साधनेची तीव्र तळमळ आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा असल्याने दुर्धर आजारातही भावपूर्ण साधना करून ‘सनातनचे १०७ वे (समष्टी) संतपद’ प्राप्त करणारे अयोध्या येथील पू. डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) !
पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचा २२ मे २०२१ या दिवशी देहत्यागानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘अयोध्येसारख्या पवित्र भूमीत जन्म झालेले आणि एकत्र कुटुंबात वाढलेले श्री. नंदकिशोर वेद यांना पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड होती. उत्तम स्मरणशक्ती आणि अभ्यासू वृत्ती असल्याने त्यांनी पुष्कळ परिश्रम घेऊन शिक्षण घेतले. त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय आतंकवाद’ या विषयावर शोधप्रबंध सादर करून ‘पी.एच्.डी.’ ही पदवी मिळवली. त्यांनी आणखी २ पुस्तकेही लिहिली आहेत. अध्यापनाची सेवा करतांना त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांवर पुत्रवत् प्रेम केले. ‘पी.एच्.डी.’ करणार्या विद्यार्थ्यांना त्यांनी विनाशुल्क मार्गदर्शन केले. यातून त्यांची नि:स्पृह आणि निरपेक्ष वृत्ती दिसून येते. यातून त्यांची कर्मयोगानुसार साधना झाली.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असतांना त्यांनी आपल्या कुटुंबियांकडे कधी दुर्लक्ष केले नाही. त्यांनी मुलींना चांगले शिक्षण देण्यासोबत चांगल्या संस्कारांचे बाळकडूही दिले. ‘आदर्श पुत्र’, ‘आदर्श बंधू’, ‘आदर्श शिक्षक’ आणि ‘आदर्श पिता’ अशी सर्वच नाती त्यांनी उत्तम प्रकारे निभावली.
वर्ष २००० पासून अयोध्या (फैजाबाद) येथे सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर डॉ. नंदकिशोर वेद यांनी तळमळीने सेवेला आरंभ केला. त्यांचा अहं मुळातच अल्प होता. त्यामुळे स्वतःच्या उच्च शिक्षणाचा किंवा प्रतिष्ठेचा कोणताही विचार न करता ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने ते सेवा करू लागले. त्यांचे निवासस्थान जणू साधकांसाठी आश्रमच बनले. अयोध्येत सनातनचे कार्य वाढावे, यासाठी त्यांनी सर्व स्तरांवर तळमळीने प्रयत्न केले. यामुळे ते ‘आदर्श साधक’ही बनले आणि वर्ष २०१८ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले.
डिसेंबर २०१९ मध्ये त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. व्यष्टी-समष्टी साधनेचा चांगला पाया आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा असल्यामुळे त्यांनी कर्करोगाचे कटू वास्तव स्वीकारले. असह्य वेदना होत असतांनाही त्यांची ईश्वरावरील निष्ठा कधी ढळली नाही. सतत भावविश्वात आणि अनुसंधानात राहून ते आंतरिक आनंद अनुभवत होते. त्यामुळे आजारपणातही त्यांची आध्यात्मिक उन्नती झपाट्याने होत राहिली. जेव्हा साधना अंतर्मनातून होऊ लागते, तेव्हा बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी साधनेत अखंडत्व येते, तसेच देहप्रारब्धाकडे साक्षीभावाने पहाता येते.
आजार बळावत गेल्याने ११.५.२०२१ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात डॉ. नंदकिशोर यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असतांनाही त्यांनी तळमळीने आणि भावपूर्ण साधना केल्याने मृत्यूच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के झाली. आज त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. या १२ दिवसांत त्यांची पातळी आणखी २ टक्क्यांनी वाढली आहे. मागील गुरुपौर्णिमेच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होती, म्हणजे अवघ्या १० मासांत त्यांची पातळी ९ टक्क्यांनी वाढली. एवढ्या जलद गतीने आध्यात्मिक उन्नती झाल्याचे सनातनच्या इतिहासातील हे पहिलेच उदाहरण आहे.
साधनेची तीव्र तळमळ आणि ईश्वराप्रती दृढ श्रद्धा असलेल्या डॉ. नंदकिशोर वेद यांनी आज ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘सनातनचे समष्टी संत’ म्हणून १०७ वे संतपद प्राप्त केले आहे.
पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचा पूर्ण परिवार साधना करत आहे. त्यांची मुलगी सौ. क्षिप्रा हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून अन्य सर्व कुटुंबियांची साधनाही चांगल्या प्रकारे चालू आहे.
‘पू. डॉ. नंदकिशोर वेद यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
दुर्धर आजारामुळे मरणप्राय वेदना सहन करतांना ‘गुरुस्मरण, गुरुध्यान आणि गुरुभक्ती’ या त्रिसूत्रींचे पालन करून गुरुकृपेची अखंड अनुभूती घेत संतपदावर विराजमान झालेले पू. डॉ. नंदकिशोर वेद !
हा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/479218.html