एकीचे बळ आणि फळ !
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात ११ दिवस चाललेल्या रक्तरंजित संघर्षाची समाप्ती शेवटी दोन्ही देशांतील युद्धविरामाने झाली. पॅलेस्टाईनने चालू केलेला हा संघर्ष इस्रायलने पॅलेस्टाईनचा पुरेपूर सूड उगवून संपवला. गेले ११ दिवस चाललेल्या या युद्धात पॅलेस्टाईनचे २३२, तर इस्रायलचे ११ लोक मारले गेले. पॅलेस्टाईनची जिहादी आतंकवादी संघटना असलेल्या हमासकडून ४ सहस्रांहून अधिक रॉकेट्स डागण्यात आले, तर इस्रायलनेही गाझामध्ये क्षेपणास्त्रांचा मारा आणि बॉम्बवर्षाव करून शहराचा मोठा भाग उद्ध्वस्त केला. या दोन्ही देशांत आतापर्यंत झालेल्या संघर्षावर दृष्टी टाकता नेहमी पॅलेस्टाईनने युद्ध चालू केल्याचे, तर इस्रायलने त्याचा शेवट केल्याचे आढळून येईल. विशेष म्हणजे यंदा बाणेदार आणि आक्रमक इस्रायलने अवघ्या ११ दिवसांत युद्धबंदी घोषित केली. खरे तर इस्रायलने केवळ ११ दिवसांत युद्धाला विराम देणे, ही पॅलेस्टाईनसाठी सुखद गोष्ट म्हणायला हवी; कारण इस्रायलने सहसा इतक्या लवकर युद्धबंदी केल्याचे इतिहासात आढळत नाही. शत्रूची शक्य तितकी हानी करणे आणि त्याला जरब बसेेपर्यंत त्याच्यावर आक्रमक मारा करत रहाणे, ही इस्रायलची युद्धनीती आहे. वर्ष २०१४ मध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात असाच संघर्ष झाला होता. तो ५० दिवस चालला. त्या वेळी इस्रायलने पॅलेस्टाईनवर तब्बल ६ सहस्र हवाई आक्रमणे केली होती. यात २ सहस्र २५० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले होते. यावरून इस्रायलची आक्रमकता किती आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे यंदा इस्रायलने हे युद्ध ११ व्या दिवशीच थांबवले नसते, तर पॅलेस्टाईनचे ‘१२वे’ आणि ‘१३वे’ ठरलेले होते !
या युद्धापूर्वी इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. नेतान्याहू यांची सत्ता टिकते कि जाते, अशी स्थिती होती. अशा डळमळीत स्थितीत ‘हमास’ने इस्रायलची काढलेली खोडी नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारच्या पथ्यावर पडली. नुकत्याच झालेल्या रमझान मासाच्या निमित्ताने इस्रायलमधील जेरूसेलम येथील अल्-अक्सा मशिदीमध्ये नमाजपठणासाठी आलेल्या जमावाला इस्रायली पोलिसांनी हटकले, तसेच तेथील पॅलेस्टिनी लोकांना शहरातील जागा रिकामी करण्यास सांगितले. यामुळे चिडलेल्या ‘हमास’ने इस्रायलवर थेट आक्रमण केले. त्याने इस्रायलच्या अनेक शहरांवर १ सहस्र ४०० रॉकेट्सचा मारा केला. अर्थात् इस्रायलनेही शक्य तितक्या आक्रमकतेने हमासला प्रत्युत्तर देत हवाई आक्रमणे केली. पॅलेस्टाईनच्या आततायीपणामुळे एका छोट्याशा वादाच्या ठिणगीचे रूपांतर थेट मोठ्या युद्धात झाले आणि नेहमीप्रमाणे पॅलेस्टाईनलाच त्याचे मूल्य चुकवावे लागले. देशातील राजकीय अस्थिरतेच्या वातावरणातही इस्रायलने आपापसांतील मतभेद बाजूला ठेवत शत्रूविरुद्ध दाखवलेले एकीचे बळ त्यांना विजयाचे फळ देणारे ठरले !
पराजयाचा पॅलेस्टिनी आनंदोत्सव !
