सोलापूर येथील नवनीत रुग्णालयाला महापालिकेकडून नोटीस

कोरोना रुग्णांसंदर्भातील अटींचे पालन होत नसल्याने कारवाई

सोलापूर – येथील नवनीत या खासगी रुग्णालयातील रुग्ण परिसरात मुक्तपणे फिरत असून रोगाचा प्रसार करत असल्याने महानगरपालिकेकडून रुग्णालयाला नोटीस देण्यात आली आहे. काही खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध अटी घालून मान्यता देण्यात आली; मात्र या अटींचे पालन नवनीत रुग्णालयाकडून होत नसल्याचे आढळले आहे.

डॉ. तोष्णीवाल यांच्या नवनीत रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय रुग्णालयाच्या बाहेर फिरत आहेत, तसेच परिसरातील नागरी वसाहतीत घरासमोर गर्दी करून बसणे, घरासमोर थुंकणे, भोजन करून कचरा तेथेच टाकणे, घरासमोर वाहने अस्ताव्यस्त लावणे, घरासमोर ‘मास्क’ टाकणे, असे विकृत प्रकार करत असल्याने परिसरातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त, तसेच उपायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे महानगरपालिकेकडून डॉ. तोष्णीवाल यांच्या नवनीत रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे.