योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन आत्मबळ वाढवतात !
काही वेळा धंद्यात तोटा झाल्याने किंवा शेतकरी गरिबीमुळे आत्महत्या करतात. तरुण मुलांमध्ये आत्महत्या करणार्यांचे प्रमाण अधिक असते. विद्यार्थी परीक्षेच्या निकालापूर्वी किंवा निकाल लागल्यावर आत्महत्या करतात. पती-पत्नी भांडणामुळे किंवा कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या करतात.
गरीबात गरीब भारतियालाही आध्यात्मिक दृष्टीकोन माहीत असतात; उदा. ‘जीवनात येणारे दुःख हे प्रारब्धामुळे असून ते भोगून संपवण्यासाठी हा जन्म आहे.’ हा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन सहनशीलता पुष्कळ प्रमाणात वाढवतो, सहन करण्याची क्षमता वाढवतो.
अधिक गुण, चांगले महाविद्यालय, उच्च शिक्षण, हे सारे पैसे कमावण्यासाठी आहे, असा कुसंस्कार त्यांच्यावर केला जातो. त्यामुळे अधिक गुण हे जीवनाचे सर्वस्व झालेले असते. अल्प गुण मिळाले म्हणजे आयुष्यात अयशस्वी झालो असे नाही, हा दृष्टीकोनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर आधीपासूनच असेल, तर विद्यार्थी असे टोक गाठण्याची शक्यता उणावते.
धंद्यामध्ये आर्थिक हानी झाली, तर व्यक्ती ताणाने खचून जाते. ईश्वर या स्थितीतून बाहेर काढू शकतो, हा दृष्टीकोन त्याला आधीपासून असेल, तर तो टोकाचा निर्णय घेणार नाही.
कौटुंबिक कलह हे कुटुंबातील व्यक्तींशी असलेल्या देवाण-घेवाण हिशोबामुळे निर्माण होतात, हा आध्यात्मिक दृष्टीकोन स्पष्ट असेल, तर कौटुंबिक कलहांचा दुष्परिणाम मनावर होत नाही.