बार्ज पी-३०५ दुर्घटनेतील मृतदेह कह्यात देण्यासाठी पोलीस नसल्याने नातेवाइकांना मनस्ताप
पोलिसांचा अक्षम्य निष्काळजीपणा !
मुंबई – तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रात अडकलेल्या बार्ज पी-३०५ वरील मृत्यू झालेल्यांचे मृतदेह घेण्यासाठी संबंधितांचे नातेवाइक जे.जे. रुग्णालयामध्ये पोचले; परंतु तेथे संबंधित पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे नातेवाइकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. परिणामी यलो गेट पोलीस ठाण्याच्या विरोधात नातेवाइकांनी संताप व्यक्त केला.
घटना होऊन दोन दिवस झाले, तरी मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मृतदेह मिळालेले नाहीत. सगळे मृतदेह जे.जे. रुग्णालयाच्या शवागृहात आहेत. ज्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे, ते मृतदेह संबंधित नातेवाइकांना देण्यासाठी येलो गेट पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रुग्णालयात आले नाहीत.
त्यामुळे संबंधित नातेवाइकांना ताटकळत रहावे लागले.