मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात घेऊन मनःशांती मिळवा !
१. भौतिक विकास साधणे म्हणजे शांती नव्हे !
अमेरिका किंवा पाश्चात्त्य देश आर्थिकदृष्ट्या कितीही समृद्ध झाले असले, तरी त्या देशांमधील लोकांना शांती आहे का ? त्या देशांमध्ये चोर्यामार्या, दरोडे, एकमेकांना फसवणे बंद झाले आहे का ? श्रीमंती म्हणजे शांती नव्हे. श्रीमंत माणूस शांत झोपू शकतो का ? तसेच शस्त्रास्त्रांनी शक्तीशाली असणे म्हणजेही शांती साधणे नाही; कारण अशा देशांवर दुसरा देश आक्रमण करण्याची नेहमी टांगती तलवार असते.
२. समानतेच्या धोरणानेही शांती मिळणार नाही !
काही लोकांना वाटते, ‘समाजातील सर्वांना एकसमान वागणूक दिली, सर्वांना समानतेने अधिकार दिले, अन्नधान्य दिले की, लोकांमध्ये शांती पसरेल.’ समानतावादी, साम्यवादी (कम्युनिस्ट) लोकांची हीच ध्येयधोरणे आहे. सर्व जण समान कसे होऊ शकतात ? सृष्टीमध्ये विविधता असून एकसारखे काही नाही. आपल्या शरिराचे अवयव आणि त्यांची कार्ये समान नाहीत. हात हातांचेच काम करतात आणि पाय पायांचेच काम करतात. कितीही म्हटले, तरी पायांचे काम हात करू शकत नाहीत. त्यामुळे समानतेच्या धोरणानेही शांती मिळणार नाही. प्रत्येकाचे अधिकार त्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे आहेत.
३. मनुष्यजन्माचे महत्त्व
आज आपण पहातो की, मनुष्याची ओढ पूर्णतः मायेकडे आहे. पैसा, गाडी, बंगला, चैनीच्या वस्तू, मान-सन्मान इत्यादी मिळवणे, यांसाठी मनुष्याची धडपड चालू आहे. यासाठी तो वाटेल तसा, म्हणजे अनैतिकतेनेही वागतो आणि स्वतःची अधोगती करून घेतो. मनुष्यजन्म हे सर्व मिळवण्यासाठी नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी, म्हणजे आध्यात्मिक उन्नती करून ईश्वरामध्ये विलीन होण्यासाठी झाला आहे. त्यामुळेच खरेतर त्याला शांती मिळणार आहे. जीव, जंतू, किडे, मुंगी, पशू, प्राणी, पक्षी अशा ८४ लक्ष योनींतून फिरल्यानंतर एखाद्या जिवाला मनुष्यजन्म मिळतो. याचा अर्थ लाखो वर्षे घालवल्यानंतर चांगले कर्म करण्यासाठी, म्हणजे सत्कर्मासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी दुर्मिळ असा मनुष्यजन्म मिळालेला असतो. या मनुष्यजन्माचे मूल्य किती जण जाणतात ?’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.