नागपूरसह देशात ४ ठिकाणी मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी होणार ! – आधुनिक वैद्य समीर पालतेवार
नागपूर – ‘नागपूरसह पाटणा, देहली आणि भाग्यनगर (हैद्राबाद) या देशातील ४ ठिकाणी लहान मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी देशातील २ ते १८ वयोगटांतील ५२५ मुलांची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या मुलांचे १७५ प्रमाणे ३ गट करण्यात येतील. पहिला गट हा २ ते ६ वर्षांच्या बालकांचा असणार आहे, दुसरा गट हा ६ ते १२ वर्षांच्या बालकांचा, तर तिसरा गट हा १२ ते १८ वर्षांच्या मुलांचा असणार आहे’, अशी माहिती ‘मेडिट्रीना रुग्णालया’चे संचालक आधुनिक वैद्य समीर पालतेवार आणि ‘मेडिट्रीना ट्रायल’चे संचालक आधुनिक वैद्य आशिष ताजने यांनी २१ मे या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बालरोग तज्ञ आधुनिक वैद्य वसंत खडतकर उपस्थित होते.
आधुनिक वैद्य समीर पालतेवार पुढे म्हणाले की, साधारणपणे २०८ दिवस मुलांना लस देण्याची प्रात्यक्षिके चालणार आहेत. यामध्ये पहिली लस दिल्यानंतर लसीचा दुसरा डोस हा २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे. या चाचणीसाठी ज्या मुलांना सर्दी आणि खोकला याचा त्रास नाही, ज्यांना यापूर्वी कधीही कोरोनाची लागण झालेली नाही, अशा मुलांची निवड करण्यात येणार आहे. भारत बायोटेक, ‘एनायव्ही’ आणि ‘आ.य.सी.एम्.आर.’च्या माध्यमातून देशातील ४ ठिकाणी लहान मुलांवर कोरोना लसीकरणाची प्रात्यक्षिके होणार आहेत.