कोरोना महामारीच्या काळामध्ये होणार्या फसवणुकीच्या विरोधात संघटितपणे लढा देणे आवश्यक ! – वैद्य उदय धुरी, मुंबई जिल्हा समन्वयक, आरोग्य साहाय्य समिती
आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देणारी आरोग्य साहाय्य समिती !
‘आरोग्य साहाय्य समिती’ आयोजित विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना काळात फसवणुकीचे बळी : आपले अधिकार ओळखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र !
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने सर्वत्र मृत्यूचे थैमान घातले आहे. सध्या समाजात प्रचंड चिंता आणि तणावाचे वातावरण आहे. अशा गंभीर स्थितीतही रुग्णालयांकडून रुग्णांची लुबाडणूक होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून चालू असलेले दुष्प्रकार आणि अन्याय आजतागायत चालू आहेत. या अन्यायाचा प्रतिकार करणे, हा सर्वसामान्यांचा घटनात्मक अधिकार असून ही लूट कशा प्रकारे चालू आहे ? आणि ती रोखण्यासाठी कोणते प्रयत्न करू शकतो ? याचा ऊहापोह आरोग्य साहाय्य समितीने आयोजित केलेल्या विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना काळात फसवणुकीचे बळी : आपले अधिकार ओळखा !’ या विषयावर नुकत्याच झालेल्या ‘ऑनलाईन’ चर्चासत्रात करण्यात आला.
या कार्यक्रमात नवी मुंबई येथील माथाडी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे आणि आरोग्य साहाय्य समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक वैद्य उदय धुरी, तसेच पुणे येथील ‘श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल’ येथे सेवारत असणार्या भूलतज्ञ आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी विश्लेषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजेश कणगलेकर यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आरोग्य साहाय्य समितीने केलेल्या विविध कार्याची माहिती एका चलचित्राद्वारे दाखवण्यात आली.
पुणे – सध्या कोरोना रुग्णांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यांना अनेक ठिकाणी खाटा मिळण्यासाठी धावाधाव करावी लागते. एवढे करूनही जागा मिळेलच, याची कोणतीही शाश्वती नसते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय करणे, त्यांच्याकडून अधिक देयकाची वसुली करणे, आवश्यकता नसतांना रुग्णाला रुग्णालयात ठेवणे, त्यांची अडवणूक अथवा फसवणूक केली जाणे आदी अपप्रकार केले जात आहेत. असे असले, तरी आपल्याला शासनाने निर्धारित केलेले रुग्णसेवेचे दर, आवश्यक औषधे, पर्यायी औषधे, आपले अधिकार, सध्याचे कायदे हे ज्ञात नसल्यामुळे आपली प्रचंड लुटमार चालू होते. या अडचणीच्या वेळी अनेक जण खचून जाऊन लढण्याचा विचार सोडून देतात. त्यामुळे लुटमार करणार्यांचे फावते. अशा वेळी आपण उपलब्ध कायदे आणि औषधोपचारांविषयी योग्य माहिती घेतल्यास आपली फसवणूक टळू शकते. सध्या होत असलेल्या अपप्रकारांविषयी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करता येऊ शकते. आपत्कालीन स्थिती अंतर्गत जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना विशेष अधिकार असतात. आपल्यावर या अशा स्वरूपाच्या होणार्या अन्यायाविरोधात आपण संघटितपणे लढले पाहिजे आणि अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, असे मार्गदर्शन वैद्य उदय धुरी यांनी केले.
वैद्य उदय धुरी यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे :
१. सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांविषयी काही मूलभूत आदेश दिलेले आहेत.
२. रुग्णांविषयी हलगर्जीपणा, दुर्लक्षित करणे, त्यांच्याकडून अधिक पैसे घेणे, असुविधा असणे यांविषयी आपण संबंधित रुग्णालय किंवा आधुनिक वैद्य यांच्या विरोधात पोलीस, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आय.एम्.ए.), केंद्र आणि राज्य सरकार यांचे आरोग्यमंत्री यांच्याकडे रितसर तक्रार करू शकतो.
३. या तक्रारींवर योग्य चौकशी होऊन काही आधुनिक वैद्यांचे सेवा करण्याचे प्रमाणपत्र रहित करणे, तसेच त्यांना काही कालावधीसाठी निलंबित करणे अशा स्वरूपाची कारवाईही झालेली आहे.
४. रुग्णालयात सोयी-सुविधा नसणे, शुद्ध पाणी नसणे, इतर सेवा व्यवस्थित नसणे, उपचारात हलगर्जीपणा, दिरंगाई करणे, अधिक प्रमाणात वेगवेगळ्या आस्थापनांची एकाच प्रकारची औषधे मागवणे यांविषयी आपण ‘ग्राहक सुरक्षा मंचा’कडे तक्रार करू शकतो.
५. खासगी रुग्णालयांमध्ये प्रचंड लुटमार चालू आहे. अशी लुटमार करणार्या ठाणे जिल्ह्यातील ‘ठाणे हेल्थकेअर’ आणि ‘सफायर’ या दोन रुग्णालयांच्या विरोधात ‘आरोग्य साहाय्य समिती’ने ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. या दोन रुग्णालयांकडून १६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला; मात्र अशा रुग्णालयांवर फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांना रुग्णांचे पैसे परत करण्यास भाग पाडले पाहिजे, तरच जनतेला खरा न्याय मिळेल.
