सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति् (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आलेल्या धर्मध्वज स्थापना विधीची छायाचित्रमय क्षणचित्रे !
विजयपताका श्रीरामाची झळकली अंबरी । दुमदुमली हिंदु राष्ट्राची ललकारी ॥
श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वास्तव्याने सनातनचा रामनाथी आश्रम साक्षात् भूवैकुंठ झाला आहे. महर्षींनी त्यांच्या अवतारत्वाचा गौरव करण्यासह या पावन आश्रमाचे महात्म्यही वेळोवेळी वृद्धींगत केले आहे. मुळातच चैतन्यमय असलेल्या आश्रमावर महर्षींनी आतापर्यंत कळसस्थापना, साधकांच्या रक्षणासाठी आश्रमाच्या वास्तूवर ध्वजस्थापना, आश्रमाच्या प्रवेशद्वारी गजस्थापना, कमलपिठावरील दीपलक्ष्मीची स्थापना यांसारखे निरनिराळे विधी करून या वास्तूला स्थुलातूनही वैकुंठाचेच रूप प्राप्त करून दिले आहे. आश्रम परिसरात आता धर्मपताका डौलाने फडकत आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आणि महर्षींच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची विजयपताकाही लवकरच फडकेल, हे निश्चित ! |
सध्याच्या धर्मग्लानीच्या काळात अधर्म बळावल्याने त्रासलेले, अन्याय-अत्याचारांनी पिचलेले सर्व हिंदु राष्ट्राची आतुरतेने वाट पहात आहेत. रामराज्याची अनुभूती देणारे हिंदु राष्ट्र लवकरात लवकर साकार व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे सनातनचे ३ गुरु अखंड कार्यरत आहेत. सध्याचा आपत्काळ सरला की, ते मंगलमय हिंदु राष्ट्र अनुभवण्यास मिळणार आहे. सप्तर्षींनी ध्वजस्थापना करण्यास सांगून एकप्रकारे त्याला पुष्टीच दिली आहे ! सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार अक्षय्य तृतीया (१४.५.२०२१) या शुभदिनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. त्या विधीची काही वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून या ध्वजावर एका बाजूला प्रभु श्रीरामाचे चित्र, तर दुसर्या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामरूपातील चित्र घेण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार हा कापडी ध्वज बनवण्यात आला. ‘हा धर्मध्वज हे हिंदु राष्ट्र समीप आल्याचे प्रतीक आहे. या धर्मध्वजाच्या स्थापनेमुळे सर्वत्र हिंदु धर्माची पुष्कळ कीर्ती होईल आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल’, असे आशीर्वचन सप्तर्षींनी दिले आहे.
धर्मध्वजाची स्थापना करतांना आलेली अनुभूती‘धर्मध्वजाची स्थापना करण्याचा विधी चालू झाल्यानंतर आणि धर्मध्वजाचे आरोहण झाल्यानंतरही वारा वहात नव्हता. त्यामुळे ध्वजही फडकत नव्हता. विधीअंतर्गत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ध्वजाला नमस्कार केल्यानंतर अचानक वारा वाहू लागला आणि ध्वजही छान फडकला. ‘श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ध्वजाला वंदन केल्यामुळे ध्वजाला जागृती आली’, असे उपस्थित सर्वांना वाटले. त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ध्वजस्तंभाला स्पर्श केला, तेव्हाही तीच अनुभूती पुन्हा आली.’ – श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. |
ध्वजस्थापनेच्या अंतर्गत अभिमंत्रण विधी करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ध्वजाला स्पर्श केल्यानंतर त्यांना तो अत्यंत सजीव वाटला. ‘श्रीगुरूंच्या चरणांनाच स्पर्श करत आहोत’, अशी अगदी स्पष्ट जाणीव झाली. तो वैशिष्ट्यपूर्ण क्षण ! ध्वजस्थापना विधी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासारख्या आध्यात्मिक अधिकारी विभूतींकडून झाल्यामुळे त्या ध्वजाला जागृती आली. त्यानंतर त्याचे कार्य चालू होऊन वातावरणात प्रक्षेपण होऊ लागले.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |