परवानाधारक रिक्शा व्यावसायिकांना शासनाकडून १ सहस्र ५०० रुपयांचे साहाय्य !

रिक्शाचालकांना साखर वाटप करतांना नितीन शिंदे (डावीकडे)

सांगली – सांगली जिल्हा रिक्शा व्यवसाय बचाव कृती समितीच्या लढ्याला यश आले आहे. परवानाधारक रिक्शा व्यावसायिकांना शासनाकडून १ सहस्र ५०० रुपयांचे साहाय्य घोषित झाले आहे. याविषयी माजी आमदार नितीन शिंदे यांनी शासनाचे अभिनंदन केले आहे. या वेळी साखर वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.

या वेळी नितीन शिंदे म्हणाले, ‘‘सध्या पंतप्रधान विनामूल्य अन्नधान्य योजना चालू आहे. यात सर्व रिक्शाचालकांना विनामूल्य धान्य द्यावे. सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदार यांनी त्यांच्या निधीतून रिक्शाचालकांना साहाय्य द्यावे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने रिक्शा व्यावसायिकांना साहाय्य करण्याचा ठराव संमत केला आहे. तसाच ठराव सांगली महापालिकेनेही करावा.’’

या वेळी सांगली जिल्हा व्यवसाय कृती समितीचे अध्यक्ष महेश चौगुले, राजू रसाळ, तुषार मोहिते, बंडू तोडकर, भाजप नेते अविनाश मोहिते, अमर पडळकर, प्रियानंद कांबळे, शिवसेनेचे प्रसाद रिसवडे यांचेसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.