे. आता तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचे अनुमान व्यक्त केले जात आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या साखळीप्रमाणे आपणही आपली एक घट्ट साखळी सिद्ध करून एकजुटीने कोरोनाचा प्रतिकार करू.’’