पुण्यातील ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’ने केली ‘कोव्हिसेल्फ’ संचाची निर्मिती !
घरच्या घरीच कोरोनाचे निदान करणारा संच पुण्यातून विकसित
पुणे – घरच्या घरी कोरोना चाचणी करून देणार्या ‘कोव्हिसेल्फ’ या पहिल्या स्वदेशी कोरोना चाचणी संचाची निर्मिती येथील ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’ने केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची ( ‘आय.सी.एम्.आर्.’ ) त्याला मान्यताही मिळाली आहे.
(सौजन्य: TV9 मराठी)
या संचामध्ये माहितीपत्रक, चाचणीसाठी लागणारे साहित्य आणि संच वापरून चाचणी कशी करावी यासंदर्भातील सूचनापत्रही दिले जाणार आहे. चाचणीसाठी नाकातील द्रवाचा वापर केल्यावर केवळ १५ मिनिटांमध्ये रुग्णाचे निदान होईल. प्रत्येक संच भ्रमणभाष ‘अॅप्लिकेशन’शी जोडला असेल. त्यामुळे वापरकर्त्याने भरलेली माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला उपलब्ध होईल, अशी माहिती ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’चे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ यांनी दिली. या चाचणीमुळे यंत्रणेवरील ताणही हलका होण्यास साहाय्य होणार असून डॉक्टरांच्या चिठ्ठीविना स्थानिक औषध दुकानातून किंवा ‘ऑनलाईन’ पद्धतीने हा संच खरेदी करणे शक्य होणार आहे. २५० रुपये किमतीचा हा संच लवकरात लवकर विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’चे सुजित जैन यांनी दिली.