‘रेमडेसिविर’ इंजेक्शनला अनेक पर्यायी औषधे उपलब्ध ! – आधुनिक वैद्या ज्योती काळे, भूलतज्ञ
कोरोनाचा मध्यम स्वरूपात संसर्ग झालेल्या रुग्णांना ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन उपयोगी पडते. सद्य:स्थितीत ‘हे इंजेक्शन जीवनरक्षक आहे’, असे सरकारने घोषितही केलेले नाही आणि तसे सिद्धही झालेले नाही. त्यामुळे सरसकट सर्वांना ते देणे चुकीचे होईल; पण सध्या समाजामध्ये हे इंजेक्शन घेतले किंवा दिले, तरच रुग्ण वाचतो, हा अपसमज मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे ‘हे इंजेक्शन मिळाले नाही, तर आपण मरू’, या भीतीनेच रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गंभीर रुग्ण नसलेल्यांना प्रारंभीच्या काळात या इंजेक्शनचा लाभ होतो; पण या इंजेक्शनला फॅबी-फ्लू, फॅविपीरॅवीर, स्टेरॉईड, प्रतिजैविके (अॅन्टी-बायोटिक), ऑक्सिजन आदी अनेक पर्याय आहेत, त्याचा उपयोग केला पाहिजे. अशा औषधांची नावे डॉक्टरांच्या संघटना, शासन, प्रशासन, आय.एम्.ए. यांनी घोषित करणे आवश्यक आहे. समाजात त्यासाठी जनजागृती केली पाहिजे; पण दुर्दैवाने असे होतांना दिसून येत नाही.
देयक अधिक आल्यास सरकार वा प्रशासन यांच्याकडे तक्रार करा !
सरकारने कोरोनाच्या खाटांचे शुल्क निश्चित केलेले असतांनाही रुग्णांची लूट होत आहे. प्रत्येक राज्यशासनाच्या ‘पोर्टल’वर जाऊन ‘कोविड १९’ या नावाने ‘सर्च’ (शोध) केल्यास त्या राज्यातील खाटांची शुल्क आकारणी उपलब्ध होऊ शकते. प्रत्येक रुग्ण रुग्णालयातील प्रशासकाला आपल्या देयकाचे विवरण मागू शकतो. तरीही देयक अधिक येत असल्यास जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, आरोग्यमंत्री यांच्या नावे निवेदन करू शकतो किंवा billscomplaints@gmail.com या संगणकीय पत्त्यावर तक्रार नोंदवू शकतो.
दर्शकांचे विशेष अभिप्राय आणि अनुभव
शोभा घावटे – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतरच हा काळाबाजार थांबेल. डॉक्टरांकडून पुष्कळ फसवणूक केली जात आहे.
दयाशंकर राजगोर – सरकारी रुग्णालयांमधील खाटा अल्पसंख्यांकांसाठी आरक्षित आहेत; परंतु ‘हिंदूंना उपलब्ध नाहीत’, असे उत्तर मिळते. कोरोना झालेल्या हिंदु रुग्णांना मात्र लाखो रुपये खर्च करून खाटा मिळवाव्या लागत आहेत.
पूनम सलेकर – सध्या सरसकट सर्वच स्तरांवर माणसांना फसवले जात आहे; परंतु बोलणार कोण ? अशी स्थिती झाली आहे.
विदुला घोडके – आरोग्य साहाय्य समितीचे कार्य स्तुत्य आहे.
ज्योती कामत-दाभोलकर – अशा प्रकारच्या जागृतीची आवश्यकता आहे.
सुरेश चंद्रा शर्मा – पुष्कळ चांगली माहिती आणि सूचना मिळाल्या. मी तुम्हाला धन्यवाद देतो. कार्यक्रम पुष्कळ चांगला झाला.
अन्याय आणि अत्याचार यांविरुद्ध लढण्यासाठी अग्रेसर होऊया ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा संदेश
समाजव्यवस्था उत्तम ठेवणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे; मात्र प्रशासन आणि समाजव्यवस्था भ्रष्ट झाल्यामुळे आपल्याला त्याच्या विरोधात आवाज उठवावा लागेल. त्यामुळेच समाजामध्ये ‘स्वराज्याकडून सुराज्य’ आणण्यासाठी, अन्याय आणि भ्रष्टाचार यांचे निवारण करण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमाने याचा आरंभ होत आहे. सर्वांनीच अन्याय आणि अत्याचार यांविरुद्ध लढण्यासाठी अग्रेसर होऊया आणि रामराज्य आणण्यासाठी प्रयत्नरत होऊया.
हा कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीच्या Hindujagruti.org या संकेतस्थळावरून, तसेच ‘ट्विटर’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमातून ७ सहस्रांहून अधिक जणांनी पाहिला. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त अन्य राज्ये, तसेच दुबई येथूनही काही प्रेक्षकांनी कार्यक्रम आवर्जून पाहिला आणि ‘कार्यक्रम आवडला’, असे सांगत उत्स्फूर्तपणे स्वतःचे विचार व्यक्त केले. |