कोल्हापूर शहरातील कोरोना केंद्रात रुग्णांना विनामूल्य उपचार !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा शहरात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेने शहरात १२ ‘कोरोना केंद्रे’ चालू केली आहेत. येथे रुग्णांना भोजन, औषध आणि वैद्यकीय सेवा विनामूल्य दिली जात आहे. खासगी रुग्णालयातील लाखो रुपये देयकांच्या पार्श्‍वभूमीवर या केंद्रांत विनामूल्य सुविधा मिळत असल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे. आजअखेर सहस्रो रुग्ण या केंद्रामधून बरे झाले आहेत. औषध, ऑक्सिजन, कपडे धुलाई आणि भोजन यांसह महापालिकेला दीड कोटी रुपये व्यय येत आहे.

बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येत नसली, तरी त्यांना उपचारांची आवश्यकता आहे. शहरात विनाकारण फिरणार्‍यांची ‘मोबाईल व्हॅन’द्वारे ‘रॅपिड अँटिजेन’ केली जात आहे. यामध्ये बाधित सापडणार्‍यांना या कोरोना केंद्रात भरती केले जात आहे. या केंद्रात रुग्णांना सकाळी चहा, अल्पाहार आणि फळे दिली जातात. दुपारी भोजन, सायंकाळी चहा अथवा दूध आणि रात्री भोजन दिले जाते. सर्व औषधेही विनामूल्य देण्यात येतात. रक्तदाब, मधुमेह असलेल्या रुग्णांना त्यांची रोजची औषधे घ्यावी लागतात. योग शिबिरांचे आयोजनही या केंद्रामध्ये केले जाते. रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाचा प्रयत्न असल्याची माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.