इस्रायलने युद्धबंदी घोषित केल्यानंतर पॅलेस्टाईनमध्ये विशेषतः गाझा पट्टीतील नागरिक आनंदोत्सव साजरा करत आहेत. त्यांना ‘आम्हीच विजेते आहोत’, असे वाटत आहे. इतका मार खाऊनही स्वतःला विजेता म्हणून घेणे केवळ हास्यास्पद आहे आणि हे केवळ पॅलेस्टाईनलाच जमू शकते. ‘विजेत्या’ पॅलेस्टाईनला असे वाटण्यामागे पुन्हा इस्रायलच कारणीभूत आहे; कारण पॅलेस्टाईनने युद्ध चालू केल्यानंतर इस्रायलने ‘आता या युद्धाचा शेवट आम्ही करू’, अशी गर्भित चेतावणी दिली होती. यासह ‘आजार संपेपर्यंत आक्रमण चालूच राहील’, असेही त्याने निक्षून सांगितले होते. तरीही शेवटी युद्धबंदीची घोषणा इस्रायलनेच, तेही केवळ ११ दिवसांत केल्याने कदाचित् हा पॅलेस्टाईनला त्यांचा विजय वाटला असावा ! आंतरराष्ट्रीय राजकारणात उक्तीपेक्षा कृतीला अधिक महत्त्व असते. कोणी किती दिवस युद्ध केले, यावरून एखाद्या देशाची शक्ती ठरत नसते, तर त्याने शत्रूची किती हानी केली, यावर शक्तीचे मूल्यमापन होत असते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी एकमेकांच्या केलेल्या हानीची आकडेवारी पहाता कोणी इस्रायलच्या युद्धबंदीच्या घोषणेला त्याचा ‘पराजय’ म्हणेल का ? किंवा पॅलेस्टाईनला ‘विजेता’ ठरवण्याची चूक करेल का ? युद्ध हे कुठल्याही देशाला नको असते किंबहुना ते आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच स्तरांवर न परवडणारे असते. अशा वेळी थोड्या काळात शत्रूची शक्य तितकी अधिक हानी करून युद्धविराम करणे, हेच खरे शहाणपणाचे असते. तो शहाणपणा इस्रायलने दाखवला इकतेच.
युद्धाचा विराम कि स्वल्पविराम ?
इतिहासावरून असे दिसून येते की, पॅलेस्टाईनला युद्धाची खुमखुमी आहे. त्यामुळे आज ना उद्या या दोन्ही देशांतील संघर्ष पुन्हा उफाळून येणारच आहे. या दोन्ही देशांतील नुकत्याच संपलेल्या युद्धाला ‘विराम’ म्हणूनच म्हणता येत नाही. त्याला स्वल्पविराम म्हणावे लागेल; कारण पुढे संघर्ष अटळ आहे. हा संघर्ष जगाला तिसर्या महायुद्धाकडे घेऊन जाणारा आहे; कारण इस्रायलविरोधात ५७ इस्लामी राष्ट्रे एकवटली आहेत. उद्या शेकडो ख्रिस्ती राष्ट्रे एकवटतील आणि जग या दोन्हींत विभागले जाऊन भीषण युद्धाला तोंड फुटेल. त्याची सिद्धता एकमेव हिंदुबहुल असलेल्या भारताला अधिक प्रमाणात करावी लागेल. त्यासाठी भारताला इस्रायलकडून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. इस्लामी राष्ट्रांच्या वेढ्यात राहूनही इस्रायल बाणेदारपणे आणि स्वाभिमानाने उभा आहे. इतकेच नव्हे, तर सर्व इस्लामी राष्ट्रांवर वचक ठेवून आहे. भारताला इतक्या वर्षांत ना पाकची डोकेदुखी संपवता आली, ना चीनची कुरघोडीही रोखता आली. पाक आणि चीनची डोकेदुखी कायमची संपवायची असेल, तर आपल्याला इस्रायली बाणा अंगीकारावा लागेल. शत्रूवर स्वतःचा वचक बसवावा लागेल. इस्रायल केवळ ‘ज्यू’ धर्माच्या आधारे एक होऊन जगावर भारी ठरत असेल, केवळ ‘इस्लाम’साठी ५७ इस्लामी राष्ट्रे एक होऊ शकत असतील, तर १०० कोटी हिंदूंच्या ‘हिंदु’ धर्माच्या आधारे भारत एक होऊन बलशाली होऊ शकत नाही का ? त्यासाठी आवश्यकता आहे ती त्या दिशेने पावले टाकण्याची !