आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !
‘प्रतिदिन होणार्या आत्महत्या हे जीवनातील नैराश्य, संकट, कसोटीचे क्षण, तणावाचे प्रसंग यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आत्मबळ देण्यास सध्याची शिक्षणप्रणाली, समाजरचना आणि संस्कार अपयशी ठरल्याचेच द्योतक आहे. ‘जीवनातील ८० टक्के दुःखांची मूळ कारणे ही आध्यात्मिक असून त्यांच्यावर केवळ आध्यात्मिक उपायांनी म्हणजेच साधनेने मात करता येते’, असे अध्यात्मशास्त्र सांगते.
साधनेमुळे प्राप्त होणार्या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी होते. साधनेमुळे केवळ मनाची एकाग्रता साधते असे नव्हे, तर मनःशांतीही मिळते. प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते. एवढेच नव्हे तर जिद्द, चिकाटी यांसारखे गुण निर्माण होऊन ध्येयपूर्तीसाठी ईश्वरी अधिष्ठान लाभून यशप्राप्तीही होते. साधना हेच सर्व प्रश्नांवरील अंतिम उत्तर ठरते. त्यामुळे शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण, साधना इत्यादी गोष्टींचा समावेश असणे अत्यावश्यक ठरते.’
मानसिक तणाव दूर करण्यासाठी समाजाला साधना आणि धर्माचरण शिकवणे आवश्यक आहे. साधना केल्यामुळे मानसिक तणाव दूर होऊन जीवन आनंदी झाल्याची अनुभूती सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्या सहस्रो साधकांनी आतापर्यंत घेतली आहे !
साधना केल्याने सकारात्मक विचार येऊन व्यक्ती कायमस्वरूपी आनंदी जीवन जगू शकते. विज्ञानाद्वारे प्राप्त झालेल्या भौतिक साधनांतून क्षणिक सुख मिळते; मात्र कायमस्वरूपी आनंद मिळत नसल्याने मनुष्याला अध्यात्माविना पर्याय नाही, हेच पुन्हा अधोरेखित होते. याच आनंदासाठी बहुतांश पाश्चात्त्य भारतात साधना शिकण्यासाठी येत आहेत ! त्यामुळे शासनाने नागरिकांना धर्मशिक्षण देऊन साधना शिकवणे अत्यावश्यक आहे !
क्षुल्लक कारणांवरून आत्महत्येसारख्या घटना घडणे, यावरून आपत्काळाची तीव्रता लक्षात येते. साधना केल्यासच देव मानवाचे रक्षण करील, हे लक्षात घ्यावे !