लैंगिक अत्याचार प्रकरणी ‘तेहलका’चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांची म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्यशासन गोवा खंडपिठात आव्हान देणार
पणजी, २१ मे (वार्ता.) – ‘तेहलका’ मासिकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांची सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातून म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी राज्यशासन अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान देणार असल्याची माहिती सरकारी अधिवक्त्यांनी दिली आहे.
९ आणि १० नोव्हेंबर २०१३ या दिवशी ‘तेहलका’ने उत्तर गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्या एका सहकारी महिलेने केला. गोवा पोलिसांनी या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवल्यानंतर तरुण तेजपाल यांना कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी जुलै २०१४ मध्ये तरुण तेजपाल यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तरुण तेजपाल यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले. हे आरोपपत्र प्रविष्ट करण्याच्या कृतीला तरुण तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान दिले; मात्र गोवा खंडपिठाने ही याचिका प्रविष्ट करून घेतली नाही. त्यानंतर २१ ऑक्टोबर २०१९ नंतर साक्षीदारांची उलटतपासणी करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेल्या निवाड्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना तरुण तेजपाल म्हणाले, ‘‘या प्रकरणात मला विनाकारण गोवले गेले आणि न्यायालयाने यावर आज शिक्कामोर्तब केले आहे.’’ (विनाकारण गुन्ह्यात गोवणार्या महिलेवर तरुण तेजपाल अब्रूहानीचा खटला प्रविष्ट करणार का ? – संपादक)
तरुण तेजपाल यांची निर्दोष सुटका होणे, हे दुर्दैवी असून शासन उच्च न्यायालयात आव्हान देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लैंगिक अत्याचार प्रकरणी ‘तेहलका’ मासिकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष सुटका होणे, हे दुर्दैवी आहे. गोवा शासन अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात लवकरच आव्हान देणार आहे. या प्रकरणी संबंधित महिलेवर अन्याय झालेला आहे आणि गोवा शासन हे खपवून घेणार नाही, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.